नुकतीच कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी केली. वेदमंत्रात वर्णिलेली ही पौर्णिमा अतिशय शाश्वत स्वरूपाचे सुख देणारी आहे. अशा या पौर्णिमेच्या रात्री दिव्य गुणांनी परिपूर्ण होत आम्ही आमचे ज्ञान-विज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावयास हवे. नेहमीच आत्मकल्याणाच्या दिशेने वाटचाल करणे हीच खरी पौर्णिमा...
पूर्णा पूश्चादुत पूर्णा परस्ताद्
उन्मध्यत पौर्णमासी जिगाय।
तस्यां दैवै: संवसन्तो महित्त्वा
नाकस्य पृष्ठे समिषा मदेम्।
(अथर्ववेद-7.80.1)
अन्वयार्थ
(पश्चात्) पश्चिम दिशेत, मागे (पूर्णा) पूर्ण रुपाने (उत्) आणि (पुरस्तात्) पूर्व दिशेत, पुढे तसेच (मध्यत:) मध्यभागी (पूर्णा) पूर्णरूपाने (पूर्णमासी) पौर्णिमा (उत् जिगाय) उदित होऊन विजयाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. (तस्यां) तिच्यामध्ये (देवै:) गुणांनी (सं वसन्त:) उत्तम, सम्यक् स्थितीला प्राप्त होत (महित्वा) मोठ्या महिमेने (ईषा) ज्ञान-विज्ञानाद्वारे (नाकस्य पृष्ठे) मोक्षलोकाच्या पृष्ठभागावर (सं मदेम्) अतिशय चांगल्या प्रकारे आनंदाचा लाभ घेत राहू!
विवेचन
अनादी काळापासून निरंतर गतिमान असलेले अमर्यादित स्वरूपाचे निसर्गचक्र म्हणजे प्रगतीचे द्योतक! या वैभवशाली सृष्टीत विद्यमान असलेली सर्वच स्थूल आणि सूक्ष्म तत्त्वे ही मानवाला जगण्याचे नवे बळ देतात. ही प्रकृती माता असंख्य जीवात्म्यांच्या सर्वांगीण सुखासाठी नेहमीच पोषक, प्रेरक व मार्गदर्शक राहिली आहेत. अशा या निसर्गातील बदलांकडे पाहून माणूस स्वतःला बदलून घेत नसेल, तर त्यात त्या नैसर्गिक तत्त्वांचा काय दोष? प्रकाशाची अद्भुत रम्यता वितरित करण्याच्याकरिता सूर्य, चंद्र आणि नक्षत्र-तारे ही सर्व नेहमीच व्यग्र आहेत. ही लहान-मोठी असली, तरी सर्वांचे तितकेच महत्त्वदेखील आहे. वैदिक स्वस्तिवाचन पाठात असाच एक सुंदर मंत्रांश येतो- ‘स्वस्तिपन्थामनुरेम सूर्याचंद्रमसाविव.’ या मंत्रात सूर्य आणि चंद्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून या दोन्हींच्या कल्याणपंथांचे अनुकरण करण्याचा मौलिक उपदेश मिळतो. सूर्याची प्रखर तेजस्विता, तर चंद्राची शीतलता!
एक चंड सहस्रांशू तर दुसरा हिमांशू! एक ग्रीष्माच्या वैशाखात तीव्र मार्तंड बनतो, तर दुसरा कोजागिरी पौर्णिमेला आपली शैत्यप्रभा खुलवितो. शारदपौर्णिमेच्या रात्री चांदण्याचा वैभवविलास हा मानवी मनाला अतिशय आल्हाददायक बनवतो. या दिवशीचा जागृत पूर्णचंद्र मोठ्या गौरवाने उद्घोष करतो- ‘को जागर्ति? कोण जागा आहे?’ स्वतः जागे राहत इतर सृष्टीतत्त्वांना नेहमीच जागृत होण्याची हाक देणारा हा चंद्र. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा हे तिचे नामाभिधान. स्वर्गसुखाची बरसात करणारी ही रम्य निशा. या पौर्णिमेला कुठेही ढगांचा लवलेश नाही. या रात्री नभाचे दिव्य आभूषण ठरलेला पूर्ण चंद्र म्हणजे चैतन्याचा मनमोहक स्तंभ. नभांगणात सर्वांच्या ठळक दृष्टीस पडणारा हा शशी किती स्वच्छ, सुंदर आणि तितकाच मनमोहक. दरवर्षी येणारी शारदीय पौर्णिमा माणसाला नवजीवन देते. जीवन जगण्यासाठी बरेच काही सांगून जाते...आपले अंतर्बाह्य जीवन निर्मळ, मनोरम व सुगंधित आणि तितकेच रंजक बनवण्याच्या कार्यात पौर्णिमा ही प्रेरणेचा खळाळता झरा!
सदरील मंत्रात पौर्णिमेच्या वैभवाचे अप्रतिम वर्णन करण्यात आले आहे. पौर्णिमा चोहिकडे उठून दिसते. सर्व दिशांत पसरलेला अंधार नाहीसा करण्यासाठी तत्पर आहे. पौर्णिमेचा पूर्णचंद्र निसर्गाचे सौंदर्य खुलवत आहे. अशी कोणतीही दिशा नाही की जिथे चांदणे भरलेले नाही. मागे-पुढे, तसेच पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर, खाली-वर, मध्यभागी अशा प्रत्येक भागात चंद्राची शीतकिरणे व्यापून आहेत. चंद्र आपल्या मधुर, शांत व आल्हाददायी किरणांद्वारे अमृताचा वर्षाव करीत आहे. या चंद्राच्या शीतल किरणांच्या आश्रय घेत तपस्वी व ध्यानी असे ऋषिमुनी भगवंताचे नामस्मरण करीत आहेत. पशु-पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. भक्तजन भक्तिभावनेत तल्लीन होऊन विश्व विधात्या भगवंताकडे आळवणी करत आहेत. आपल्या शरीर मंदिरातील प्रत्येक कप्प्यात साठलेला दुर्गुण, दोष व अपप्रवृत्तींचा अंधार नाहीसा करून तिथे ज्ञानाचा प्रकाश पाडण्याकरिता त्यांची धडपड सुरू आहे.
पौर्णिमा ही विजयाचे प्रतीक! सृष्टीत दाटलेले तमांचे ढग नाहीसे करीत स्वतःला पूर्णत्व प्रदान करण्याची संधी मिळते, ती पौर्णिमेमुळे. म्हणूनच मंत्रात म्हटले आहे ‘पोर्णमासी जिगाय!’ ही पौर्णिमा आम्हांसाठी चौफेर विजय प्रदान करणारी ठरो. पौर्णिमेमुळे निसर्गातील बाह्य वातावरण जसे विहंगम बनते, तसेच आध्यात्मिक वातावरणदेखील अतिशय बहारदार होते. आमच्या अंतरंगातील पौर्णिमा, तर नेहमीच प्रकाशित झाली आहे. आत्मतेजाची पौर्णिमा केव्हाच ‘ज्योतिर्मय’ बनली आहे. भगवंताकडून मिळालेल्या या पिंडात आत्मशक्तीरूप पौर्णिमा फारच तेजोमय आहे. यात मनरूपी चंद्राची किरणे चहुकडे पसरलेली आहेत. अशा या पवित्र व शुद्ध मनश्चंद्राचे संकल्प व विकल्पांचे टिपूर चांदणे पडले आहे. या चांदण्याच्या प्रकाशात आमची पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये आप-आपल्या विषयांकडे अगदी सुव्यवस्थितपणे धाव घेत आहेत. अंतरंगातील पौर्णिमा आणि तिचा चंद्र हे दोन्ही अगदी सर्वदृष्टीने सर्वोत्तम आहेत.
असे असले, तरी मानवांमध्ये दडलेले वाईट प्रवृत्तीरुप अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. डोळे नेहमीच नको ती दृश्ये पाहण्यात उद्युक्त होतात. कान अभद्र शब्द ऐकण्यासाठी तत्पर असतात. रसना हीसुद्धा शारीरिक व्याधींचा विचार न करता अभक्ष्य पदार्थ सेवन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्वचेलाही मनोरम सुखस्पर्श हवा. जसे ज्ञानेंद्रियांचे, तसेच कर्मेंद्रियांचेदेखील! वाणीही नको ते अपशब्द उच्चारण्यास प्रवृत्त होते. हात हे दानधर्म, सेवा, परोपकार करण्यांऐवजी पापकृत्ये करण्यास धजावतात. नको त्या मार्गाकडे जाण्यास पाय तत्पर होतात. तसेच आहे जननेंद्रियांचेदेखील. आपल्या नैतिक परंपरांच्या मर्यादा ओलांडून ‘कामार्तानां न भयं न लज्जा!’ याप्रमाणे देहभान विसरून जातो. कामवासनेने वेडापिसा झालेला मानव ब्रह्मचर्य नियमांचे पालन करीत नाही. मागचा-पुढचा विचार न करता स्वतःचे चारित्र्यहनन करून घेतो.
हे सर्व घडते ते आध्यात्मिक पौर्णिमेच्या रात्री उगवलेल्या मनरूपी चंद्राच्या शीतल ज्ञानप्रकाशात न वावरल्याने! म्हणूनच वेदमंत्रात वर्णिलेली पौर्णिमा ही अतिशय शाश्वत स्वरूपाचे सुख देणारी आहे. अशा या पौर्णिमेच्या रात्री दिव्य गुणांनी परिपूर्ण होत आम्ही आमचे ज्ञान-विज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावयास हवे. जे करायचे, ते चांगलेच करावयाचे! कधीही विपरित, विकृत व अविद्या-अज्ञानाच्या मार्गाने जाणे नको. नेहमीच आत्मकल्याणाच्या दिशेने वाटचाल करणे हीच खरी पौर्णिमा आणि हाच तो ज्ञान-चंद्रोदय. अशा या वेदप्रतिपादित पौर्णिमेच्या आल्हाददायी शीतल चांदण्यात स्वच्छंदपणे भिजत राहिल्याने मानवाची इहलोकीची आणि परलोकीचीही जीवनयात्रा सुखपूर्वक यशस्वी होईल, यात शंका नाही.
प्रा.डाॅ. नयनकुमार आचार्य
9420330178