सध्याची परिस्थिती पंडितांच्या पुनरागमनासाठी योग्य नसल्याचे, दहशतवाद्यांना पंडितांच्या मनात भीती निर्माण करायला लावणारे विधान फारुख अब्दुल्लांनी केले होते. यामुळे दहशतवाद्यांकडून परिस्थिती बिघडवण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले जाऊ शकतात. पण, अमित शाह यांनी आपल्या कृती आणि उक्तीतून, आपण अशा प्रयत्नाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज असल्याचेच दाखवून दिले.
'कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये गेली दोन वर्षे शांतताच नांदली. परंतु, साधारण गेल्या महिना-दीड महिन्यापासून धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामागे अफगाणिस्तानमध्ये कट्टर इस्लामी तालिबानी दहशतवाद्यांच्या सत्तेत येण्याचेही कारण आहे. ९०च्या दशकासारखी परिस्थिती परत आणण्याची इच्छा बाळगणाऱ्या जिहादी दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात नव्या नव्या नावाने, छोट्या-छोट्या संघटनांची स्थापना केली. काश्मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी धर्मांध दहशतवाद्यांनी हिंदूंच्या लक्ष्यित हत्या केल्या. ‘लष्कर-ए-इस्लाम’नामक नव्या दहशतवादी संघटनेने, ‘रा. स्व. संघ कार्यकर्त्यांनी, सरकारला गुप्त माहिती पुरवणाऱ्यांनी आणि तमाम हिंदू तथा पंडितांनी काश्मीर खोरे सोडून जावे, तसे न केल्यास ठार मारले जाईल,’ अशी धमकी देणारे फलकही चिकटवले, तर काश्मीर खोऱ्यातील वाढत्या दहशतवादी घटना आणि हिंदूंच्या लक्ष्यित हत्येवरून मोदी सरकारवर टीकाही करण्यात आली. कधी हिंदू पंडितांच्या खोऱ्यात परतण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले, तर कधी फुटीरतावादी आणि पाकिस्तानशी चर्चा करण्याचे प्रस्तावही समोर आले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचा तीन दिवसीय दौरा महत्त्वाचा ठरतो.
आपल्या दौऱ्यात अमित शाह यांनी हौतात्म्य प्राप्त झालेल्या लष्करी जवानांच्या आणि लक्ष्यित हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीगाठी घेतल्या, तसेच ‘सीआरपीएफ’च्या शिबिरांनाही त्यांनी भेट दिली. मात्र, श्रीनगरमधील जनसभेला संबोधित करते वेळी अमित शाह यांच्या दहशतवाद्यांविरोधातील, फुटीरतावाद्यांविरोधातील आत्मविश्वासाचा, आक्रमकतेचा परिचय सर्वांना झाला. भाषणादरम्यान अमित शाह यांच्यासमोर ‘बुलेटप्रूफ ग्लास शिल्ड’ लावण्यात आले होते. पण, त्यांनी ते तत्काळ हटवले आणि त्यानंतर बोलायला सुरुवात केली. “मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे, पाकिस्तानशी नाही,” असे ते यावेळी म्हणाले. अमित शाह यांची ‘बुलेटप्रूफ ग्लास शिल्ड’ हटवण्याची कृती आश्वासक म्हटली पाहिजे. कारण, व्यक्तीच्या शब्दांपेक्षा त्याने केलेली कृती समोरच्या व्यक्ती वा उपस्थितांवर अधिक परिणाम, प्रभाव पाडते, असे म्हटले जाते, तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला अधिक धोका असतो आणि ती व्यक्ती दहशतवादाचा इतिहास व दहशतवादी कारवाया सुरू असलेल्या प्रदेशात असेल तर तो धोका कैक पटींनी वाढतो. पण, अमित शाह यांनी आपल्या कृतीतून, मी अतिमहत्त्वाचा असलो, तरी दहशतवाद्यांना घाबरत नाही, घाबरणार नाही, ‘मीदेखील तुमच्यासारखाच कोणत्याही अधिकच्या सुरक्षेशिवाय वावरू शकतो व तुम्हालाही कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे,’ हाच संदेश दिल्याचे स्पष्ट होते. त्यातून खोऱ्यातील हिंदू व पंडितांमध्ये विश्वास जागल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, ९०च्या दशकात काश्मीर खोऱ्यात जिहादी दहशतवाद्यांकडून हिंदूंच्या रक्ताचा सडा शिंपला जात होता. तेव्हा, तत्कालीन भाजप नेते व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, “मी लाल चौकात तिरंगा फडकावून दाखवेन,” अशा शब्दांत फुटीरतावादी व दहशतवाद्यांना ललकारले होते. नंतर त्यांनी तसे केलेही. अमित शाह तर नरेंद्र मोदींचे दीर्घकालीन सहकारी राहिले असून, ‘बुलेटप्रूफ ग्लास शिल्ड’ हटवण्याच्या कृतीतून त्यांनीही फुटीरतावादी, दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानलाही ललकारल्याचे स्पष्ट होते. हिंसक, दहशतवादी कारवाया करणाऱ्या कोणालाही आम्ही घाबरणार नाही, उलट त्यांना जशास तसे उत्तर देऊ, त्यांना नेस्तनाबूत करू, असेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. अर्थात, त्याची सुरुवातही झालेली आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकार दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात यशस्वी ठरले असून, परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगलीच सुधारली आहे. सुरक्षा बलांच्या सातत्यपूर्ण शोध मोहिमांसह ‘ड्रोन’ आणि अन्य उन्नत तंत्रज्ञानाद्वारे काश्मीर खोऱ्याच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. काश्मीर खोऱ्यात अस्थैर्याला, अराजकाला प्रोत्साहन देणाऱ्या फुटीरतावादी, राजनेते, पक्ष-संघटनांचे देशविरोधी धंदे बंद करण्यात आले आहेत, दगडफेकीच्या घटना संपल्यात जमा आहेत. तसेच, विस्थापित काश्मिरी पंडितांच्या परतण्यावरही केंद्र सरकार विचार करत असून, त्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. ते पाहता अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा, त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी, त्यांनी केलेली कृती दहशतवाद्यांना जरब बसवणारीच.
दरम्यान, सध्याची परिस्थिती हिंदू पंडितांच्या पुनरागमनासाठी योग्य नसल्याचे विधान ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. पण, यामुळे दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील परिस्थिती बिघडवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जाऊ शकतात. कारण, यातून प्रदेशातील एका बड्या नेत्याने दहशतवाद्यांना काश्मिरी पंडितांच्या मनात भीती पैदा करायला प्रोत्साहन दिले आहे. पण, अमित शाह यांनी आपल्या कृती आणि उक्तीतून, आपण अशा कोणत्याही प्रयत्नाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज असल्याचेच दाखवून दिले, हे महत्त्वाचे. सोबतच अमित शाह यांच्या दौऱ्यावेळीच फारुख अब्दुल्लांनी काश्मीरच्या शांततेसाठी ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ पुन्हा लागू करण्याची, पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आणि पाकिस्तानशी चर्चेची मागणी केली होती. मेहबुबा मुफ्तींनीही हाच राग आळवला होता. कारण, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा लागू होता, त्यावेळी अब्दुल्ला-मुफ्ती घराण्याची चंगळच चंगळ होती. स्वातंत्र्यापासून ७० वर्षांत राज्य विकासाच्या नावाखाली केंद्र सरकारकडून प्रचंड निधी जम्मू-काश्मीरला दिला गेला. पण, त्यावर डल्ला मारणारे अब्दुल्ला-मुफ्ती घराणेच होते. तसेच, पाकिस्तानकडूनही त्यांना केलेल्या कामगिरीचा मेहनताना मिळतच होता. पण, ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ हटले, विशेष राज्याचा दर्जाही गेला आणि अब्दुल्ला-मुफ्तींची दुकानदारी बंद झाली. त्यामुळेच संतापलेल्या अब्दुल्ला-मुफ्ती घराण्यातील नेत्यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली, जेणेकरून त्यांचे जुने उद्योग पुन्हा सुरू होतील.
मात्र, अमित शाह यांनी, “आधी परिसीमन, निवडणूक व नंतर पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल आणि मला पाकिस्तानशी बोलायचे नाही,” अशा शब्दांत त्यांना फटकारले. त्यातून अब्दुल्ला-मुफ्ती घराण्याची पोलखोल झाल्याचेच स्पष्ट होते. कारण, दहशतवाद्यांशी संबंधित प्रकरणात ‘एनआयए’ आणि ‘ईडी’ची चार्जशीट पाहिल्यास हे लोक चेहऱ्यावर भारतीयत्वाचा मुखवटा पांघरूण पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे पाठीराखे झाल्याचे दिसून येते. या लोकांची मुले परदेशात शिक्षण घेत होती, तर खोऱ्यातील युवकांच्या हातात हीच मंडळी दगड आणि हत्यारे देत होती. त्यामुळेच अमित शाह यांनी त्यांना धुडकावून लावले, तसेच थेट जनतेशीच संवाद साधण्याचे जाहीर केले. यातून नक्कीच तेथील जनतेत विश्वास निर्माण होईल आणि परिस्थिती आणखी उत्तम होईल, असे वाटते.