कानाला खडा!

वेध - कानाला खडा!

    26-Oct-2021
Total Views |

India_1  H x W:
'हायव्होल्टेज’ सामन्यात मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघाने सध्या आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांसह सर्व स्तरांतून व्यक्त केले जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे उत्तम न झाल्यानेच संघाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागल्याचे मत अनेकांचे आहे. दवबिंदूचा फायदा मिळाल्याने पाकिस्तानची फलंदाजी भारतापेक्षा वरचढ ठरली, हे जरी खरे असले तरी नामवंत गोलंदाज संघात असतानाही एकही गडी बाद करता येऊ नये, यावर विचार करणे गरजेचे आहे. नेमक्या कोणत्या चुका आपल्याकडून घडल्या आणि आगामी काळात काय सुधारणा करणे गरजेचे आहे, याचे मंथन आता भारतीय संघाने केले पाहिजे. २०१९च्या विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ते आतापर्यंत भारतीय संघाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांचा प्रश्न काही सुटलेला नाही. सलामीच्या फलंदाजांसह सुरुवातीचे काही खेळाडू बाद झाल्यानंतर संघाला यातून सावरण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरणे अपेक्षित असते. मात्र, मधल्या फळीत सक्षम फलंदाजांची उणीव भारतीय संघाला सातत्याने जाणवत आहे. सध्याचा ‘टीम मेंटॉर’ आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रूपात भारतीय संघाला ही अडचण कधी जाणवली नाही. परंतु, धोनीनंतर भारतीय संघात सक्षम मधल्या फळीच्या फलंदाजाची उणीव कायम आहे. भारताच्या निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षकांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केवळ मधल्या फळीतील फलंदाजच नव्हे, तर खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या तंदुरुस्त नसतानाही त्याला संघात स्थान दिल्याचा आरोप आहे. त्याऐवजी शार्दूल ठाकूरला संधी मिळणे अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. तंदुरुस्त नसतानाही खेळाडूंना संघात स्थान देणे, म्हणजे संघाला दुबळे करण्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापकांनी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मैदानावरील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल, तर खेळाडू तंदुरुस्त हवेच, हा ‘कानाला खडा लावून’च भारतीय संघाने आगामी काळासाठी तयारी करावी, असा मतप्रवाह व्यक्त केला जात आहे.

‘मौका’ पुनरागमनाचा

दवबिंदूचा फायदा झाल्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना फलंदाजी करणे सोपे, तर भारतीय संघाला गोलंदाजी करणे अवघड गेले, असे मत व्यक्त करत अनेक समीक्षकांनी भारतीय संघाची पाठराखण केली. संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धरतीवर खेळताना रात्रीच्या वेळेस मैदानावर पडणारा दवबिंदू हा सामन्यासाठी एक महत्त्वाचा पैलू आहे. दवबिंदूमुळे मैदान ओले होते आणि फलंदाजी करणे सोपे होते, तर गोलंदाजी करणे कठीण होऊन बसते. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारताला पाकिस्तानवर विजय मिळवायचा होता. परंतु, ते शक्य झाले नाही. केवळ हेच एक कारण भारतीय संघाच्या पराभवासाठी जबाबदार ठरवता येणार नाही. कारण, भारतीय फलंदाज, गोलंदाज या सर्वांचीच कामगिरी निराशाजनक राहिली, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यातदेखील हीच परिस्थिती उद्भवली होती. दवबिंदूचा फायदा घेत धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळविणे सोपे जात होते. परंतु, कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघाने विजयासाठी दवबिंदूचा फायदा होत असल्याचा दावा खोटा करून दाखवला. चेन्नईच्या फलंदाजांनी केवळ तीन गडी गमावत १९२ ही मोठी धावसंख्या उभारली आणि प्रतिस्पर्धी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील नऊ खेळाडू बाद करत अवघ्या १६५ धावांवर रोखले आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यामुळे ‘युएई’च्या धरतीवर खेळताना दवबिंदूच्या प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवणे अवघड असले तरी अशक्यप्राय नाही, हे विराटसेनेने लक्षात घेणे गरजेचे आहे. संघात्मक तुलना केल्यास ‘आयपीएल’ आणि ‘टी-२०’ विश्वचषक करंडक स्पर्धा या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्या तरी मैदानावरील परिस्थिती सारखीच आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे भारतीय संघाने अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. ‘टी-२०’ विश्वचषक करंडक स्पर्धेतील सराव सामन्यांत भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांना सहज नमवले होते. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या धावांचे आव्हान सहज पूर्ण केले होते. त्यामुळे या संघात प्रतिभा आहे, हा संघ पुनरागमन करेल, यात शंका नाही.
- रामचंद्र नाईक