बाबासाहेबांचा 'शिवचरित्र' मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2021   
Total Views |

Babasaheb_1  H
 
 
आदर्श हिंदू राजा म्हणजे समानता, म्हणजे सर्वधर्मसमभाव, म्हणजे श्रेष्ठ नैतिक मूल्यांवर आधारित राज्य, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाची पारायणे केली पाहिजेत.
 
 
आपल्या अमोघ वक्तृत्वाने श्रोत्यांना खुलवून ठेवणारे वक्ते महाराष्ट्रात खूप झाले. दोन-अडीच तास प्रवचन देणारे प्रवचनकारदेखील खूप झाले. राजकीय सभा गाजविणाऱ्या वक्त्यांचीही महाराष्ट्रात कमतरता नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या सर्व वक्त्यांच्या मांदियाळीत बसत नाहीत. ते मानधनी वक्ता नव्हते किंवा मानधनी प्रवचनकार बुवा नव्हते. शिवाजी महाराज हा त्यांचा पोटापाण्याचा विषय नव्हता. शिवाजी महाराज त्यांचे आराध्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राने त्यांना शब्दश: वेड लावले होते. शिवचरित्राची भूतबाधा त्यांना झाली होती, असेही म्हणता येईल.
 
असा वक्ता आपल्या वाणीने ऐकणाऱ्यांच्या मनात सहज प्रवेश करतो. त्याला अंतर्मुख करतो. जीवनाचे ध्येय शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच असे आहे. कशासाठी जगायचे, हे त्यांनी बालवयातच निश्चित केले. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले. या ध्येयापुढे त्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले. 'हिंदवी स्वराज्य होणे ही श्रींची इच्छा आहे' असे महाराज म्हणत. आपल्या कार्याला परमेश्वराचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले.
 
असे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श मानावेत, असे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार सांगून गेले. भगवा ध्वज संघाचा गुरू, कुणी व्यक्ती नाही. तोच आपला आदर्श आहे, असे ते सांगत. परंतु, जर एखादी व्यक्ती आदर्श म्हणून डोळ्यापुढे आणायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माना, असे ते सांगून गेले. अशा आदर्शाचे गुणगान शेवटच्या श्वासापर्यंत एका स्वयंसेवकाच्या भूमिकेत बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनहेतू कोणता, त्यांचे आदर्श कोणते होते, त्यांची राज्यपद्धती कोणत्या नैतिक तत्त्वांवर अवलंबून होती, माता-पिता-गुरुजन, साधूसंन्यासी, यांचा सन्मान कसा करायचा असतो, याचे प्रसंगामागून प्रसंग बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'राजा शिवछत्रपती' या चरित्रग्रंथात वाचायला सापडतात.
 
इतिहास सांगताना पुराव्यांशिवाय बोलायचे नाही, अनुमान धक्क्याने काही सांगायचे नाही. त्यावर कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही, कोणत्याही विचारसरणीचा प्रचार करायचा नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच सांगायचे, ही शिस्त त्यांनी काटेकोरपणे पाळली. शिवचरित्रातील अनेक प्रसंगावेळचे अनुभव त्या प्रसंगात सहभागी असलेल्या लोकांनी शब्दबद्ध केलेले नाहीत. ते केले असते, तर शिवाजी महाराजांचा जीवनप्रसंग रंगवून सांगताना फार मोठी धार प्राप्त झाली असती. इतिहास काही बोलत नाही याची खंत बाबासाहेबांनी फार वेळा व्यक्त केली.
 
बाबासाहेबांचा 'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ मराठी भाषेतील कैलासलेणे आहे. अशा ग्रंथाला 'सरस्वती सन्मान' किंवा 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळाला नाही. त्याची खंत करण्याचेही कारण नाही. असे ५६ पुरस्कार या ग्रंथावरून ओवाळून टाकावेत, इतक्या श्रेष्ठ प्रतीचा हा ग्रंथ आहे. प्रश्न सन्मानाची निवड करणाऱ्यांच्या रसिकतेचा आणि बुद्धिमत्तेचा आहे. कोणते निकष ठरवून पुरस्कार दिले जातात आणि ते ठरावीक साचेबंद विचारसणीच्या लोकांनाच का, याची उत्तरे कधी ना कधी द्यावी लागतील. तसे बाबासाहेब पुरंदरे सगळ्या पुरस्कारांच्या पलीकडे गेलेले व्यक्तिमत्त्व होते. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला पुरस्कार दिल्याने ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा आणि त्यांचे रचियता ज्ञानदेव आणि तुकाराम महान होत नाहीत. बाबासाहेबांचे शिवचरित्र ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांच्या रांगेत बसणारे अप्रतिम गद्यकाव्य आहे. त्याचे पारायण आमच्या पिढीने तर केलेच, पण घरोघरी येणारी पिढी करत राहील.
 
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. पगडी आणि पागोट्याचे राजकारण करणाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली. अशा श्रद्धांजलीला इंग्रजीत 'Crocodile Tears' म्हणजे 'मगरीचे अश्रू' म्हणतात. ज्यांनी बाबासाहेबांचे मूल्यमापन त्यांच्या जन्मजातीवरून केले, जन्मजातीचा शिक्का मारून त्यांच्या शिवचरित्रावर आक्षेप घेतले, त्यांनी मगरीचे अश्रू ढाळू नयेत. त्यांना ज्या प्रकारचे शिवाजी पाहिजेत, त्याप्रकारचे शिवाजी महाराज बाबासाहेबांनी मांडलेले नाहीत. बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज मराठा जातीचे राजे नाहीत. नेहरुप्रणित 'सेक्युलॅरिझम'चे राजे नाहीत आणि डाव्या विचारसरणीप्रमाणे शोषित, पीडित समाजाचे राजे नाहीत, ते हिंदू राजे होते. बाबासाहेबांनी आपल्या शिवचरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक वृत्ती, सर्व जातीपातीच्या लोकांबरोबर घेऊन जाण्याची मानसिकता, तसेच मुसलमानांनादेखील सेवेत रुजू करून घेण्याचा उदारपणा नावानिशी आणि पुराव्यानिशी मांडलेला आहे.
 
 
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श हिंदू राजे होते. आदर्श हिंदू राजा समाजाचा जातीनिहाय विचार करीत नाही. उपासना पंथाच्या आधारे तो भेदभावाचे राज्य करीत नाही. आपले मत दुसऱ्यावर लादण्याचा तो अजिबात प्रयत्न करत नाही. प्रत्येकाला पूर्ण उपासना स्वातंत्र्य तो देतो. वेगळा धर्म मानतात म्हणून कोणाचाही तो वध करत नाही. वेगळ्या धर्माच्या लोकांना ठार करणे ही इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, रशिया या ख्रिश्चन देशांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे देश ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळे पंथदेखील सहन करत नाहीत आणि त्यांचे विद्वान आम्हाला 'सेक्युलॅरिझम'चे धडे देतात. आपले मूर्ख विद्वान त्याची पोपटपंची करून आपल्याला सांगतात आणि पगडी-पागोट्याचे राजकारण करणारे तोच राग आळवीत बसतात.
 
 
छत्रपती शिवाजी महाराज हे आणखी एका कारणासाठी आदर्श हिंदू राजे होते. त्यांना 'सर्वधर्मसमभाव' हा शब्द उच्चारण्याची गरज वाटली नाही. जातिनिर्मूलनाचा डंका पिटण्याची त्यांना गरज वाटली नाही. समतेचे राज्य याची पोपटपंची करण्याची गरज वाटली नाही. आदर्श हिंदू राजा म्हणजे समानता, म्हणजे सर्वधर्मसमभाव, म्हणजे श्रेष्ठ नैतिक मूल्यांवर आधारित राज्य, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाची पारायणे केली पाहिजेत. या ग्रंथात ऐतिहासिक किचकटपणा नाही. डोके दुखाविणारी सणावळी नाही. महाराजांच्या झंझावती जीवनाचा तेवढ्याच झंझावती शब्दात या ग्रंथात परिचय घडत जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन लोकविलक्षण घटना प्रसंगांनी भरलेले आहे. बाबासाहेब त्यांना देवत्व अर्पण करीत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्याप्रमाणे मानव होते. प्रत्येक मनुष्यात प्रचंड आंतरिक शक्ती असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विकास केला. 'योजकता' हा महाराजांचा फार महान गुणधर्म आहे. वेळेचे काटेकोर पालन आणि योजनेतील बारीकसारीक तपशीलाचा पूर्ण विचार, हे महाराजांचे सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य आहे.
 
 
बाबासाहेबांनी महाराजांच्या योजकतेवर भर देऊन अफजलखानाचा वध, लाल महालावर हल्ला आणि आग्र्याच्या कैदेतून सुटका हे सर्व प्रसंग तपशीलानिशी सांगितलेले आहेत. या प्रत्येक प्रसंगी योजनेत थोडीशी जरी चूक झाली असती, तर प्राण गमविण्याची पाळी होती. अफजलखानाच्या भेटीला जाताना, ठरलेल्या अटीप्रमाणे नि:शस्त्र जायचे होते. अफजलखान नि:शस्त्र येणार नाही, हे महाराजांना ठाऊक होते. म्हणून तेही शस्त्र घेऊन गेले. पोट फाडण्याचे शस्त्र त्यांच्या कमरेच्या शेल्यात होते. अफजलखानाने पहिल्यांदा वार केला आणि मग महाराजांनी हा बिछवा किंवा वाघनखे अफजलखानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. समजा, अफजलखानाने वार केला नसता तर काय झाले असते? तरीही महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला असता. कारण, त्याला ठार करण्याच्या हेतूनेच महाराज त्याच्या भेटीला गेले होते. जो आक्रमक आहे, धर्मद्रोही आहे, संस्कृती विध्वसंक आहे, त्याला जगण्याचा अधिकार नाही. तो आपल्या कृत्यानेच मेलेला असतो. त्याला मारण्याइतके जगातील कोणतेही पुण्य नाही, महाराजांनी ते केले. त्याचा मसूद अझहर केला नाही. बाबासाहेब असे सांगत नाहीत. कारण, त्यांना ऐतिहासिक घटना जशी घडली, तशी सांगायची आहे. जे घडलं त्याचा मागचा विचार काय असावा, हे ते वाचकांवर सोडून देतात. शिवचरित्राचे प्रसंग वाचायचे आणि बाबासाहेबांच्या लेखणीतून वाचताना ते प्रसंग नसतात, तर ती जीवंत शब्दचित्रे असतात. त्याचे अर्थ आपण काढायचे.
 
 
बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य घरोघर पोहोचविले. हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि छत्रपती शिवाजी यांच्यामुळे अस्मिता धारण करणारा झाला. महाराष्ट्रात राहणारे आम्ही मराठी माणसे आहोत, हीच आमची ओळख. जातिनिहाय ओळख हे पगडी-पागोट्याचे राजकारण झाले. ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आणि राजा शिवछत्रपती महाराजांचे चरित्र यांच्यातून एक उत्तुंग ध्येयवाद निर्माण होतो. विश्वाला गवसणी घालण्याची ऊर्जा निर्माण होते. पराक्रमासाठी मन आसुसते. समूहरुपाने आम्हाला कोणते लक्ष्य गाठायचे आहे, याची प्रेरणा निर्माण होते. आज ती दुर्मीळ झालेली आहे. जातीपातीचे राजकारण, नेत्यांचे व्यक्तिगत हेवेदावे, आरोपप्रत्यारोप, स्वार्थासाठी असंगाशी संग करण्याची वृत्ती, अन्याय-अत्याचार याची चलती दिसते आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलेला आहे. हा मार्ग 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथातून आपल्यापुढे बाबासाहेबांनी ठेवलेला आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, या मार्गाने आपण चालणार की फक्त 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देणार?
 
 
@@AUTHORINFO_V1@@