ग्रेट बॅरिअर रिफ’मधील जैविक विविधतेचा वारसा महाराष्ट्राला मिळाला आहे, तो म्हणजे ‘आंग्रिया बँक’ या प्रवाळ बेटाच्या रुपाने. समृद्ध सागरी किनारा लाभलेल्या कोकण किनारपट्टीवरुन काहीशे किलोमीटर अंतरावर असणार्या या बेटाला आता संरक्षित करण्याच्या हालचालींना वेग मिळाला आहे.
कोकणातील विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्रात १३० किमी अंतरावर आणि रत्नागिरीच्या किनार्यापासून १०५ किलोमीटरवर ‘आंग्रिया बेट’ आहे. ते २० ते ४०० मीटर खोलीवर पसरलेले असून भारताच्या पश्चिम किनार्याजवळचे एक महत्त्वाचे भूवारसास्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्ग येथून मोहिमा सांभाळत होते. त्यामुळे त्यांचे नाव या प्रवाळ बेटाला देण्यात आले आहे. गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत National Institute of Oceanography - NIO) १६ डिसेंबर, २०१३ पासून या बेटाचे सविस्तर संशोधन सुरू झाले आहे. ‘एनआयओ’ आणि ‘केंद्रीय सागरी मात्सिकी संशोधन संस्था’ तसेच ‘भारतीय वन सर्वेक्षण’ (FSI) यांनी प्राथमिक सर्वेक्षण करून या प्रदेशात विस्तृत प्रवाळ खडकांचे आणि प्रवाळांचे अस्तित्व असल्याचे याआधी म्हटले होतेच. २०१९ साली ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया’च्या टीमने महाराष्ट्र वन विभागाच्या ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या मदतीने ‘आंग्रिया बँक’ येथे जाऊन सर्वेक्षण केले. या टीमने दहा दिवसांत ६६ वेळा या भागात ‘डायव्हिंग’ करून सुमारे ३०० हून अधिक सागरी प्रजातींची नोंद केली होती. ‘आंग्रिया बँक’ या प्रवाळ बेटाचे संपूर्ण व सविस्तर संशोधन करणे हे एक महाकठीण काम आहे. प्रवाळ भित्तीचा (Coral reef) भूवारसा असलेला हा प्राचीन प्रदेश ‘सुरक्षित क्षेत्र’ म्हणून जाहीर करावा असा प्रस्ताव ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर ऑगस्ट २०२० मध्ये राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे मांडण्यात आला आहे.
“आंग्रियाला असलेले धोके
जागतिक तापमान वाढीमुळे ज्याप्रमाणे ग्रेट बॅरिअर रिफमधील प्रवाळांचे मोठ्या प्रमाणात आम्लीकरण होऊ लागले आहे, तसाच धोका आंग्रिया बँकला देखील आहे. आंग्रिया बँकचे सरक्षण गरजेचे आहे. कारण, ही महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली एकमेव कोरल रीफ आहे.सद्यपरिस्थितीत आंग्रिया बँकला कोणत्याही प्रकारचे कायद्याचे संरक्षण नाही. या ठिकाणी नौदलाचा वावर असतो. शिवाय या परिसराच्या आसपासच्या भागात तेल आणि नैसर्गिक वायूसाठी उत्खननाचेही प्रस्ताव पुढे आले होते. या सगळ्यामुळे येथील प्रवाळांना धोका निर्माण होऊ शकतो.आंग्रिया बँकचा पर्यटनाच्या दृष्टीनंही विकास करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र तसा विकास करताना इथे किती लोक जाणार यावर नियंत्रण ठेवावं लागेल.”
‘आंग्रिया बँक’वरचा भाग आसपासच्या समुद्रापेक्षा तुलनेने उथळ आहे आणि तिथे समुद्राची खोली कमीत कमी २४ मीटर ते सरासरी २८ मीटर एवढी आहे. ‘आंग्रिया बँक’च्या दोन्ही बाजूंना समुद्राची खोली वाढत जाते आणि काही ठिकाणी ती अगदी ४०० मीटरपर्यंत खोल आहे. हा प्रदेश ‘कॉन्टिनेंटल शेल्फ’ म्हणजे सागरमग्न खंडभूमीचाच भाग आहे. म्हणजेच एकेकाळी हिमयुगादरम्यान हा भाग पाण्याच्या वर होता. मग सुमारे ११,६५० वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपले, तेव्हा समुद्राची पातळी वाढल्याने हा भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर हजारो वर्षांत इथे हळूहळू प्रवाळ आणि त्याच्या साथीने सागरी जीवन बहरत गेले आणि हे प्रवाळ बेट आकाराला आले. ‘आंग्रिया बँक’ हे एक बुडालेले कंकणाकृती प्रवाळ बेट (Atoll) आहे. जगातील सर्वात मोठा प्रवाळ साठा तिथे असावा, असा अंदाज केला गेला होता. या प्रवाळ प्रदेशाकडे जाण्यासाठी, वन्यजीव संधारण संस्था (Wildlife Conservation Society - WCS) आणि सागरी जीवसंपदा आणि पर्यावरणशास्त्र केंद्र (Centre for Marine Living Resources and Ecology - CMLRE) यांच्यामार्फत मोहिमा आखल्या जात असल्या तरी अजूनही तिथे जाणे सुकर झालेले नाही. आंग्रियाच्या या बुडालेल्या मंचाचे दर्शन घेणे आजही साहस पर्यटनाचा (Adventure Tourism) भाग आहे. जैवविविधतेने समृद्ध असा हा २०११ चौरस किमी क्षेत्रफळाचा प्रवाळ प्रदेश भारताच्या समुद्रबूड जमिनीच्या (Continental Shelf) सीमेजवळच आढळतो. त्याची उत्तर-दक्षिण लांबी ४० किमी असून पूर्व-पश्चिम रुंदी १५ किमी आहे. प्रवाळांची भरपूर वाढ आणि अत्यंत दुर्मीळ अशा ‘व्हेल शार्क’चे अस्तित्व यामुळे या प्रदेशाला अनेक दृष्टींनी महत्त्व प्राप्त झाले आहे. अजूनही या भागाचे संपूर्ण संशोधन होणे बाकी आहे.
‘आंग्रिया’ला संरक्षणाचे कवच
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्राची सीमा १२ सागरी मैल अंतरापर्यंत आहे. १२ ते २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्याला ’विशेष आर्थिक क्षेत्र’ (Exclusive Economic Zone) म्हटले जाते.हे संपूर्ण क्षेत्र ’परराष्ट्र मंत्रालया’च्या अधिकाराअंतर्गत येते. सागरी जैवविविधता संवर्धनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात केवळ दोन क्षेत्रांना संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये ’मालवण सागरी अभयारण्य’ आणि ’ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या’चा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले आंग्रिया प्रवाळ बेट कोकण किनारपट्टीपासून ५६.७ सागरी मैल दूर आहे. या बेटाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याठिकाणी जाता येत नाही. मात्र, या बेटावरील सागरी जैवविविधता लक्षात घेता तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. यासाठी वन विभागाच्या ’कांदळवन कक्षा’ने या बेटाला ’सागरी क्षेत्र कायद्या’अंतर्गत ’विशेष आर्थिक क्षेत्रा’मध्ये संरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ‘आंग्रिया प्रवाळ बेट’ हे १२ सागरी मैलाच्या पुढे येत असल्याने ते ’परराष्ट्र मंत्रालया’च्या अधिकाराअंतर्गत येते. त्यामुळे अशा परिस्थितीत या क्षेत्राला ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत संरक्षित करता येत नाही. सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या या बेटाला केवळ ’परराष्ट्र मंत्रालया’च्या ’सागरी क्षेत्र कायद्या’अंतर्गत कायदेशीर संरक्षण देता येईल. म्हणूनच त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे.
‘आंग्रिया बेटा’वरील सर्वेक्षणे...
’बीएनएचएस’चे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी १९९० साली या बेटाला भेट दिली होती. त्यानंतर या बेटाचे सर्वप्रथम सर्वेक्षण आणि छायाचित्रण २००८-०९ च्या सुमारास सारंग कुलकर्णी यांनी केले होते. २०१४ साली ’यूएनडीपी’ प्रकल्पाअंतर्गत ’कांदळवन कक्ष’ आणि ’राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था’ने (एनआयओ) या बेटाचे सर्वेक्षण केले. त्यानंत २०१९ च्या अखेरीस ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ आणि ’डब्ल्यूसीएस’ने ‘आंग्रिया बेटा’च्या सागरी जैवविविधतेचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना प्रवाळांच्या १५० हून अधिक प्रजाती, माशांच्या १२० प्रजाती, ‘इनव्हर्टीब्रेट’च्या ४० हून अधिक प्रजाती आढळून आल्या.