‘सेकंड हॅण्ड’ वाहन खरेदीपूर्वी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2021   
Total Views |

vehicle_1  H x
 
 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आजचा विजयादशमीचा सण हा खरेदीसाठी शुभ मानला जातो. या मुहूर्तावर अनेकांचा वाहनखरेदीकडेही कल दिसतो. त्यातच कोरोना काळातील सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधांमुळे ‘सेकंड हॅण्ड’ का होईना, आपणही एखादे वाहन खरेदी करावे, असे वाटणाऱ्यांची संख्याही सध्या वाढली आहे. तेव्हा त्यानिमित्ताने तुमचा किंवा तुमच्या परिजनांचा ‘सेकंड हॅण्ड’ वाहनखरेदीचा विचार असेल, त्याविषयी काही प्रश्न मनात असतील तर त्या सगळ्या शंका-कुशंकांची उत्तरे देणारा हा लेख...
बऱ्याच लोकांना स्वत:चे वाहन असावे, विशेषत: चारचाकी आपल्या दारात असावी, याबाबतची ‘क्रेझ’ असते. तसेच नवीन चारचाकी घेणे परवडणारे नसले, तरी ‘सेकंड हॅण्ड’ घेऊन आपली इच्छा पूर्ण करणारे बरेच असतात. ‘सेकंड हॅण्ड’ चारचाकी जेवढ्या जास्त जुन्या तेवढी कमी किंमत. दोन-तीन वर्षांच्या वापरानंतर जर विक्रीस काढली असेल, तर नवीन चारचाकीच्या तुलनेत १५ ते २५ टक्के कमी किमतीत मिळतात. कोरोनामुळे प्रवास करताना लोकसंपर्क टाळला जावा म्हणून बऱ्याच जणांनी कमी किमतीत ‘सेकंड हॅण्ड’ चारचाकी खरेदीला पसंती दिली. कारण, कोरोनाचा विचार करता सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनातून प्रवास करणे कधीही चांगले!
 
‘सेकंड हॅण्ड’ चारचाकी घेण्यापूर्वी आर्थिक व ‘डॉक्युमेन्टेशन’ बाबतची पूर्ण माहिती हवी. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारचे, कोणत्या ‘मेक’चे, कोणते ‘मॉडेल’ विकत घ्यायचे आहे, हे निश्चित करा. तुमची ही चारचाकीची जर पहिलीच खरेदी असेल, तर सर्वात कमी किमतीला विकल्या जाणाऱ्या चारचाकींना प्राधान्य द्या. या अशा कमी किमतीच्या चारचाकी चालविण्याने तुमचे ‘ड्रायव्हिंग’ कौशल्यही सुधारेल. चार-एक वर्षे वापरलेली व कमी किमतीची चारचाकी विकत घेतल्यास ती खिशाला चांगली परवडू शकेल. चारचाकी विकत घेताना चारचाकीसाठी करावा लागणाऱ्या देखभाल-दुरुस्ती खर्चाचाही मुद्दा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सध्या भारतात इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. तरीही ‘सेकंड हॅण्ड’ को होईना, वाहनखरेदीचा कल कायम दिसतो.
 
 
 
‘सेकंड हॅण्ड’ कार तुमच्या आर्थिक ताकदीनुसार निवडण्यासाठी बरेच ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स’ आजघडीला उपलब्ध आहेत. परिणामी कोणीही ‘ऑनलाईन’ ‘सेकंड हॅण्ड’ कार खरेदी करु शकतो. तुम्ही कार खरेदी करण्यासाठी जी रक्कम ठरविली असेल आणि तुम्हाला तुमच्या पसंदीची कार मिळत असेल, तर तुम्ही ठरविलेली रक्कम आणखी दहा टक्क्यांपर्यंत वाढविण्याची तयारी ठेवा. कार किती जुनी आहे, या मुद्द्याला महत्त्व द्या. एखाद्या चांगल्या ‘मेकॅनिक’ला दाखवून कारच्या स्थितीबाबत व्यवस्थित माहिती करुन घ्या. कार जर दोन ते तीन वर्षांहून जुनी असेल, तर बँका कर्ज देत नाही. याशिवाय कारने किती किलोमीटर प्रवास केला आहे? कार मालकाचे ‘प्रोफाईल’ काय? कारने कोणत्या कोणत्या विभागात, प्रदेशात प्रवास केला आहे? कारला अपघात झाले आहेत का व मूळ गाडीत काही बदल केले आहेत का? हे सर्व खरेदी करण्यापूर्वी तपासावे. ‘सेकंड हॅण्ड’ कार घेताना ‘सर्व्हिस हिस्ट्री’ व ‘ओडोमीटर रेकॉर्ड’ याची मागणी करावी. एखादी चारचाकी पसंद केल्यानंतर कुठच्याही अधिकृत यंत्रणेकडून आर्थिक साहाय्य मिळू शकेल का, हे पाहावे. नाहीतर पूर्ण रक्कम स्वत:कडील काढावी लागेल. तुम्ही ‘सेकंड हॅण्ड’ कार थेट अगोदरच्या मालकाकडून घेतलीत, तर वेगळे आर्थिक व्यवहार होतात आणि ज्या कंपन्या जुन्या कार विकतात, त्या कंपनीकडून जुनी कार घेतली, तर आर्थिक व्यवहार वेगळे असतात. या जुन्या कार विकणाऱ्या कंपन्या व ‘फिनटेक’ कंपन्या किंवा बँका यांच्याशी सामंजस्य करार झाले असतात. त्यामुळे जुन्या कार विकणाऱ्या कंपनीकडून कार विकत घेतली, तर अर्थसाहाय्य मिळण्याची शक्यता जास्त असते. कारविक्रीची निश्चित झालेली पूर्ण रक्कम कर्ज म्हणून विकत नाही. यापैकी काही टक्के स्वत:च्या खिशातून उभारावी लागते.
 
 
सध्या अर्थव्यवस्थेत कर्जाची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे बँका तसेच ‘नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या’ (एनबीएफसी) यांच्याकडून जुन्या कारला कर्जे मिळत आहेत. ‘फिनटेक प्लॅटफॉर्म्स’वरुनही कर्जे मिळू शकतात, पण कर्ज घेताना किती व्याजदराने कर्ज ‘ऑफर’ केले जात आहे, याची माहिती करून घ्या. तसेच कर्जावर ‘फिक्स्ड’ की ‘वेरिएबल’ व्याजदर लावला जाणार आहे, हे जाणून घ्या. या विषयातील जाणकरांच्या मते, यात कर्जावर ‘फिक्स्ड’ व्याजदर चांगला. कर्जांवर व्याजाशिवाय बँका किंवा ‘एनबीएफसी’ आणखीन काही अतिरिक्त शुल्क व शुल्क आकारत नाहीत ना, याची खात्री करून घ्या. तुम्हाला मुदतपूर्व कर्ज परत करावयाचे असेल, त्या दिवसापर्यंतचे व्याज आकारले जाणार की व्याज संपूर्ण कालावधीचे घेतले जाणार, याची खात्री करून घ्या. नवीन कारना आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरापेक्षा जुन्या कारना अधिक दराने व्याज आकारले जाते. सध्या जुन्या कारना दहा टक्के व त्याहून अधिक दराने व्याज आकारले जाते, तर नवीन कारना ७.५० टक्के व त्याहून अधिक दराने व्याज आकारले जाते.
 
 
कर्ज देणारी यंत्रणा प्रक्रिया शुल्कही वसूल करते. हे प्रक्रिया शुल्क कारच्या रकमेच्या एक ते तीन टक्के दराने आकारले जाते. जुन्या कारसाठी कर्ज घेताना तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकेल का, हेदेखील पाहा. कारण, काही काही वेळा वैयक्तिक कर्ज हे जुन्या कार आकारण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी असते. असे जर असेल तर जुन्या कारसाठी कर्ज घेण्यापेक्षा वैयक्तिक कर्ज घेऊन आपली गरज भागवावी. वैयक्तिक कर्जाला प्रक्रिया शुल्कही कमी दराने आकारले जाते.
 
‘डॉक्युमेन्टेशन’
 
जुनी कार विकत घेताना सर्व ‘डॉक्युमेंट्स’ व्यवस्थित तपासून ताब्यात घ्यावीत. कारचे ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’, विमा, ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र ,‘पीयुसी’ (पोल्युशन अंडर कंट्रोल) सर्टिफिकेट, याशिवाय कारच्या मालकीचे हस्तांतरण झालेले आहे, हे प्रादेशिक वाहतूक कार्यालयात फॉर्म-२९ व ३० सादर करून कळवावे लागेल. नाव, मालकी बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. जर मूळ मालकाने कर्ज घेऊन कार घेतली असेल व अजून जर कर्जाचा परतावा झालेला असेल, तर मूळ मालकाला ते कर्ज पूर्ण फेडावे लागेल. कर्ज फेडल्यानंतर कर्ज दिलेल्या यंत्रणेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र व ‘फॉर्म ३५’वर ‘स्टॅम्प’ घ्यावा लागेल. कर्ज देणाऱ्या यंत्रणेने दिलेले हे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र ‘सेकंड हॅण्ड’ कार घेणाऱ्याच्या ताब्यात हवे. अगोदरच्या कारमालकाची ‘ई-चलन’ कधी भरण्याची बाकी आहेत का, याचीही माहिती घ्यावी व शिल्लक ‘ई-चलन’ त्याला पैसे देण्यापूर्वी त्याने भरली आहेत, याचे पुरावे पाहावेत. हा व्यवहार जर आंतरराज्यांतील असेल, तर ज्या राज्यात कार विकत घेतली आहे, त्या राज्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागेल व जुनी कार विकत घेणारा हे प्रमाणपत्र त्याच्या राज्यात ‘रि-रजिस्टर’ करू शकेल. तसेच विमा पॉलिसी ही जुनी कार घेणाऱ्याने तत्काळ आपल्या नावे करून घ्यावी किंवा नवीनच पॉलिसी उतरवावी.
 
@@AUTHORINFO_V1@@