प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करीत मुरबाडच्या दुर्गम गावातून थेट ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या राज जयश्री संजय खंडागळे या युवकाचा प्रेरणादायी प्रवास...
स्वप्न पाहणं हा गुन्हा नाही. पण, स्वप्नांचा पाठलाग करताना अपार मेहनत, सातत्य आणि त्याग करण्याची तयार असावी लागते. ज्याला हे जमलं तो स्वप्नपूर्तीचा पुरेपूर आनंद लुटतो. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील साकुर्ली सारख्या दुर्गम गावातील राज जयश्री संजय खंडागळे या तरुणाने ‘आयआयटी बॉम्बे इन्स्टिट्यूट’मध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले. सध्या तो संख्याशास्त्र (स्टॅटेस्टिक) विषयात मास्टर्सचं प्रथम वर्ष पूर्ण करतोय. घरातला उच्चशिक्षण घेणारा हा पहिलाच मुलगा. ‘संख्याशास्त्र’ विषयात प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याची वाटचाल सुरू आहे.
मुरबाडच्या साकुर्ली गावी २२ ऑक्टोबर, १९९९ साली राजचा जन्म झाला. दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले. अजाणत्या वयात पितृछत्र हरपल्यावर वडिलांची त्रुटी त्याच्या आई जयश्री यांनी भरून काढली. लेकाला उच्चशिक्षित करायचं, त्याची सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कशाचीही कमतरता भासू द्यायची नाही, यासाठी ती माऊली चार घरची धुणीभांडी करू लागली. राजला एक बहीण असून तिचेही शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. आई, राज आणि बहीण असं त्याचं त्रिकोणी कुटुंब.
राज याने आपले चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण मुरबाडच्या जि. प. शाळा, साकुर्ली येथे पूर्ण केले. मात्र, गावी पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्याच्या मामांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी कल्याण येथे त्यांच्या घरी नेले. पाचवी ते दहावीपर्यंत मामांनीच त्याच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. पुढे मुरबाड येथील न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजला विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतला. आईची शिक्षणाची तळमळ, मामांचा पाठिंबा यामुळे राजने शिक्षणाची उमेद उरी बाळगली होती. अकरावीला असताना त्याच्या काही मित्रांनी एका खासगी कोचिंग क्लासेसच्या सरांना त्याच्या परिस्थितीबद्दल कळवलं. तेव्हा, त्या सरांनी त्याला माफक फीमध्ये शिकवले. त्यानंतर राजच्या मनात गणिताविषयी गोडी निर्माण झाली. एकमार्गी शिक्षण सुरू होतं, आईचे कष्ट करणारे हात त्याला नेहमीच अस्वस्थ करायचे, याच काळात ‘विद्यादान साहाय्यक सेवा मंडळ’ या शैक्षणिक, सामाजिक संस्थेची त्याला माहिती मिळाली. ‘विद्यादान’ संस्था गरीब, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करते. या संस्थेने घेतलेल्या मुलाखतीत राजने आपली छाप पाडली. त्यानंतर ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’ने शिक्षणासाठी त्याला संपूर्ण पाठिंबा दिला असून, अद्यापपावेतो या संस्थेची मदत त्याला मिळतच असल्याचे राज सांगतो.
परिस्थितीची जाण असल्याने राजने अभ्यासात कष्ट उपसणे सुरूच ठेवले. बारावी परीक्षेत त्याला ७८.६२ टक्के गुण मिळाले. संस्थेचे सहकार्य उत्तम असल्याने ‘बीएससी’साठी त्याने ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी जरी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी ‘विद्यादान’ने घेतली, तरी त्याच्या कुटुंबाची आर्थिक धुरा आई एकटीच वाहत होती. त्यामुळे तिला हातभार लावणेही तितकेच गरजेचे होते. म्हणून तो नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची शिकवणी घेऊ लागली. सोबतच महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांतही तो उत्साहाने सहभागी होत होता. महाविद्यालयातील उपक्रमामुळे त्याच्या वक्तृत्वकलेचा विकास झाला. त्यामुळे ठाणे, मुंबईमध्ये होणाऱ्या वक्तृत्व, वादविवाद, काव्य वाचन स्पर्धांमध्ये तो सहभागी व्हायचा. त्यातून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून आपले वैयक्तिक खर्च व आईलाही आर्थिक हातभार लावत असल्याचे राज सांगतो.
नोव्हेंबर २०२० मध्ये त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. ‘बीएससी संख्याशास्त्र’ ही पदवी तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. ‘विद्यादान’ संस्थेने दाखवलेला विश्वास राजने सार्थ ठरवला. त्याची ‘संख्याशास्त्र’ विषयातील रुची वाढलेली होती म्हणून त्यातच पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं, असं त्याने ठरवलं. फेब्रुवारी २०२१ मध्ये असलेली ‘आयआयटी’ (JAM) ही परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने तयारी सुरू केली. हातात केवळ तीन महिने होते. सगळ्या आवडी-निवडीला मुरड घालून त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिले. मेहनत कधीच वाया जात नाही, मेहनतीचे फळ निश्चित मिळते. याच तत्त्वावर त्याची ‘आयआयटी’ मुंबईमध्ये ‘एमएससी’ (MSc in applied statistics and informatics)साठी निवड झाली. ‘संख्याशास्त्र’ विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवणं, हे त्याचं पुढील ध्येय आहे.
“लहानपणापासून माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती म्हणजे वेळोवेळी मला भेटलेले शिक्षक आणि मुळातच शिक्षणक्षेत्रात काम करण्याची आवड, यामुळे ‘संख्याशास्त्र’ विषयाचा प्रोध्यापक होणं हे माझं स्वप्न आहे,” असे राज सांगतो. दुसऱ्याच्या घरात भांडी घासून घासून राकट झालेल्या आईच्या हाताकडे पाहून तो नेहमीच अस्वस्थ होतो. परिस्थितीने आईला अपार कष्ट करायला भाग पाडले, याची जाण त्याला आहे. आईच्या सुखासाठी त्याची धडपड सुरू आहे. “आताच्या युवा पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. अगदी यशसुद्धा; पण आपलं स्वप्न पूर्ण करताना परिश्रम आणि धैर्यासोबतच संयमाचाही कस लागतो, तो संयम शेवटपर्यंत टिकवता आला पाहिजे,” असा मौलिक सल्ला राज देतो. अशा, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत उच्चशिक्षणासाठी अविरत धडपड करणाऱ्या राज खंडागळे याला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!