तैवानवर ताबा घेण्याची शी जिनपिंग यांची इच्छा दुधारी तलवारीसारखी आहे. तैवान जिंकण्यात यशस्वी झाले, तर चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील शी जिनपिंग यांची पकड मजबूत होईल आणि त्यांचे महत्त्व वाढेल. त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातील विरोधकांची तोंडे बंद होतील...
न तैवानवर आक्रमणाच्या तयारीत आहे का? सध्या तैवान बाबतीतील या प्रश्नावर जगभरातून चर्चा होताना दिसत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या विस्तारवादी कारवायांची व्याप्ती वाढविली असून हाँगकाँगवरील पकड व ‘साऊथ चायना सी’मधील हालचाली त्याला दुजोरा देणार्या ठरतात. हाँगकाँगवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ लादून तेथील पकड घट्ट करणार्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपले लक्ष आता तैवानवर केंद्रित केले आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उघडपणे तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करून ते कोणत्याही मार्गाने होणारच, याची ग्वाही दिली होती. या प्रश्नावर चर्चा करताना खालील मुद्द्यांचा विचारविमर्श करणे महत्त्वाचे वाटते.
- शी जिनपिंग यांच्या तैवानचा ताबा घेण्यामागील कालमर्यादा
- आंतरराष्ट्रीय परिस्थिती
- चीनमधील कम्युनिस्ट पक्षामधील शी जिनपिंग यांचे स्थान
- चीनची मित्रराष्ट्रे
- चीनच्या राजवटीकडून दिले जाणारे चीनच्या जनतेसाठीचे संकेत
- तैवानची स्वतःची संरक्षणाची तयारी आणि सावधानता
शी जिनपिंग यांच्या तैवानचा ताबा घेण्यामागील मर्यादा
येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये चीनमध्ये भरल्या जाणार्या हिवाळी ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा या चीनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अमेरिकेत आणि युरोपमध्ये अनेक सामाजिक संघटना आणि सामान्य लोकांचा चीनमध्ये भरणार्या ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होण्याला विरोध आहे. कोरोना विषाणचा जगभरातील प्रसार आणि त्याचा चीनमधील वुहान येथून झालेला तथाकथित उगम या बातमीमुळे जगातील अनेक देशांमधील लोक चीनवर नाराज आहेत. त्यातच चीनमधील हवेतील प्रदूषणाच्या पातळीमुळे आणि तेथील हवेतील कार्बन कणांच्या प्रमाणामुळे अनेक देश या कारणासाठी बीजिंग हिवाळी ‘ऑलिम्पिक’वर बहिष्काराच्या मनःस्थितीत आहेत.
चीनमध्ये परत एकदा कोरोना विषाणूच्या सुरू झालेल्या तिसर्या लाटेमुळे अनेक शहरांमध्ये ’लॉकडाऊन’ सुरू झालेला आहे. चीनमध्ये विजेच्या टंचाईमुळे अनेक शहरांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. काही शहरांमध्ये हिवाळा सुरू झालेला आहे आणि विजेच्या टंचाईमुळे ‘हिटर’ लावण्यापासून ते प्रकाश, बिल्डिंगमधील बंद असणार्या ’लिफ्ट्स’ यामुळे चीनमधील स्थानिक लोकही तेथील सरकारवर प्रचंड नाराज आहेत. चीनमधील अनेक कंपन्या बंद आहेत. चीनमधील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. चीनमधील सर्व प्रसारमाध्यमे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली असल्याने तेथील अंतर्गत परिस्थितीची वस्तुस्थिती जगासमोर येत नाही.
चीनच्या राजवटीकडून दिले जाणारे चीनच्या जनतेसाठीचे संकेत
नुकतेच चीनमधील राजवटीने तेथील नागरिकांना पुढील काही महिन्यांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. सरकारकडून सूचना येताच तेथील ‘सुपरमार्केट्स’मध्ये गर्दी उसळली. लोक गरजेपेक्षा अधिक सामान खरेदी करू लागले.तांदूळ, सोया सॉस, चिली सॉस यांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. चीनमधील बहुतांश ‘सुपरमार्केट्स’मध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले होते. या आदेशानंतर लोकांनी तेथील दुकानांमधून मोठ्या प्रमाणात धनधान्य आणि अनेक जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. एकीकडे तैवानसोबत युद्ध करण्याच्या मनःस्थितीत चीनचे सरकार असल्याचा तेथील सामान्य जनतेचा समज झाला, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पुन्हा नव्याने ’लॉकडाऊन’ची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या कारणाखाली हा आदेश दिल्याचे तेथील प्रशासनाने नंतर सांगितले.
चीनमधील कम्युनिस्ट पक्षामधील शी जिनपिंग यांचे स्थान
शी जिनपिंग यांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये असणारा तीव्र विरोध आणि कम्युनिस्ट पक्षातील अनेक नेते जिनपिंग यांना सत्तेवरून हटविण्यासाठी शोधत असलेली संधी याही गोष्टी लक्षवेधी आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या ६५० दिवसांहून अधिक दिवस एकही परदेश दौरा केला नसून कोणत्याही जागतिक नेत्याची प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यात जगातील आघाडीचे नेते विविध कार्यक्रम व बैठकांच्या माध्यमातून परस्परांची वैयक्तिक पातळीवर भेट घेत आहेत. मात्र, शी जिनपिंग यांचा त्यात समावेश नाही. ही बाब जिनपिंग यांच्याबाबतचे गूढ वाढविणारी आहे.शी जिनपिंग गेल्या दीड वर्षात चीनच्या बाहेर पडलेले नाहीत. शी जिनपिंग यांनी चीनमधून बाहेर न पडण्यामागे अनेक छुप्या कारणांची दबक्या आवाजात जगभरात चर्चा केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हवामान बदल विषयावर आणि ‘जी २०‘ या जगभरातील २० प्रमुख अर्थव्यवस्था असणार्या देशांची जी परिषद भरली होती, त्या दोन्हीही परिषदांना शी जिनपिंग यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली नाही. जिनपिंग यांच्या या अनुपस्थितीची दखल घेऊन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्यांना टोलाही लगावला होता. यापूर्वी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थिती ही चीनमधील अंतर्गत आव्हाने जिनपिंग यांच्यासाठी जास्त महत्त्वाची असल्याचे संकेत देणारी आहेत असे ‘द सिंगापूर पोस्ट’ने म्हटले आहे. जिनपिंग यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गैरहजेरीची चार कारणे असण्याची शक्यताही लेखात वर्तविण्यात आली आहे. खासगी क्षेत्रावर सुरू असलेली कारवाई, अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के व त्यामुळे होणारी वाढती टीका, आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची डागाळलेली प्रतिमा आणि २०२२मध्ये होणारे कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन ही ती कारणे असू शकतात, असा दावा ‘द सिंगापूर पोस्ट’नेकेला.अर्थात, जिनपिंग यांच्यासोबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही दोन्ही परिषदांना उपस्थिती लावली नाही. शी जिनपिंग यांना चीनबाहेर पडल्यास कम्युनिस्ट पक्षातील प्रतिस्पर्धी तेथील सत्तेचा ताबा घेतील आणि शी जिनपिंग यांना सत्तेतून दूर केले जाईल, अशी भीती वाटते का ? हा एक प्रश्न दबक्या आवाजात विचारला जातो.
सोव्हिएत रशियाचे एकेकाळचे गाजलेले अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना ते त्यांच्या कुटुंबासकट पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्या विश्वासू सहकार्याने म्हणजे निकोलाय ब्रेझनेव्ह यांनी क्रुश्चेव्ह यांना सोव्हिएत रशियाच्या सत्तेतून दूर केले होते आणि सत्तेचा ताबा घेतला होता. ही घटना जुनी असली तरी रशियामध्ये त्यावेळी तेथील कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता हे विसरता नये. शी जिनपिंग यांच्यासमोर हा इतिहास असावा, असे वाटते. चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील शी जिनपिंग यांच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांना जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षांत शिताफीने बाजूला केले आहे आणि काही तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तेथील तुरुंगात खितपत पडले आहेत. इतर काही जणांचे उद्योगधंदे (रिअल इस्टेट, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्र, ऑनलाईन शिक्षण देणार्या कंपन्या) धुळीला मिळाले आहेत.
शी जिनपिंग यांचे अनेक पूर्वसुरी अध्यक्ष आणि त्यांचे तेथील कम्युनिस्ट पक्षातील समर्थक यांच्याकडून जिनपिंग यांना बेसावध क्षणी आव्हान मिळू शकते. परिस्थितीच्या या मर्यादा लक्षात घेतल्या, तर शी जिनपिंग किमान फेब्रुवारी २०२२ मध्ये बीजिंग येथे भरत असणार्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा होईपर्यंत, तरी तैवानवरील आक्रमणाचा विचार करतील असे वाटत नाही. जर चुकून असे आक्रमण तैवानवर झालेच तर ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेवर जगातून बहिष्कार टाकला जाईल अथवा बहिष्कार टाकण्यास सबळ असे कारण इतर देशांना मिळेल, हे वेगळे सांगणे न लगे.
चीनची मित्रराष्ट्रे
सध्या रशिया सोडला तर चीनच्या तैवानबद्दल असणार्या भूमिकेवरून चीनची उघडपणे पाठराखण करणारा दुसरा मोठा देश नाही. अमेरिका, युरोप आणि इतर देश वेगळ्या मार्गाने चीनला असे सुचवत आहेत की, तैवानचे चीनमधील विलिनीकरण तैवानच्या सहमतीने आणि शांततेने झाले तर आमची काही हरकत नाही. फक्त यामध्ये जोर जबरदस्ती होता कामा नये आणि येथेच खरी मेख आहे. कारण, लोकशाही शासनव्यवस्था असणार्या तैवानला कम्युनिस्ट चीनमध्ये सामील होण्याची इच्छा नाही.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती
युरोपातील झेक प्रजासत्ताक, लिथुआनिया, स्लोव्हाकिया यांनी उघडपणे तैवानला समर्थन दिलेले आहे. लिथुआनियाने तर तैवानच्या नावाने राजदूतावास उघडण्यासाठी तैवानला आमंत्रित केले आहे. युरोपियन संसदेच्या ११ सदस्यांच्या शिष्टमंडळाने फ्रान्सच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली तैवानला भेट दिली होती आणि तैवान हा एकटा नाही, आम्ही सर्व त्याच्यामागे उभे आहोत, असे जाहीर केले होते. अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील काही सदस्यांनीही मागील महिन्यात तैवानचा दौरा केला होता. अमेरिकेचे सुमारे १०० पेक्षा जास्त सैनिक तैवानमध्ये उपस्थित असल्याचे सांगितले जाते. ऑस्ट्रेलिया हा देशही ठामपणे स्वतंत्र तैवानच्या समर्थनासाठी उभा आहे, असे दिसते आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जपान यांच्या नौदलांचा दक्षिण चिनी समुद्रातील युद्धाभ्यास हाही चीनला इशारा देणारा आहे.
चीनच्या तैवानवरील आक्रमणाच्या मनसुब्याला प्रखर विरोध दर्शविला आहे तो जपानने. नजिकच्या काळात तैवानवर हल्ला झालाच, तर त्याच्या संरक्षणासाठी जपानदेखील संघर्षात उतरेल, अशी ग्वाही जपानी नेतृत्त्वाकडून वारंवार देण्यात देण्यात येत आहे. त्यासाठी जपानने जोरदार तयारीही सुरू केली असून तैवाननजिक असणार्या बेटावर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम’ तैनात करण्याचे संकेत दिले आहेत. जपानी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वीच जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानजवळ असलेल्या बेटाला भेटही दिली होती. जपानच्या ‘द ओकिनावा टाईम्स’ या दैनिकाने, योनागुनी आयलंडवरील नव्या तैनातीचे वृत्त दिले आहे. हे बेट तैवानपासून जवळच्या भागात आहे. या बेटावरून साध्या डोळ्यांनी तैवानची हद्द दिसते, असे सांगण्यात येते. जपान सरकारने या बेटावर संरक्षण तैनाती वाढविण्यास सुरुवात केली असून त्यात लष्करी तुकडी व टेहळणी तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम’चा समावेश आहे. तैवानच्या सागरी क्षेत्रासह ‘ईस्ट चायना सी’मधील चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. जर चुकून माकून चीनने तैवानवर ताबा मिळविलाच तर त्याचा मोठा धोका जपान आणि दक्षिण आशियातील व्हिएतनाम, कंबोडिया, फिलिपिन्स, थायलंड, सिंगापूर यांना असू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चीनला तैवानवर ताबा घेण्यापासून रोखणे हे जपानसमोरील प्रथम उद्दिष्ट आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात जपानने ‘ईस्ट चायना सी’मधील इशिगाकी बेटावर क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या क्षेपणास्त्रांमध्ये विमानभेदी तसेच विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश असेल, असे जपानकडून सांगण्यात आले होते.
चीनमधील अंतर्गत पातळीवर असलेले दडपण व परदेशात तीव्र होत असलेले टीकेचे सूर यामुळे शी जिनपिंग हे काही साहसवादी कृती करण्यास उद्युक्त झाले असावेत का, असे अनेक परदेशी विश्लेषक सांगतात. हाँगकाँगला ज्या वेगाने चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली आणले जात आहे, तेही शी जिनपिंग यांना झालेली घाई दर्शवितो आहे.अर्थात, तैवानवर ताबा घेण्याची शी जिनपिंग यांची इच्छा ही दुधारी तलवारीसारखी आहे. तैवान जिंकण्यात यशस्वी झाले, तर चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील शी जिनपिंग यांची पकड मजबूत होईल आणि त्यांचे महत्त्व वाढेल. त्यांच्या कम्युनिस्ट पक्षातील विरोधकांची तोंडे बंद होतील अथवा ते कमजोर होतील. पण जर तैवान घेताना अमेरिका आणि त्यांची मित्रराष्ट्रे यांच्याकडून तीव्र विरोध झाला आणि चीनला या लढाईतून माघार घ्यावयास लागली, तर मात्र शी जिनपिंग यांची तेथील कम्युनिस्ट पक्षातून उचलबांगडी ही निश्चित असेल.
तैवानची स्वतःची संरक्षणाची तयारी आणि सावधानता
चीनकडून तैवानवरील हल्ल्यासाठी आखण्यात येणार्या योजना व त्यासाठी सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर तैवानने ‘साऊथ चायना सी‘मध्ये पाणबुडी तैनात केली आहे. तैवानने आपली पाणबुडी ‘स्प्रार्टले आयलंड‘ नजिकच्या ‘तायपिंग आयलंड‘जवळ तैनात केल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ही बाब तैवान चिनी आक्रमणाच्या धोक्याविरोधात गांभीर्याने पावले उचलत असल्याचे दर्शविते. तैवानच्या संरक्षणदलात सध्या फक्त दोन पाणबुड्या असून गेल्या वर्षभरात तैवानने स्वदेशी पाणबुड्यांच्या उभारणीस सुरुवात केली आहे. तैवान सरकार चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक निर्णय घेत असून संरक्षणसिद्धतेवर विशेष भर देण्यात आला आहे. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे यांच्या साहाय्याने चीनला रोखण्याचे इरादे तैवानी अधिकारी तसेच विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहेत.
फ्रान्सची एक युद्धनौका मागील महिन्यात तैवानच्या बेटावर काही काळ उभी होती. अमेरिकन, ब्रिटिश नौदलाच्या विमानवाहू नौका ठराविक काळाने तैवानजवळून गस्त घालत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या काळात शी जिनपिंग हे चीनच्या कोणत्या सीमेवर (भूसीमा अथवा सामुद्री सीमा) कोणते साहस करण्यास उद्युक्त होतात, हे बघावे लागेल.
- सनत्कुमार कोल्हटकर