नवी दिल्ली : तामिळनाडूच्या एमके स्टालिन सरकारने राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्याची योजना अवलंबली आहे. मंदिरांमधील सर्व सोने वितळवून त्याचे २४ कॅरेट सोन्याचे बार बनवणार आहेत. याबाबत राज्य सरकारने सांगितले की, मंदिरांच्या नियंत्रणात असलेले न वापरले जाणारे सोने वितळवले जाणार आहे. राज्य सरकारचे सर्वात लक्ष तिरुवरकडूतील श्री कुमारीअम्मन मंदिर, सम्यपुरममधील मरीअम्मन मंदिर आणि एरुकनकुडीतील मरीअम्मन मंदिर या मंदिरांवर असेल.
तामिळनाडू सरकारने सांगितले आहे की, "वितळवलेल्या सोन्याचे बिस्किटमध्ये रुपांतर करून ते राष्ट्रीय बँकांमध्ये जमा केले जातील. यातून निर्माण होणारा पैसा हा 'स्टेट हिंदू चॅरिटेबल अँड रिलीजियस एन्डोमेंट्स' विभागाद्वारे मंदिरांच्या विकासासाठी वापरला जाणार आहे." मुख्यमंत्री स्टालिन यांच्या हस्ते बुधवारी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितले आहे की, फक्त भक्तांनी दान केलेले आणि गेल्या १० वर्षांपासून वापरात नसलेले सोन्याचे दागिने वितळवण्यात येतील.
पुढे तामिळनाडू सरकारने सांगितले की, मंदिराच्या सोन्यापासून कमाई करण्याची योजना ही १९७९मध्येच आली होती. सांगण्यात येते की, या अंतर्गत भक्तांनी दान केलेले सोने मदुराईतील प्राचीन मीनाक्षी सुंदरीश्वर मंदिर, पलानी येथील धनधायथापनी मंदिर, तिरुचेंदूरमधील श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर आणि समपुरममधील मरीअम्मम मंदिर यासह ९ प्रमुख मंदिरांमध्ये वितळवले जाते.
स्टालिन सरकारने मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, ही योजना गेली ४४ वर्षे सुरु आहे. आतापर्यंत, मंदिरांमध्ये ठेवलेले ५०० किलो सोने वितळले गेले असून बँकांमध्ये जमा केले गेले आहे. राज्य सरकारला व्याज म्हणून ११ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने आता २,१३७ किलो सोने वितळवण्याचा निर्णय घेतला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे सांगण्यात आले.
एका याचिकाकर्त्याने म्हंटले आहे की, तामिळनाडूचे तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार राज्यातील ३८,००० मंदिरांमध्ये ठेवलेले २००० किलोहून अधिक सोने ठेवलेले आहे. ज्यांची अंदाजे किंमत १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे सर्व सोने वितळवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. हे दागिने मंदिरांचे आहेत आणि भक्तांनी त्यांना दान केले आहेत. त्यामुळे सरकारला त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही. प्रश्न असा आहे की, ६० वर्षांपासून कोणतेही रजिस्टर राखले जात नाही. तर कोणते दागिने वापरले जात नाहीत आणि कोणते १० वर्षे जुने आहेत याची माहिती कुठून मिळणार? असा प्रश्न विचारला गेला आहे.