भगूरनगरीचा समाजसेनानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2021   
Total Views |

manse 2.jpg_1  



भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा नवा अध्याय निर्माण करणार्‍या भगूरमधून सामाजिक कार्याची वीण घट्ट करणार्‍या मंगेश मरकड यांच्याविषयी...

आपले कुटुंब व उदरनिर्वाह सांभाळत असतानाच त्याबरोबरच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून देऊन कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत असताना एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे मंगेश कचरू मरकड.जन्मगाव नाशिक जिल्ह्यातील भगूर असल्याने क्रांतिभूमी असलेल्या या भूमीकडून त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीचे संस्कार व ऊब मिळाली. त्याचप्रमाणे बालपणापासूनच संघसंस्कार झाल्याने त्यांची कार्यकर्ता म्हणून उत्कृष्ट जडणघडण झाली. शालेय जीवनातच त्यांनी नगर कार्यवाह, सहकार्यवाह अशा जबाबदार्‍या पार पाडल्या. नोकरीची सुरुवात करताना सर्वप्रथम दै. ‘रामभूमी’ व त्यानंतर ’नाशिक तरुण भारत’ या ठिकाणी त्यांनी ‘डीटीपी ऑपरेटर’ म्हणून नोकरीही केली. ‘तरुण भारत’ला नोकरी करीत असतानाच अनेकदा स्तंभलेखन केले, मुख्यमंत्री दौर्‍याचे वृत्तसंकलन करण्याचीदेखील त्यांना संधी मिळाली. पुढे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील शासकीय नोकरीत काही काळ गेल्यानंतर त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे २००६ पासून त्यांनी ‘भारतीय मजदूर संघा’चे कार्य सुरू केले. ‘भारतीय मजदूर संघा’च्या ‘देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम’ या घोषवाक्याचा खोलवर परिणाम झाल्याने या घोषणेप्रमाणेच क्षेत्र कोणतेही असो, सर्वांनीच देशहित सर्वोच्च स्थानी ठेवून कार्य करावे, ही भूमिका केंद्रस्थानी ठेवून त्यांनी शासकीय कर्मचारी संघाचे जिल्हा पातळीवर कार्य सुरू केले. त्यानंतर २००९ मध्ये वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील गट ‘क’ कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. विविध आंदोलने, प्रश्न हाताळणे, प्रश्न मांडणी व विविध स्तरांवरील चर्चा त्याचप्रमाणे संघटन कौशल्य यामुळे या खात्यातील दुर्लक्षित असलेला लिपीक संवर्ग संघटित करण्यास त्यांना चांगले यश मिळाले. या कामगिरीमुळे त्यांची ‘महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघा’च्या प्रदेश कार्यकारिणीवर सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. कामगार, कर्मचारी क्षेत्राबरोबरच त्यांनी सहकार क्षेत्रातदेखील पाऊल टाकले. २००९ पासून ते आजपर्यंत ‘आयटीआय कर्मचारी पतसंस्था’, नाशिक जिल्हा या संस्थेच्या निवडणुकांमध्ये सलगपणे विजयी होऊन संचालक म्हणून ते काम पाहत आहेत व त्यायोगे सभासदांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा व पारदर्शक कामकाज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच विविध खात्यांच्या लिपिकांचे प्रतिनिधित्व करणारी ‘लिपीक हक्क परिषद’ या शीर्ष संघटनेच्याही नाशिक विभागाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अशा या विविध संघटनात्मक कामकाजाबरोबरच कर्तव्यस्थानी म्हणजेच ‘आयटीआय’मध्येदेखील ते गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये शासन, शासकीय मालमत्ता, शासकीय उपक्रम व आपले कर्तव्य याविषयाबाबत तसेच व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात उद्बोधन करीत असतात, व्याख्याने देत असतात. त्याचप्रमाणे ‘आयटीआय’ प्रवेशाच्या वेळी महिनाभर समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन करीत असतात. विविध कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी ‘आयटीआय’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मदतदेखील करतात, नोकरीसाठी साहाय्य करीत असतात व या माध्यमातून आपल्यातील सेवाभावी वृत्तीची जोपासना करीत असतात.




भगूर म्हणजे स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी, त्यांचे जन्मस्थान म्हणजे सावरकर स्मारक या ठिकाणी आहे. देश-विदेशातून सावरकरप्रेमी येथे येत असतात. सावरकरांच्या विचारांनी प्रथमपासूनच प्रभावित असल्याने मंगेश मरकड हे भगूरमध्ये ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह’ या संस्थेच्या माध्यमातून सतत क्रियाशील असतात. देशभक्तीपर व राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच भगूरमधील धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे भगूरमधील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे जे जे कार्य समाजाकडून दुर्लक्षित राहिलेले आहे, अशा कार्यकर्त्यांचे कार्य लेख स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे कार्यदेखील ते करीत आहेत. त्यांच्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना यापूर्वीच ‘गोदागौरव’ व ‘कार्यरत्न’ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.मंगेश यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रभक्त, सदाचारी, समाजशील व प्रामाणिक युवकांची व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी यापुढेदेखील शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे आपण सतत कार्यमग्न राहतो व त्यातून बुद्धीला चालना मिळते. त्याचप्रमाणे एक आत्मिक समाधान मिळते ते अवर्णनीय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या भगूरमधून भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा नवा अध्याय निर्माण झाला, त्याच भगूरमधून मरकड यांच्यामार्फत होणारे कार्य नक्कीच स्पृहणीय आहे. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!





@@AUTHORINFO_V1@@