(महाराष्ट्र बंद दरम्यान दादर मार्केट येथील स्थिती : छायाचित्र - अथर्व आगरकर)
ठाणे : कोरोनातून व्यापारी व उद्योजक आता जेमतेम बाहेर पडत आहेत. शिवाय, सणासुदीमध्ये अचानक बंद पुकारणे योग्य नाही. तेव्हा, बंद करून नाहक जनतेला वेठीस धरू नका, असा आक्रोश ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ने (टिसा) रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी व्यक्त केला आहे.
सोमवार, दि, ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तीन सत्तारूढ पक्षांनी पुकारलेल्या बंदला ठाण्यातील उद्योजक व व्यापार्यांनी विरोध दर्शवला आहे. “कोरोनातून आताच आपण सर्व व्यापारी आणि उद्योजक कुठेतरी जेमतेम बाहेर पडत आहोत आणि सणासुदीच्या काळामध्ये अचानकपणे मध्येच बंद करणे योग्य नाही. जी घटना उत्तरप्रदेशात घडली, त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. त्याचे समर्थन कुणालाही करता येणार नाही,” असे ‘टिसा’ने पाठवलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
“आंदोलने करा, मोर्चे काढा. पण, संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका. असा बंद करून काय साध्य होणार? आतापर्यंत जे बंद झाले, त्यास कधीही सरकारने दुजोरा दिलेला नाही. आता आपल्याच तीन पक्षांचे सरकार आहे. तरी कृपया महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका. सरकार आपलेच, पोलीसही आपलेच आणि बंददेखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकार बंद हाणून पाडते. परंतु, या खेपेला बंद पुकारणारेच बंदची अंमलबजावणी करणार?” अशी प्रश्नांची सरबत्ती ‘टिसा’ने करून सत्ताधार्यांना जाब विचारला आहे.
दाद कोणाकडे मागायची?
“आधीच नुकसानग्रस्त असल्याने सगळ्यांना मदतीची गरज आहे. तेव्हा अशात बंद पुकारणे योग्य नाही. शेतकर्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे. अशा सर्वांना नुकसानभरपाई कोण देणार?” असा प्रश्न ‘टिसा’ने केला आहे.