मुंबई : दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारां’चे नुकतेच वितरण करण्यात आले. यामध्ये मराठी चित्रपट कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘बार्डो’ या मराठी चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कारामुळे आपल्या कष्टांचे चीज झाल्याचे उद्गार सावनी रवींद्र यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘वेब पोर्टल’ ‘महाएमटीबी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान काढले.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या भावना काय होत्या?
“पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या भावना सांगण्यासाठी खरेतर शब्दही अपुरे पडतील. कारण, हा पुरस्कार म्हणजे आजवर मी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे देवाने दिलेले हे फळ आहे. पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मी एका कार्यक्रमात होते. त्यामुळे सर्वप्रथम पुरस्काराची माहिती माझे पती डॉ. आशिष धांडे यांना समजल्यानंतर त्यांच्याकडून मला समजली. मी गरोदर असताना अशी आनंदाची बातमी माझ्यासाठी अलौकिक अशीच होती. यासाठी मी माझ्या कन्येला माझी ‘लकीचार्म’ मानते. कारण, माझी कन्या पोटामध्ये असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतचा काळ आमच्यासाठी आनंद घेऊन आला. मात्र, आता जबाबदारीसुद्धा वाढली आहे. आत्तापर्यंत मी ज्या प्रकारची गाणी गायली, त्याहीपेक्षा अधिक जास्त मेहनत घेऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील, अशी गाणी गाण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
तुमच्या एकंदरीत प्रवासामध्ये कुटुंबाने तुम्हाला कशापद्धतीने साथ दिली?
मला मिळालेला पुरस्कार म्हणजे इतक्या वर्षांच्या प्रयत्नाचे चीज असून माझ्या जडणघडणीमध्ये कुटुंबाचा सर्वात प्रमुख भाग आहे. लहानपणापासूनच माझ्यावर स्वरांचे संस्कार होत गेले. माझ्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडिलांचे कष्ट याचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले आहे. याबरोबरच लग्नानंतर माझ्या सासूसासर्यांनीदेखील खूप मोठा आधार दिला. या सर्वांच्या आधारामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे.
‘रान पेटलं’च्या ‘रेकोर्डिंग’चा अनुभव कसा होता?
आजवर मी अनेक प्रकारची गाणी गायली, अगदी शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपटातील ‘रोमँटिक’ किंवा भावनिक गाणीसुद्धा गायली. मात्र, या गाण्याचा आणि ‘रेकॉर्डिंग’चा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. माझा नैसर्गिक आवाजाचा पट्टा सोडून मी अगदी वेगळ्या पट्ट्यात हे गाणे गायले आहे. यामध्ये ‘बार्डो’ चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे आणि संगीतकार रोहन-रोहन यांचा खूप मोठा वाटा आहे. ’रान पेटलं’ या गाण्याची विशेषता म्हणजे, हे गाणे ‘रेकॉर्ड’ करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी माझ्या मूळच्या टोनमध्ये बदल करून ग्रामीण पद्धतीच्या आवाजात गाणे गाऊन घेतले. यावेळी आवाजाचा पोत बदलून ग्रामीण पद्धतीत गायन करू शकते, हा विश्वास त्यांनी मला दिला आणि एक वेगळी कलाकृती निर्माण झाली. हे गाणे नेहमीप्रमाणे कुठल्याही स्टुडिओमध्ये ‘रेकॉर्ड’ केलेले नाही. संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या ‘सेटअप’वर हे गाणे रेकॉर्ड केले आहे. हे गाणे गातानाही आणि ऐकतानाही हे भावूक करणारे आहे. या सर्व ‘सेटअप’मुळे तो भाव गाण्यामध्येसुद्धा अगदी उत्तमरित्या उतरला.
‘रान पेटलं’ हे कशासाठी खास आहे, असे वाटते ?
’रान पेटलं’ या गाण्यामध्ये एका आईचे मनोगत आहे. जेव्हा मी हे गाणे गायले तेव्हा माझे लग्नसुद्धा झाले नव्हते. परंतु, आज मी एका आईच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळी मी माझ्या दोन महिन्याच्या मुलीला घेऊन राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी गेले. जेव्हा राष्ट्रीय पुरस्काराची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर होते आणि आता मी आई झाले आहे. एका आईनेच गायलेल्या गाण्यासाठी मला हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे.