सामान्यत: एखाद्या खेळाडूकडे त्याला ज्या खेळात उत्तम प्रदर्शन करायचे आहे, पदक मिळवायचे आहे, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक ‘फिटनेस’ ठेवायचा आहे, या महत्त्वाच्या ‘गरजा’ परिपूर्ण करताना त्या कशा हाताळायच्या, त्यांच्या मनात खात्री आहे की नाही, त्यांना शारीरिक दुखापती झालेल्या आहेत का, यांच्या मनातला आत्मविश्वास शाबूत आहे का? या महत्त्वाच्या आंतरिक स्रोतांवर अवलंबून आहे. म्हणजेच गरज आणि स्रोत यांचा तराजू समतोल आहे का, हे महत्त्वाचे आणि निर्णायक ठरते.
तणावाच्या अनेक व्याख्या आपण समजावून घेत असतो. प्रत्येकाला आपला तणावाचा अनुभव हा अधिक खरा आणि तीव्र वाटत असतो. पण, तणाव किंवा ‘स्ट्रेस’ हा एक प्रसंग आहे वा घटना आहे. यामुळे माणसाच्या आयुष्यातील अनेक घटक आणि घटना यांचा त्यांच्या जीवनावर होणारा विघातक परिणाम लक्षात घेतला जातो. काही तणावजन्य घटना सगळ्यांच्याच आयुष्यात ‘स्ट्रेस’ निर्माण करतात. यात दैनंदिन कटकटी आणि भांडणं असू शकतात. आयुष्यातील महत्त्वाचे बदल करणार्या घटना असू शकतात आणि वातावरणात घडणार्या नैसर्गिक आघातांसारख्या महत्त्वाच्या घटनाही असू शकतात. आपण ज्याचा ‘तणाव’ म्हणून उल्लेख करतो, तो खर्या अर्थाने तणावजन्य घटनेला माणसाने दिलेला प्रतिसाद (रिस्पॉन्स) आहे. म्हणजे एखादी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते, यावरच तिला तणाव आहे की नाही, ते ठरते. पण, एखादी घटना घटल्यानंतर त्या घटनेचा प्रतिसाद हा ती व्यक्ती कसा देते, हेसुद्धा त्या दोघांमध्ये वैचारिकदृष्ट्या नक्की काय देवघेव होते वा कुठला व्यवहार घडतो, यावर अवलंबून आहे. अपयशामुळे प्रत्येक व्यक्तीचे नैतिक खच्चीकरण होतेच, असे नाही. काही व्यक्ती पुन्हा एकदा नूतन नव्या जोमाने आपले आयुष्य घडवितात, असेच खेळाडूंच्या बाबतीत तणावाचे खोल विवरण महत्त्वाचे ठरते. खेळाडूंचा तणाव हा बाह्य परिस्थितीशी वा दबावाशी संबंधित आहे, असे ठाम सांगता येणार नाही. तथापि ते अशा परिस्थितीचा प्रतिकार कसा करतात, स्वत:ला कसे सांभाळून घेतात, यावर हे अवलंबून असते.
सामान्यत: एखाद्या खेळाडूकडे त्याला ज्या खेळात उत्तम प्रदर्शन करायचे आहे, पदक मिळवायचे आहे, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक ‘फिटनेस’ ठेवायचा आहे, या महत्त्वाच्या ‘गरजा’ परिपूर्ण करताना त्या कशा हाताळायच्या, त्यांच्या मनात खात्री आहे की नाही, त्यांना शारीरिक दुखापती झालेल्या आहेत का, यांच्या मनातला आत्मविश्वास शाबूत आहे का? या महत्त्वाच्या आंतरिक स्रोतांवर अवलंबून आहे. म्हणजेच गरज आणि स्रोत यांचा तराजू समतोल आहे का, हे महत्त्वाचे आणि निर्णायक ठरते. त्यांच्या स्रोताचे पारडे हलके झाले, तर त्यांना तणाव निश्चित झपाटणार! कारण, त्यांचा स्रोत किंवा ‘रिसोर्सेस’वरच ते आपल्या गरजा किंवा मागण्या पूर्ण करतील की नाही, याचा निर्णय होतो. खेळाच्या स्पर्धेत अपेक्षा खूप असणारच! त्याचा तणाव प्रत्येक खेळाडूला जाणवेलच. तथापि त्यांचा आत्मविश्वास, या परिस्थितीला आपल्या नियंत्रणात कसे ठेवायचे, याचे नियोजन आणि आपल्या स्पर्धेकडे आपण किती सकारात्मक आणि आशादायक दृष्टीने पाहतो, यावर त्या खेळाडूचे आत्मिक स्रोत अवलबूंन असतात. हे आत्मबलाचे स्रोत जेव्हा भक्कम असतात, तेव्हा तो विपरित परिस्थितीतही विजयश्री आपल्यामागे खेचून आणतो. रविकुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांनी जी विजयी पदकं मिळवली, ती याच त्यांच्या आत्मिक ऊर्जेमुळे अधिक महत्त्वाची ठरतात. हे दोघंही ग्रामीण भागातून येऊन जागतिक दर्जाचे मल्ल ठरले. त्यांनी ‘करिअर’ घडविण्यासाठी वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच अतीव कष्ट आणि कठोर शिस्तपालन केले. आत्मबल हे घडत जाते, ते कडक आत्मशिस्तीच्या आणि त्यागाच्या वेदीतून. या दोघांचे लहानपण हे खूप कठीण परिस्थितीतून गेले आहे. रवी दहियाला गुडघ्याच्या गंभीर दुखापतीतून आणि पैसे कसे जमवायचे, या चिंतेत गेले. पण, त्याचे आत्मिक बल आणि दृढ विश्वास हे त्याचे सामर्थ्य म्हणून सिद्ध झाले. बजरंग पुनियाचे शब्दच त्याच्या प्रबळ आत्मविश्वासाचे दर्शन घडवितात. तो म्हणतो,''You have to train well to win a medal. God can't help you if you sit at home. One needs to works hard.''
खेळाच्या स्पर्धेत वा मैदानात प्रवेश करताना घडणारा प्रत्येक बदल एक नवीन आव्हान खेळाडूसमोर उभे करतो. अशावेळी तो त्या बदलाला सकारात्मक किंवा नकारात्मक वृत्तीने सामोरा जातो, यावर त्याचे यश अवलंबून आहे. ज्यावेळी त्यांची आत्मिक ऊर्जा त्यांना साथ देते आहे, याचे भान त्यांना राहते तेव्हा परिस्थितीला ताब्यात घ्यायचा, आत्मविश्वासही त्यांना अधिक प्रमाणात मिळतो. एमा राडूकॅनू या १८ वर्षीय अमेरिकन टेनिस खेळाडूने जगावर यशाचा झेंडा जणू कायमसाठी रोवला होता. तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे खेळाचे सामर्थ्य, तिची जगप्रसिद्धी सगळेच कसे भारावलेले! प्रत्येक जण तिचा खेळ पाहताना मोहनिद्रेत जात असे. तिची कीर्ती आणि जाहिरातीमधील व्यापारी मोल सगळेच कल्पनातीत. खेळाच्या कुशल वरदानाबरोबर तिला सौंदर्याचा खजिनाही परमेश्वराने भरभरून दिलेला असल्यामुळे तिच्या विश्वविख्यात कारकिर्दीला खर्या अर्थाने चारचांद लागलेले. सर्वजण तिच्याकडून पराभवाची अपेक्षा स्वप्नात पण करत नसत. अशी ती एमा कुणाच्या ध्यानीमनी नसताना ‘इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंट’मध्ये पहिल्याच खेळात आश्चर्यकारकरित्या पराभूत झाली. त्यावेळी ती तिच्या प्रसिद्धीच्या वलयाचे ओझे, लोकांच्या अपेक्षेचा भार आपल्या खांद्यावर पेलू शकली नाही. लहान वयातच तिने यश आणि अलौकिक मानमरातब सहज पाहिला. ती पट्टीची टेनिसपटू आहे, यावर कुणाचे दुमत नसावे. पण, कुठेतरी ऐनवेळी तिचे आत्मिक बल तिच्या हातातून निसटले आणि त्या सामन्यात तिने यश गमाविले. खेळाडूसाठी या अनिश्चित प्रसंगांना टाळायचे असेल वा सामोरे जायचे असेल, तर योग्य मानसिक सल्ला वेळोवेळी घ्यायला हवा. खेळात आणि आयुष्यात ही प्रगल्भता येण्यास वेळ लागतो. तोवर धीर आणि स्थैर्य व्यक्तिमत्त्वात रुजवणे खूप आवश्यक आहे. (क्रमश:)
- डॉ. शुभांगी पारकर