अगदी स्वच्छ शब्दांत सांगायचे, तर हे सर्व गट संघ विचारधारेला धोकादायक आहेत. त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा मुखवटा पांघरलेला आहे. ‘आम्ही सनातनी आहोत, सनातन धर्माचे रक्षक आहोत, आम्ही शाकाहारी आहोत, शाकाहाराचे पालन झाले पाहिजे, हिंदू सणासुदीला मांस विक्री होता कामा नये, दारूची दुकाने बंद झाली पाहिजेत, या देशात राहायचे असेल, तर सर्वांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे, ‘जय श्रीराम’चा नारा दिला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या युवकांना ठोकून काढले पाहिजे.’ अशी त्यांची भाषा आहे.
जेव्हा एखादी संघटना दुर्बल असते तेव्हा, दुर्बलतेमुळे तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे येतच राहतात आणि जेव्हा ती सशक्त होते, तेव्हादेखील शक्तिमान झाल्यामुळे नवीन प्रकारची संकटे निर्माण होतात. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच उदाहरण घेऊ. आणीबाणीपर्यंत रा. स्व. संघ देशातील सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ होता आणि देशातील मुख्यधारेतील विचारवंतांच्या दृष्टीने संघ टीकेचा, उपहासाचा आणि वाट्टेल ते आरोप करण्याचा विषय होता. तेव्हा संघाची शक्ती समाजाच्या विविध माध्यमांतून व्यक्त झालेली नव्हती. संघाला शासकीय रोषाचा मार खावा लागत होता आणि तथाकथित बुद्धिवाद्यांचे फटके खावे लागत होते.
हळूहळू या परिस्थितीत बदल होत गेला. सरकारी रोषाचा आणि बुद्धिवाद्यांच्या उपेक्षेचा संघाच्या वाढीवर काही परिणाम झाला नाही. संघ कार्यकर्ते दत्तचित्ताने आपापल्या क्षेत्रात काम करीत राहिले. प्रतिकूल काळातही ते डगमगले नाहीत, आपापल्या क्षेत्रांत त्यांनी भरीव काम उभे केले. या कामाचे परिणाम समाजात दिसू लागले. तसे राजकीय क्षेत्रातसुद्धा जाणवू लागले. संघ विचारधारेला प्रेरणास्थानी मानून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्षणीय यश प्राप्त होत गेले. यशाची चढती कमानच राहिली आहे.
या यशस्वी वाटचालीवर सगळ्यात मोठा कळस २०१४ साली चढविला गेला. देशात सत्तापरिवर्तन झाले आणि संघ विचारधारेचे लोक केंद्रस्थानी सत्तेवर आले. एक स्वयंसेवक पंतप्रधान झाला, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री झाले, हिंदू समाजाच्या आस्थेचे विषय हळूहळू मार्गी लागले. अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन झाले. काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ‘३७० कलम’ रद्द झाले. सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर मिळू लागले. ‘तिहेरी तलाक’ बंद झाला. घुसखोरांना भारतीय नागरिकत्व न देण्याचा कायदा झाला.
हिंदुत्वाचा विचार आता शक्तिस्थानावर आला. समाजाची त्याला मान्यता मिळाली आणि राजसत्ता या विचारांना अनुकूल झाली. या शक्तीचा उपयोग विधायक हिंदुत्वाच्या वृद्धीसाठी करणे आवश्यक झाले. तसे वेगवेगळ्या क्षेत्रात कामही सुरू झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे प्राचीन दर्शन, वैश्विक संकल्पना जागतिक मंचावर मांडायला सुरुवात केली. जगाने ते ऐकून घेतले आणि काही जणांनी त्याचा स्वीकार केला, तर काही जण स्वीकार करण्याच्या प्रतीक्षा सूचीत आहेत.
त्याचवेळी शक्ती प्राप्त झाल्यामुळे या शक्तीचा स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणारे अनेक गट समाजात उभे राहत चालले आहेत. अगदी स्वच्छ शब्दांत सांगायचे, तर हे सर्व गट संघ विचारधारेला धोकादायक आहेत. त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा मुखवटा पांघरलेला आहे. ‘आम्ही सनातनी आहोत, सनातन धर्माचे रक्षक आहोत, आम्ही शाकाहारी आहोत, शाकाहाराचे पालन झाले पाहिजे, हिंदू सणासुदीला मांस विक्री होता कामा नये, दारूची दुकाने बंद झाली पाहिजेत, या देशात राहायचे असेल, तर सर्वांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे, ‘जय श्रीराम’चा नारा दिला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या युवकांना ठोकून काढले पाहिजे.’ अशी त्यांची भाषा आहे. अशा प्रकारचे अनेक व्हॉट्सअॅप अनेकांना येत असतात. असे व्हॉट्सअॅप पाठविणाऱ्या अनेकांना मी ब्लॉक केलेले आहे.
त्यांना असे वाटते की, भारत हिंदूराष्ट्र व्हायचा असेल, तर काही गोष्टी अगत्याने केल्या पाहिजेत. आपल्या राज्यघटनेमध्ये मूलगामी परिवर्तन केले पाहिजे. सेक्युलर शब्दाचा उच्चारही करता कामा नये. ही मंडळी पवित्र कुराणातील काही आयतांना उद्धृत करतात आणि हे तत्त्वज्ञान किती भयानक आहे, हे सांगतात. मुसलमानांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. जिहाद आणि दहशतवाद त्यांच्या रक्तात आहे. सगळे दहशतवादी उच्च विद्या विभूषित आणि श्रीमंत घरातीलच असतात. गरिबीचा आणि दहशतीचा काही संबंध नाही, अशा प्रकारचे लेखन भरपूर चालू असते. नावं शोधून शोधून ते असे व्हॉट्सअॅप किंवा ई-मेल इकडे-तिकडे पाठवित राहतात.
असा अतिरेकी विचार करणारे हे जे गट आहेत, ते स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर धार्मिक आणि भारताचे रक्षक समजतात. संघ ज्या काळात राज्यसत्तेकडून मार खात होता आणि बुद्धिवाद्यांकडून थपडा खात होता त्यावेळी हे सगळे ‘शूरवीर’ कुठल्या बिळात लपून बसले होते? हे आपल्याला माहीत नाही. संघ विचारधारा शक्तिमान होत चाललेली आहे, तिचा लाभ घेतला पाहिजे आणि लाभ घेण्यासाठी ‘राजापेक्षाही राजनिष्ठ आम्ही आहोत’ हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. हा सर्व भयानक प्रकार आहे. म्हणून या मंडळींना चार हातच नाही, तर १०० हात दूर ठेवले पाहिजे. त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवणे धोकादायक आहे. कारण यांना असे वाटते की, आपलीच मंडळी सत्तेवर आहेत, तेव्हा आपल्याला काहीही करण्याचा परवाना मिळाला आहे.
‘अल जजिरा’ हे मुस्लीम जगतातील प्रसिद्ध वार्तांकन करण्याचे माध्यम आहे. २७ सप्टेंबरच्या वार्तांकनात मोठा लेख त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. या लेखात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्वांचल या ठिकाणी मुस्लीम फेरीवाले, मुस्लीम मांसविक्रेते, मुस्लीम उपाहारगृह चालविणारे यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो, याचे एकामागून एक किस्से दिले आहेत. हे ‘अल जजिरा’ मुस्लीम जगतात मोठ्या प्रमाणात वाचले जाते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अरबस्तानातील मुस्लीम देशांशी नव्याने संबंध बांधण्याच्या कामात व्यस्त आहेत. अबुधाबीला मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘अल जजिरा’च्या या बातम्या जर वाचल्या, तर भारताविषयीची विकृत प्रतिमा निर्माण करण्यात ते गुंतले आहेत, हे लक्षात येईल आणि त्यांना ही संधी स्वत:ला कट्टर आणि ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणवणारे देत असतात.
‘विश्वगुरू भारत’ ही संकल्पना घेऊन आज संघाचे काम चालू आहे. आपलाच एक स्वयंसेवक राजकीय माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरू भारत ही संकल्पना आंतरराष्ट्रीय समुदायाला समजेल, अशा भाषेत मांडत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आमची विचारसरणी आहे. परमेश्वर एक असून त्याला संबोधण्याची नावे वेगवेगळी आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. हे सर्व मार्ग सत्य आहेत. हा आपला सनातन विचार आहे. सर्व विश्व एक कुटुंब आहे आणि सर्व मानवजात परस्परांचे बंधू आणि भगिनी आहेत. हा वैश्विक बंधू-भगिनी भाव जागविण्याचे काम म्हणजे आजचा संघ आहे.
भारतातील मुसलमानांच्या संबंधी आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे, हे सरसंघचालक मोहनजी भागवत अतिशय स्पष्टपणे मांडत आहेत. भारतातील सर्व मुसलमान एकेकाळी हिंदूच होते. त्यांची उपासना पद्धती बदलली म्हणून बापजादे बदलत नाहीत, पूर्वज बदलत नाहीत. संस्कृती बदलण्याचे कारण नाही, हे सर्व आपलेच बांधव आहेत. हा विचार संघाने वेळोवेळी मांडलेला आहे. त्याला छेद देणारे विषय हे त्याज्य आहेत. स्वत:ला कर्मठ समजणाऱ्यांना असे वाटते की, मुसलमानांचा तीव्र द्वेष केल्याशिवाय आणि त्यांच्यातील उणिवा मोठ्या करून सांगितल्याशिवाय आपले हिंदुत्व सिद्ध होत नाही. या प्रकारची भावना हा विकृत विचार आहे. संघाचे म्हणणे असे आहे की, माझे हिंदुत्व स्वयंसिद्ध आहे. ते कोणाच्या मुसलमान व ख्रिश्चन असण्यावर अवलंबून नाही. ते संकुचित तर अजिबातच नाही. ते वैश्विक आहे. कोणत्याही प्रकारची संकुचितता त्यात बसत नाही. सर्व समावेशकता हा तिचा आत्मा आहे.
इतिहासकाळात आपल्याच चुकांमुळे आपलेच बांधव आपल्याला परके झाले. ते परधर्मात गेले, तिथले रीतिरिवाज आणि पूजा पद्धतींची त्यांना सवय झालेली आहे. त्यांना त्यांचे रीतिरिवाज आणि पूजा पद्धतींसहित आपल्यात सामावून घ्यावे लागेल. हे काम वाट्टेल ते व्हॉट्सअॅप मेसेजेस पाठवून आणि विद्वेषाचे वातावरण निर्माण करून अजिबात होणार नाही. विश्वासाचे वातावरण निर्माण करून हे काम होईल. हे दीर्घकालीन काम आहे. दोन-तीन पिढ्यांपर्यंत करत राहावे लागणार आहे. ‘पी हळद आणि हो गोरी’ इतका हा सोपा मार्ग नाही. परंतु, त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. या दिशेने वाटचाल करीत असताना जे आपल्याबरोबर येतील, त्यांना आपले समजले पाहिजे आणि जे कट्टरतेची गोल टोपी डोक्यावर घालून आम्ही तुमच्यापेक्षा कट्टर हिंदुत्ववादी आहोत, अशी भूमिका घेऊन उभे राहतील ते आपले नाहीत, हेदेखील लक्षात ठेवायला पाहिजे.
शक्ती वाढल्यानंतर वाढलेल्या शक्तीचे जसे सुपरिणाम दिसतात, तसे या शक्तीचा नीट बोध करून घेतला नाही आणि या शक्तीला योग्य दिशेने कामाला लावले नाही, तर या शक्तीमुळेच अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रश्न निर्माण करणारे आज उभे राहिले आहेत. त्यांच्यापासून आपण सावध असले पाहिजे, यासाठी हा लेखनप्रपंच.