कुटुंब रंगलंय उद्योगात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2021   
Total Views |

family inbuisness_1 


कोरोनाचा तो काळ जसा सगळ्यांसाठी भयानक होता, तसाच तो कानगुलकर कुटुंबीयांसाठीसुद्धा होता. आठ-दहाजणांचं कुटुंब. ‘लॉकडाऊन’मध्ये करायचं काय, हा मोठाच प्रश्न होता. मडकी विकण्याचा परंपरागत व्यवसाय या कोरोना काळात बंद होता. काहीतरी हातपाय मारलेच पाहिजे. आपण मसाला बनवून विकण्यास सुरुवात केली तर? विमलाबाईंच्या या प्रश्नावर कोणाकडेच उत्तर नव्हतं. कारण, मसाला तयार करण्यास जेवढा पैसा लागणार होता, तेवढा पैसा नव्हता. मग कुणीतरी ‘आयडिया’ सुचवली, बचत केलेल्या पैशांचा गल्ला फोडण्याची! पै न् पै जमवलेला गल्ला जेव्हा फोडला त्यातून २,१५० रुपये निघाले. यातूनच मुहूर्तमेढ रोवली गेली, भविष्यातील उद्योगाची. ‘भोजराम फूड्स’ची. हा रोमहर्षक उद्योजकीय प्रवास आहे मराठवाड्यातल्या द्रोपदा संतोष कानगुलकर आणि त्यांच्या उद्योजक कुटुंबाचा.




द्रोपदा संतोष कानगुलकर यांचं माहेर नांदेडमधील उमरीचं. इथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत द्रोपदा शिकल्या. द्रोपदांचे बाबा नागुराव कस्तुरे हे व्यवसायाने कुंभार. मडकी घडवणं आणि ती बाजारात नेऊन विकणं हे त्यांचं वंशपरंपरागत काम. व्यवसायच म्हणा ना. नागुरावांची पत्नी सुंदराबाई आपल्या पतीला समर्थपण साथ देत होत्या. वेगवेगळ्या बाजारपेठेत त्या मडकी विकायच्या. द्रोपदासुद्धा आईसोबत बाजारात जायच्या. त्यामुळे व्यावहारिकपणाचं बाळकडू कळत नकळत लहानपणापासून मिळत गेलं. यशवंतराव मराठवाडा विद्यापीठातून त्या बारावी झाल्या. पुढे शिकायची इच्छा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही.साधारणत: २००९ च्या सुमारास द्रोपदांचा विवाह संतोष कानगुलकर या सुविद्य तरुणासोबत झाला. संतोष कानगुलकरांचा संघर्षसुद्धा विलक्षण आहे. उमरी तालुक्यातील शिंदी या खेड्यामधील संतोषसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. दहावी झाल्यावर ते एका किराणा मालाच्या दुकानात कामाला लागले. पगार होता पाच हजार रुपये वर्षाला. दुसर्‍या वर्षी वाढून तो साडेपाच हजार रुपये झाला. दोन वर्षे त्याने तिथे काम केले. काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. वडील भोजराम हे मडकी आणून विकायचे. आई विमलाबाई त्यांना मदत करायची. मात्र, ‘रेफ्रिजरेटर’च्या या काळात मडकी कोण विकत घेणार? पदरात चार मुलं. त्यामुळे मोठा मुलगा म्हणून संतोष घराला हातभार म्हणून काम करत होते. पुढे ते नांदेडवरून औरंगाबादला शिकायला आले. ‘समाजशास्त्र’ विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. एवढे शिक्षण घेणारे तो कानगुलकर कुटुंबातले पहिलेच अपत्य ठरले.




संतोष यांच्या एका नातलगाने शाळा सुरू केली होती. संतोषना त्यांनी शिक्षकाची नोकरी दिली खरी, पण त्यासाठी पैसेदेखील घेतले. आपल्या लेकाला मास्तराची नोकरी मिळते म्हणून भोजरामांनी आपली जमीन गहाण ठेवून पैसे आणले आणि त्या नातलगाला दिले. मात्र, शाळा काही नीट चाललीच नाही. त्या नातलगाने परस्पर शाळा विकून टाकली. संतोष यांची नोकरी गेली. आता करायचे काय, हा मोठा प्रश्न होता. कर्ज डोक्यावर होतंच. बापासोबत मडकेविकायला लागलो तर लोक काय म्हणतील, ही भीती मनात होतीच. किंबहुना, संतोषला त्याची लाज वाटत होती. काहीतरी काम करावे या उद्देशाने ते पुन्हा औरंगाबादला आले. वणवण फिरले, पण काम काही मिळेना. शेवटी एका कॅन्टीनमध्ये त्यांना काम मिळाले. काम होते, भांडी घासण्याचे. पहाटे 4 वाजता काम सुरू होई ते रात्री ११ वाजेपर्यंत. पगार होता फक्त ६०० रुपये!




 
सुरुवातीचे १४ दिवस तर संतोषनी सूर्यसुद्धा पाहिला नाही. खरकटं आणि तेलकट पाणी त्यात दिवसभर मोरीमध्ये बसून काम. यामुळे संतोष यांचे पाय सडू लागले. शेवटी असह्य होऊन काम सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मालकाला त्यांनी आपला १४ दिवसांचा हिशेब करायला सांगितले. मालकाने त्यांना पेन-वही घेऊन बोलावले. त्यांचा खाण्यापिण्याचा, राहण्याचा खर्च संतोषच्या पगारातून वजा करून वर मालकालाच ८०० रुपये द्यावयाचा हिशेब मालकाने त्याच्यासमोर ठेवला. ८०० रुपये दे आणि इथून जा, नाहीतर इथेच काम कर. संतोष मुकाट्याने कामाला लागले. खरंतर संतोष या परिस्थितीपुढे हतबल झाले होते. मनाने खचले होते. एकावेळेस तर आत्महत्या करायचे मनसुद्धा झाले. मात्र, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची पुस्तके वाचली. त्यापासून प्रेरणा घेऊन परिस्थितीला शरण न जाता दोन हात करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्याच कॅन्टीनमध्ये ते काम करत राहिले.





काही दिवसांनी त्यांना जेवण बनविणार्‍या ‘कूक’चे काम शिकण्याची इच्छा झाली. मात्र, हा पोरगा आपल्याच पोटावर पाय देईल म्हणून कोणीच त्याला शिकवेना. संतोषने मग शक्कल लढवली. तो त्या कारागिरांना कधी तंबाखू आणून देई, तर कधी विडी-सिगारेट. ही ‘आयडीया’ कामाला आली. त्या कारागिरांसोबत संतोषची मैत्री जुळली. त्यांनी संतोषला जेवण बनवण्यास शिकवले. मालकाने संतोषचे हे कौशल्य हेरले. त्यांनी संतोषला आपल्या दुसर्‍या एका हॉटेलमध्ये ‘कूक’ची नोकरी दिली. तिथे तो दोन वर्षांत मॅनेजरपदापर्यंत पोहोचला.खुलताबादमध्ये त्याला एक संधी मिळाली. तेथील महाविद्यालयात दूरदूरचे विद्यार्थी शिकायला येत. मात्र, त्यांना घरच्यासारखे अन्न मिळत नव्हते. ही संधी संतोषने हेरली आणि त्याने ‘मेस’ सुरू केली. तब्बल १७५ विद्यार्थी त्या ‘मेस’चा लाभ घेऊ लागले. दोनवेळचे पोटभर जेवण त्यांना मिळू लागले. त्यातले काही विद्यार्थी असेदेखील होते की, ज्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नसत. मात्र, संतोषने पैशांपेक्षा त्यांच्या भुकेला जाणले. मुलांना खाऊ घातले. शिक्षण पूर्ण होताना ही मुले संतोषकडे येऊन कृतज्ञतेने ढसाढसा रडायची. एवढ्या परोपकारी मुलाला मुलगी मात्र कोणी देत नव्हते. कारण, संतोष एक हॉटेलवजा मेस चालवायचे. हॉटेल म्हणजे कप-बशा धुणे हेच काम मुलींच्या घरच्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांचे कुठेच जुळत नव्हते. द्रोपदाच्या बाबांनी, नागूरावांनीदेखील सर्व चौकशी करूनच आपली मुलगी संतोषना दिली.





द्रोपदा लग्नानंतर संतोषसोबत ‘मेस’च्या कामात मदत करू लागली. दररोज १७५ लोकांचे दोन वेळचे जेवण तेदेखील चुलीवर बनवण्यासाठी आपल्या सासुबाईंना मदत करू लागली. कालांतराने ‘मेस’ बंद करावी लागली. संतोषना एका सामाजिक संस्थेमध्ये नोकरी मिळाली, तर द्रोपदा शिलाई काम करू लागल्या. सासू-सासरे वडिलोपार्जित मडकी विकण्याचा व्यवसाय करू लागले. दरम्यान कोरोना आला आणि सगळ्या जगाचे आर्थिक चक्रच फिरले. मडकी विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला. संतोषलासुद्धा घरीच राहावे लागले. पुढे काय करायचे, हा यक्षप्रश्न ठाकला. संतोषची आई निरनिराळे मसाले उत्तम चवीचे बनवायचे. तोच व्यवसाय करायचे ठरले. नवीन व्यवसाय करायचे म्हणजे भांडवल आलेच. मात्र, यासाठी लातूर येथील वाटाड्या संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनीने मदत केली. गल्ल्यामध्ये एक-दोन रुपयांची नाणी जमा केली होती. गल्ला फोडल्यावर त्यातून २.१५० रुपये जमा झाले, या भांडवलाच्या जोरावर सुरुवातीला चिकन मसाला, मटण मसाला आणि बिर्याणी मसाला प्रत्येकी तीन किलो तयार केले. ते द्रोपदा आणि विमलाबाई यांनी त्यांच्या ओळखीच्या वर्तुळात विकले. काही ‘ऑनलाईन’ माध्यमातूनसुद्धा विक्री झाली. कानगुलकर कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. 2021 मध्ये अशाप्रकारे ‘भोजराम फूड्स’ उदयास आले. संतोष स्वत: उत्तम ‘शेफ’ असल्याने आणि मसाला हा आधुनिक नावाने ओळखला जावा, यासाठी ‘शेफ मसाले’ नावाने मसाल्याचा ब्रॅण्ड कानगुलकर दाम्पत्याने विकसित केला.





मुंबई, नाशिक, बंगळुरु, झारखंड, छत्तीसगढ अशा महाराष्ट्राबाहेरील राज्यातसुद्धा ‘शेफ’ मसाल्यांना ऑर्र्ड्स येऊ लागल्या. अस्सल मराठवाड्याची चव असलेला ‘शेफ’ मसाला अल्पावधीत लोकप्रिय झालेला ‘ब्रॅण्ड’ आहे. कालवण मसाला, कंदूरी मसाला, सांबर मसाला, पनीर मसाला, चिकन मसाला, मटण मसाला या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. ‘भोजराम फूड्स’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मसाल्यांना लागणारा कच्चा माल थेट शेतकर्‍यांकडून खरेदी केला जातो. हे सारे मसाले खलबत्त्यात कुटले जातात किंवा जात्यावर वाटले जातात. या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक तत्त्व नाही, असे संतोष कानगुलकर सांगतात.सर्वसामान्य महिलांना रोजगार देणे हे आपले ध्येय आहे, तर निव्वळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या प्रत्येक स्वयंपाकघरात ‘शेफ’ मसाले पोहोचविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे कानगुलकर म्हणतात.




 
कानगुलकर दाम्पत्यास स्वप्निल आणि संस्कार अशी दोन मुले आहेत. स्वप्निल सहावीत शिकतोय. मात्र, आतापासूनच तो आपल्या कुटुंबाला व्यवसायात मदत करतोय. एकप्रकारे त्यांचं उद्योजकीय प्रशिक्षण सुरू आहे, तर छोटा संस्कार आठ वर्षांचा आहे.जशी काळ्या ढगाला रुपेरी किनार असते, तशीच कोणत्याही संकटामध्ये संधी दडलेली असते, असे म्हणतात. कानगुलकर कुटुंबांनी कोरोनासारख्या संकटासमोर गुडघे टेकले नाही, तर त्या संकटासोबत आलेल्या संधीचे सोने केले. अशा या कानगुलकर कुटुंबाकडे पाहून म्हणावे वाटते, ’कुटुंब रंगलंय उद्योगात.’








@@AUTHORINFO_V1@@