‘पालघर एक्स्प्रेस’ ते ‘लॉर्ड’ शार्दूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2021   
Total Views |

Shardul thakur_1 &nb
 
 
गेले काही महिने पालघरमध्ये राहणाऱ्या शार्दूल ठाकूरची चांगलीच चर्चा रंगली आहे.जाणून घेऊया त्याचा एक सामान्य क्रिकेटपटू ते ‘लॉर्ड’ असा प्रवास...
 
 
 
सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महिना ‘आयपीएल २०२१’मध्ये गेल्यानंतर आता रविवार, २३ ऑक्टोबरपासून ‘आयसीसी टी-२०’ स्पर्धेच्या ‘सुपर १२’चे सामने सुरू होणार आहेत. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, त्याआधी झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रलिया दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. या दौऱ्यांमध्ये एका खेळाडूचे नाव चांगलेच गाजले. तो म्हणजे पालघरमध्ये लहानाचा मोठा झालेला शार्दूल ठाकूर. एक अतिरिक्त जलदगती गोलंदाज म्हणून कसोटी संघामध्ये घेतलेल्या शार्दूलने संधी मिळताच गोलंदाजीमध्ये आपली कमाल तर दाखवलीच. याशिवाय संघाला गरज असताना त्याने तडाखेबाज फलंदाजी करत अष्टपैलू कामगिरीचा नजराणादेखील सादर केला. कसोटी सामन्यात तडाखेबाज अर्धशतक करत ‘पालघरवासी क्रिकेटपटू’पासून ‘लॉर्ड’ हे टोपण नाव मिळवले. जाणून घेऊया त्याच्या याच प्रवासाबद्दल...
 
शार्दुल नरेंद्र ठाकूर याचा जन्म १६ ऑक्टोबर, १९९१ रोजी पालघरमध्ये झाला. त्याचे वडील नरेंद्र ठाकूर शेतकरी होते. नम्र आणि सतत प्रयत्न करत राहण्याचा गुण त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड जडले होते. यामुळे आपण क्रिकेटमध्ये काहीतरी करू शकतो, असा विश्वास त्याला वाटत होता. परंतु, तो राहत असलेल्या माहीम केळवा गावामध्ये एकाही शाळेमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळले जात नव्हते. यामुळे शार्दूलच्या कुटुंबाला पालघरमधून बोईसरला यावे लागले. बोईसरमधील टी.व्ही.एम. शाळेत त्याला सीजनच्या चेंडूवर प्रशिक्षण घेता आले. त्यानंतर बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना सहा चेंडूत सहा षट्कार मारण्याचा पराक्रम त्याने केला. यामुळे स्थानिक क्रीडाक्षेत्रात त्याचे चांगलेच नाव झाले. एक मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याने क्रिकेटची कारकिर्द सुरू केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१२मध्ये त्याने मुंबईतर्फे खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 
शार्दूलने ‘रणजी २०१२-२०१३’ हंगामात मुंबईकडून खेळताना राजस्थानविरुद्ध सामन्यात पदार्पण केले. परंतु, त्याची शालेय स्पर्धांमधील कामगिरी पाहता पहिल्या सामन्यात त्याला साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने ८२च्या सरासरीने फक्त चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर, ‘रणजी २०१३-१४’ हंगामात शार्दूलने सहा सामन्यांतून २६.२५च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या. यानंतर एक यशस्वी मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यानंतर ‘विजय हजारे स्पर्धा २०१३-१४’ हंगामात मुंबईकडून खेळताना ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१४-१५च्या ‘रणजी’ हंगामात त्याने दहा सामन्यांमध्ये २०.८१च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या आणि पाचवेळा एकाच सामन्यात पाच विकेट्सहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यानंतर त्याला ‘पालघर एक्स्प्रेस’ असे नाव पडले. त्यानंतर ‘रणजी २०१५-१६’ हंगामात सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आठ विकेट्स घेऊन मुंबईला ‘रणजी’चे जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने गोलंदाजीने चांगला प्रभाव तर पाडलाच, शिवाय ६६ सामन्यांमध्ये नऊ अर्धशतकेदेखील केली.
 
२०१७मध्ये शार्दूल ठाकूरने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ‘आयपीएल’मध्ये त्याची कामगिरी पाहता त्याला भारतीय आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ संघातदेखील स्थान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या ‘टी-२०’ सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’त पहिले पाऊल टाकले. याचवर्षी अफगाणिस्तानसोबत झालेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली होती. मात्र, त्याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नाही. पुढे त्याने वेस्ट इंडीजविरोधात खेळताना आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले खरे, मात्र, त्याला दहाच चेंडू टाकता आले. दुखापतीमुळे त्याला कसोटीपासून काही काळ लांब राहावे लागले. यावेळी त्याच्या वडिलांनी दिलेली शिकवण आचरणात आणली आणि दुखापतीतून सावरत तो पुन्हा मैदानात उतरला. ‘आयपीएल’मध्येही त्याची उत्तम कामगिरी होत होती. कोरोनाच्या ब्रेकनंतर आलेले २०२१ वर्ष त्याच्यासाठी चांगलेच लाभदायक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कारकिर्दीतले पहिले अर्धशतक केले. तर, इंग्लंड दौऱ्यातील एका कसोटीत पहिल्या डावामध्ये ३१ चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक केले, तर दुसऱ्या डावामध्ये ७२ चेंडूंमध्ये ६० धावांची महत्त्वाची खेळी केली. ओव्हलमध्ये केलेल्या त्याच्या याच खेळीनंतर त्याला ‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूर म्हणून संबोधिले जाऊ लागले. आता आगामी ‘आयसीसी टी-२०’ स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...
 
@@AUTHORINFO_V1@@