मुंबई: गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे स्वच्छता अभियान, पदयात्रा, खादीचा प्रसार असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, खा. प्रकाश जावडेकर , आ.आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे आदी राज्यात झालेल्या वेगवेगळया उपक्रमांत सहभागी झाले होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात लोकसहभागातून स्वच्छतागृहांची सफाई आणि नूतनीकरण अभियानाचा प्रारंभ केला. त्यांनी खादी दुकानालाही भेट देऊन खादी कपड्यांची खरेदी केली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथे स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. दानवे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी विलेपार्ले येथे खादी दुकानाला भेट देऊन खादी कपड्यांची खरेदी केली. तावडे यांच्या हस्ते विलेपार्ले येथे सेवा समर्पण अभियानाअंतर्गत चष्मे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
खा. प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात निघालेल्या पदयात्रेत सहभाग घेतला. खा. जावडेकर यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेत प्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे, सचिव प्रवीण घुगे आदी सहभागी झाले होते.