‘...यासाठी हा लेखनप्रपंच’ हा रमेश पतंगे यांनी लिहिलेला लेख दि. २१ ऑक्टोबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यातील मुद्द्यांना प्रतिवाद करणारा अनिरुद्ध खोले यांचा लेख देत असून रमेश पतंगे यांच्या लेखातील मुद्दे आणि अनिरुद्ध खोले यांच्या प्रतिक्रियेतील मुद्दे यासंबंधीची भूमिका स्पष्ट करणारा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांचा लेख प्रकाशित करत आहोत.
सजसा देशावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत आहे तसतसे हिंदुत्वाला केंद्रित ठेवून देशापुढील विविध समस्यांच्या संदर्भात विचारमंथन सुरू आहे व ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्याच अनुषंगाने धार्मिक अल्पसंख्याकांच्या संदर्भात, विशेषत: मुस्लीम प्रश्नांसंदर्भातील चर्चा वेळोवेळी होत राहणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे. या अनुषंगाने रमेश पतंगे यांनी एक लेख लिहिला आहे.त्यावर विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्याच अनुषंगाने अनिरुद्ध खोले यांची प्रतिक्रिया ही एका वाचकवर्गाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. पतंगे यांचा लेख व ही प्रतिक्रिया या अनुषंगाने, पण स्वतंत्रपणे काही मुद्दे मांडावेत, या विचारांतून हा लेख.
संघाचे हिंदुत्वच एकमेव हिंदुत्व आहे का? म्हणजेच हिंदुत्वावर संघाची एकाधिकारशाही आहे का? संघाचे हिंदुत्वाबाबत वेगळेपण कोणते आहे? संघाव्यतिरिक्त इतर समाजाला हिंदुत्वासंबंधी बोलण्याचा अधिकार नाही का? हा हिंदूंचा देश असल्याने, सार्वजनिक ठिकाणी हिंदुत्वाच्या प्रतिके (व आवश्यक तर सक्तीने किंवा कायद्याच्या आधारे) प्रस्थापित करण्याचा हिंदू समाजाला अधिकार आहे, तो हिंदूंचा स्वाभाविक व न्याय्य अधिकार आहे व त्यासंबंधी कोणतीही तक्रार करण्याचा अन्य कोणालाही अधिकार नाही. मुस्लीम धार्मिक श्रद्धाच अशा आहेत की, ज्यामुळे मुस्लीम समाजासोबत कोणत्याही समाजाचे सहअस्तित्व अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांच्या भावना दुखावत असतील, त्यांनी देश सोडून जाण्यास हरकत नाही, असे काहीसे मुद्दे या लेखात मांडले गेले आहेत व ते मुद्दे प्रातिनिधिक आहेत. त्यासाठी त्याची दखल घेणे भाग आहे.
‘संघाचे हिंदुत्व’ वेगळे आहे का? व असल्यास त्याचे स्वरूप काय? हा पहिला प्रश्न आहे. संघ स्थापन झाला तेव्हा हिंदू धर्माविषयी सामाजिक व राजकीय स्तरावर अनेक विचारपरंपरा अस्तित्वात होत्या. त्यापैकी प्रमुख दोन. पहिली म. गांधींची. हे नाव ऐकल्यावर अनेकांना धक्का बसेल. पण गांधींचे नेतृत्व हे अस्सल भक्तिमार्गी हिंदूचे नेतृत्व होते. त्यांची प्रेरणा गीतेतील ‘अनासक्त कर्मयोगा’ची होती. त्यांची मूल्यपरंपरा ‘अहिंसा’, ‘सत्य’, ‘अस्तेय’ ही हिंदू परंपरेतील होती. त्यांचे उद्दिष्ट रामराज्याचे होते. भजन करणे हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग होता. कोणाचेही हृदय परिवर्तन होऊ शकेल, यावर त्यांचा विश्वास होता. लीग व जिना त्यांना हिंदूंचा नेता व काँग्रेसला हिंदूंचा पक्ष मानत. गांधी व काँग्रेस यांना मान्य नसले, तरी ती वस्तुस्थिती होती. तशीच हिंदू महासभा हा हिंदूंचा राजकीय पक्षही होता. हिंदूहितार्थ राजकारण, ही त्याची भूमिका होती. असे असतानाही डॉक्टर हेडगेवारांनी वेगळा संघ स्थापन केला. त्याची रचना मठ, मंदिर, भजन, पूजन या पारंपरिक धर्तीवर न करता, शिबिरे, संचलन, घोष आदी पद्धतीच्या युरोपियन धर्तीवर केली. याचे कारण पारंपरिक हिंदूपेक्षा डॉक्टरांना वेगळा हिंदू घडवायचा होता. संघाचे हिंदुत्व हे धार्मिक नसून राष्ट्रीय होते व त्यांचे उद्दिष्ट केवळ प्राचीन हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे नसून हिंदूंच्या सांस्कृतिक संचितावर आधारित विसाव्या शतकातील राष्ट्रभावनेच्या संदर्भात नव्या राष्ट्रनिर्माणाचे होते. 1952 साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत हिंदू महासभेला चार, वर्णाश्रमावर आधारित हिंदू धर्माचे पुनरूज्जीवन करण्याचे उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढविलेल्या स्वामी करपात्री महाराजांच्या अखिल भारतीय रामराज्य परिषदेला तीन व भारतीय जनसंघालाही तीन जागा मिळाल्या. या निवडणुकांनंतरही रामराज्य परिषदेला राजस्थान व अन्य उत्तरेकडील राज्यातील विधानसभेत जागा मिळत राहिल्या. जनसंघाने या दोन्ही पक्षासोबत विलिनीकरण करावे, किमानपक्षी युती करावी, असा बर्याच हितचिंतकांचा आग्रह होता. तरीही भारतीय जनसंघाने स्वतंत्रपणेच निवडणुका लढविल्या. कारण, जनसंघाची राजकीय भूमिका वेगळी होती व ती घेऊनच त्याला पुढे जायचे होते.
२०१४ साली भारतात जी निवडणुकीच्या मार्गाने राजकीय क्रांती झाली, त्याला अनेक घटक जबाबदार होते; हे बरोबर असले तरी संघ परिवाराने जी ‘इकोसिस्टीम‘ उभी केली ती त्याच्या केंद्रस्थानी होती, हे कोण नाकारू शकेल? क्रांती मग ती रशियातील असो की चीनमधील, ती जेव्हा यशस्वी होते तेव्हा त्यात अनेक समाज घटकांचा समावेश असतो. त्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, त्या क्रांतीमागे जे तत्त्वज्ञान असते ते वर्षानुवर्षे जोपासणारा जो गट असतो तोच त्या क्रांतीचा निर्माता असतो व त्यामुळे भविष्यकाळावरही त्याचाच अधिकार असतो. त्यामुळे रशिया व चीनचे भविष्य हे ‘कम्युनिस्ट पक्ष’, लेनिन, माओ यांनी ठरविले. कारण, तो त्यांचा अधिकार होता. संघाने काही मूलभूत धोरणांवर ‘हिंदुत्व’ विचार विकसित केला आहे, त्या आधारे वाटचाल केली आहे व त्याआधारे देशाचे व हिंदू समाजाचे भवितव्य काय असावे, हे सांगण्याचा अधिकार प्राप्त केला आहे.
संघाच्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे कर्मकांड नाही. संघाने हिंदुत्व जपण्याकरिता किंवा वाढविण्याकरिता मठ, मंदिरे स्थापन केली नाहीत की यज्ञयाग केले नाहीत. संघाने निर्माण केलेली सर्व कामे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आदी ऐहिक क्षेत्रातील आहेत. संघाने श्रीराम मंदिराचा लढा उभा केला तो आणखी एक मंदिर उभे करण्याकरिता नसून हिंदू समाजाच्या सन्मानचिन्हाची प्रतिष्ठापना करण्यासाठी. संघ हा हिंदू सांस्कृतिक मूल्यांवर हिंदू समाजाची ऐहिक उन्नती करण्याकरिता कटिबद्ध आहे. मुस्लीम, ख्रिश्चन किंवा परधर्मीयांचा द्वेष हा त्याचा पाया नाही. मांसाहार करावा की शाकाहार, दारू प्यावी की नाही, हा त्याच्या हिंदुत्वाच्या कक्षेतील विषय नाही. आपले ऐहिक जीवन सर्वार्थाने व सर्वांगाने सुखी राहावे, असे सामाजिक वातावरण जरूर तयार केले पाहिजे. पण तो प्रत्येकाचा व्यक्तिगत निवडीचा विषय राहिला पाहिजे. ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा, सुव्यवस्थेचा भंग होत नाही. इतरांचे शोषण, इतरांवर अत्याचार होत नाहीत. कायद्याचा भंग होत नाही, तोवर नागरिकांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी सुसंस्कृत समाजाची भूमिका असते. संघटनेतील अनुशासनाचे नियम समाजाला लागू करता येत नाहीत. त्याला नियंत्रित करणार्या घटनात्मक तरतूदी असतात. त्यानुसार तो चालतो.
राहता राहिला प्रश्न मुस्लीम व ख्रिश्चन समाजाचा. हा प्रश्न आपल्यालाच समजला आहे व त्यावर आपल्याकडेच रामबाण उपाय आहे, असा दावा कुणीच करू शकणार नाही, एवढा हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. ‘मिनी पाकिस्तान’पासून ‘लव्ह जिहाद’पर्यंत अनेक घटना खर्या आहेत, त्या धोक्याची हिंदू समाजाला जाणीवही करून दिली पाहिजे. परंतु, यातून हा प्रश्न सुटणार नाही. तापमापकाने ताप मोजता येतो, पण ते त्यावरील औषध नाही. त्यामुळे याविरुद्ध प्रचार करणे, याने वातावरण बनू शकते, पण ते त्यावरील उत्तर नाही. जोवर एखाद्या समाजाच्या समूहमनाचा पाठिंबा अशा कृत्यांना नसतो तोवर अशी कृत्ये करण्याचे धाडस एखाद्या वेड्यापीरालाच होते. जेव्हा असे प्रकार सातत्याने घडतात तेव्हा त्याचे कारण त्यामागे असलेले समूहमन हे असते. त्यामुळे मुस्लीम प्रश्नावर अंतिमत: तोडगा काढायचा असेल, तर त्या समूहमनामध्ये परिवर्तन करावे लागेल व ते कसे करायचे, हा प्रमुख मुद्दा आहे. धर्मग्रंथांच्या शिकवणुकीतून धार्मिक समूहमानस घडत असले, तरी धर्मग्रंथांचा अर्थ कसा लावायचा हे व्यवहारातील उत्तरावरठरते. त्यामुळे कुराणातही मक्केतील व मदिनेतील, प्रारंभिक काळातील व उत्तर काळातील उपदेश वेगळा आहे. परमेश्वरही परिस्थिती पाहूनच उपदेश करत असतो. हे समूहमानस बदलण्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ‘जगातील सर्व मुसलमान एक आहेत’ ही ‘कौम’ची कल्पना बदलून भारतातल्या मुसलमानासंबंधी जगातल्या मुस्लीम देशांना काही देणेघेणे नाही, या सत्याचे त्यांना आकलन करून देणे. मोदी सरकार सत्तेवरआल्यानंतर, काश्मीरचे ‘370’वे कलम रद्द केल्यानंतर एक-दोन अपवाद वगळता सर्व मुस्लीम देश अलिप्त राहिले. भारत, पाकिस्तान संदर्भात भारताशी चांगले संबंध असणे अधिक महत्त्वाचे आहे, हे त्या देशांच्या लक्षात आले आहे. भारतातील मुस्लिमांची ‘कौमकेंद्री‘ भूमिका बदलून ‘भारतकेंद्री’ भूमिका निर्माण होण्यास आजची परिस्थिती अनुकूल आहे. मुस्लिमांनी दंगली केल्यास घाबरणार्या टप्प्यातून हिंदू समाज केव्हाच पुढे आला. पाकिस्तान भारताला पराभूत करुन आपल्याला मुक्त करेल, याही नशेतून भारतीय मुसलमान बाहेर पडत आहेत. आपल्या हुकमी मतपेढीच्या आधारे आपण सत्ताधारी पक्षाला वाकवू अशी मुस्लीम धार्मिक नेत्यांची जी गुर्मी होती, तीही कमी होत आहे. भारतात सत्ता मिळविण्यासाठी मुस्लीम मतपेढीची गरज नाही हे भाजपच्या विजयाने सिद्ध केले आहे.
हिंदू आपली जातपात विसरून एकत्र येऊन मतदान करू शकतात, ही एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट आज प्रत्यक्षात आली आहे. वर्तवणुकीत बदल करायचा असेल तर असे बदल क्वचितच स्वेच्छेने होतात, ते करण्यासाठी एकतर सक्ती करावी लागते; बदल केल्यानंतर अधिक चांगले दिवस येतील, असे आश्वस्त करावे लागते किंवा या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात, असे वर्तवणुकीचे शास्त्र सांगते. संघाने गेल्या जवळ जवळ १०० वर्षांत जी शक्ती संपादन केली आहे, त्या आधारे भारतीय मुस्लिमांच्या समूहमनात बदल घडविता येईल, असा विश्वास विद्यमान सरसंघचालकांच्या मनात उत्पन्न झाला आहे. मुस्लीम समाज (किंवा ख्रिश्चन व अन्य धर्मीय समाज) हिंदू समाजासोबत सहजीवनाच्या भावनेने राहिले पाहिजेत, एवढीच संघाची अपेक्षा आहे. संघाचे काम मुस्लिमांच्या भीतीपोटी किंवा द्वेषापोटी निर्माण झाले नसून, हिंदूंमध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मान व आत्मसामर्थ्याची भावना निर्माण करण्याकरिता झालेले आहे. ‘जो कोणाला भीत नाही व जो कोणाला घाबरवू इच्छित नाही‘ असा हिंदू समाज संघाला तयार करायचा आहे, हीच संघाची प्रारंभापासून भूमिका आहे.
उद्दिष्ट कालनिरपेक्ष असते. भूमिका काळानुसार बदलत असतात. आपल्या मतपेढीच्या आधारे राजकीय दबाव टाकू, ही मुस्लीम नेत्यांची भूमिका केंद्रात मोदी व उत्तर प्रदेशात योगी यांनी निरर्थक ठरविली. प्रत्येक मुस्लीम देश त्या त्या देशाच्या हितानुसार भूमिका घेतो, त्यांना भारतातील किंवा चीनमधील मुसलमानांचे काहीही देणे-घेणे नाही, याचाही अनुभव येत आहे. ‘कौम’च्या अव्यवहारी स्वप्नापेक्षा भारतातील हिंदूंच्या सोबत, आनंदाने किंवा नाईलाजाने का होईना, राहणे हिताचे व शहाणपणाचे आहे हे जर मुस्लीमसमूहमनाला पटू लागले तर ती एका नव्या मानसिक क्रांतीची सुरुवात असेल. मुस्लिमांच्या भीतीतून किंवा भाबड्या प्रेमातून ही भूमिका निर्माण झाली नसून त्याला या वास्तवाचा भक्कम आधार आहे. ही शक्यता आजमावून पाहण्याइतके सामर्थ्य आता संघात व हिंदू समाजात आले आहे, असा विश्वास त्यामागे आहे. जो इतिहासात रमतो तो शाहीर बनतो, जे भविष्याची स्वप्ने पाहतात व तशी स्वप्ने समाजाला देतात, ते नेते असतात. मोदी, योगी आदित्यनाथ यांनी ज्या शक्यता निर्माण केल्या त्याचा पुढचा अध्याय मोहनजी लिहू पाहत आहेत. नव्या धार्मिक समरसतावादी समाजाच्या शक्यता ते आजमावून पाहत आहेत.