...आणि 'लिबर्टी' लज्जीत झाली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021   
Total Views |

America_1  H x
 
 
ज्या ज्या कुणी अमेरिकेच्या मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना एकजुटीने अमेरिकन जनतेने चिरडून टाकले आहे. मग तो हिटलर असेल किंवा जपान असेल किंवा ओसामा बीन लादेन असेल, ही जीवनमूल्ये अमेरिकेने प्राणापलीकडे जपलेली आहेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' त्याचे प्रतीक आहे. ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्याने ती लज्जीत झाली.
 
अमेरिकेची संसद 'कॅपिटॉल' या संसदेच्या इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी दि. ६ जानेवारी, २०२१ रोजी हल्ला केला. या बातमीने अमेरिकेबरोबर सारे जगही हादरले. अमेरिकेच्या लोकशाही राजवटीचा इतिहास २३० वर्षांहून अधिक काळाचा आहे. राजेशाही किंवा सुलतानशाही यांची राजवट ३०० ते ५०० वर्षे टिकल्याचा इतिहास आहे. या राजवटी बळाचा वापर करून चालविल्या गेल्या. राज्यातील लोकांना संपत्तीचाच काय; पण जगण्याचादेखील अधिकार नव्हता. इंग्लंड आणि युरोपातील देशांमध्ये राजेशाही लोकांनी उलथून टाकल्या आणि लोकच राजे झाले. जिथे लोक राजे असतात, त्या राजवटीला 'लोकशाही' म्हणतात. लिखित संविधान तयार करून घटनात्मक लोकशाही शासनपद्धती जगात सर्वप्रथम अमेरिकेने निर्माण केली. राज्यशास्त्रातील अमेरिकेचा हा सगळ्यात मोठा शोध आहे. १७७६ पासून अमेरिकेत स्वातंत्र्ययुद्धाला प्रारंभ झाला. तेव्हाची अमेरिका अतिशय लहान होती. फक्त १३ वसाहती होत्या. नंतर त्यांना राज्याचा दर्जा मिळाला. (आज अमेरिकेत ५० राज्ये आहेत) १३ राज्यांच्या समूहाची अमेरिका तयार झाली. हे अत्यंत कठीण काम होते. ते अमेरिकेने, घटनाकारांनी आणि जनतेने करून दाखविले. प्रारंभापासून जॉर्ज वॉशिंग्टन, जेम्स मॅडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन इत्यादी महान राष्ट्रपुरुषांनी एक भूमिका सातत्याने मांडली. आपल्या प्रजासत्ताकाचे भवितव्य जनतेच्या हातातच आहे. आपले भवितव्य कुणीही राजनेता ठरवू शकत नाही-तो कितीही महान असला तरीही! आपल्या भाषेत सांगायचे तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेचे पहिले शब्द आहेत, ' We the People of the United States' अमेरिकेच्या लोकशाहीच्या रक्षणाची सर्व जबाबदारी जनतेवर टाकण्यात आलेली आहे.
 
 
 
जून १७८९ मध्ये जेम्स मॅडिसन यांचे अमेरिकेच्या काँग्रेसपुढे (ज्या काँग्रेस भवनावर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला) भाषण झाले. त्यात ते म्हणाले की, “आपल्या संविधानाचे प्रारंभीचे शब्द 'आम्ही अमेरिकेचे लोक' असे टाकण्याचे कारण असे की, सर्व शक्तीचा उगम मूलतः हा जनतेतून होतो आणि जनतेकडूनच शक्ती घेतली जाते. जे शासन अस्तित्वात येते, त्या शासनाने लोकहितासाठी कार्य केले पाहिजे. लोकहित, जीवनाचा अधिकार, लिबर्टीचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार, यात समावलेला आहे. लोकांकडे हस्तांतरित न होणारे, पुसून न टाकता येणारे, काढून न घेता येणारा एक अधिकार आहे. तो म्हणजे अस्तित्वात असलेले शासन सुधारण्याचा आणि त्यात परिवर्तन करून आणण्याचा.” जेम्स मॅडिसन यांच्या विचाराप्रमाणे अमेरिकेची शहाणी जनता वागत आली आहे. या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांचे शासन कुचकामी ठरवून बदलले आहे. ट्रम्प यांना ही गोष्ट आवडलेली नाही. ते हुकूमशहाप्रमाणे वागू पाहतात. असली हुकूमशाही अमेरिकन जनता स्वीकारीत नाही. या संदर्भात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जो इशारा दिला आहे, तो लोक विसरलेली नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन म्हणतात की, “धोकादायक हुकूमशाहीचा उगम वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या देशात भयानक पद्धतीने झालेला आहे. तो होण्याचे कारण असे की, एका गटाने दुसर्या गटावर सूडबुद्धीच्या भावनेने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हुकूमशाहीचा जन्म होतो. असे जर घडत राहिले, तर कायमस्वरूपाची जुलूमशाही संस्थागत रूपाने अस्तित्वात येऊ शकते.” जॉर्ज वॉशिंग्टन यांनी जणूकाही २३० वर्षांपूर्वी 'ट्रम्पगिरी'चे भाकित केलेले दिसते.
 
 
न्यूयॉर्कच्या समुद्रात 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आहे. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' ही अमेरिकेची जागतिक ओळख आहे. हा भव्य पुतळा फ्रेंच नागरिकांनी आपल्या स्नेहाचे प्रतीक म्हणून अमेरिकेला दिलेला आहे. या पुतळ्याचा अर्थ काय होतो? अमेरिकेचा इतिहास म्हणजे 'लिबर्टी'चा इतिहास आहे. ही 'लिबर्टी' म्हणजे तरी काय? 'लिबर्टी'चा एक अर्थ होतो, स्वातंत्र्य. त्यासाठी इंग्रजीमध्ये 'फ्रीडम' हा शब्द आहे. 'लिबर्टी'च्याऐवजी तो शब्द कुणी वापरत नाही. 'लिबर्टी'चे अमेरिकेच्या दृष्टीने तीन अर्थ होतात. पहिला अर्थ जीवन जगण्याचा मुक्त अधिकार. कुणालाही कुणाचेही जीवन समाप्त करता येणार नाही. राज्यसत्तेला तर मुळीच करता येणार नाही. दुसरा अर्थ होतो, भाषण, लेखन, संचार, विचार आणि उपासनेचे स्वातंत्र्य, कुणाचाही आवाज बंद करता येणार नाही. कुणाच्याही लेखणीवर बंधने घालता येणार नाही आणि कुणावरही उपासना पद्धती लादता येणार नाही. आणि तिसरा अर्थ होतो, स्वतःचे जीवन सुखी करण्याचा मार्ग शोधण्याचे प्रत्येकाला अमर्याद स्वातंत्र्य. 'Life, Liberty and the pursuit of Happiness' ही अमेरिकेची मूल्य परंपरा आहे. ट्रम्प समर्थकांनी 'कॅपिटॉल'वर हल्ला करून या मूल्य परंपरेवरच हल्ला केला आहे. हल्ला करणारे संघटित होते आणि त्यांनी तो ठरवून केला. अमेरिकन जनता त्यांना क्षमा करणार नाही. अमेरिकन जनतेचा तो स्वभाव नाही. ज्या ज्या कुणी अमेरिकेच्या मूल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना एकजुटीने अमेरिकन जनतेने चिरडून टाकले आहे. मग तो हिटलर असेल किंवा जपान असेल किंवा ओसामा बीन लादेन असेल, ही जीवनमूल्ये अमेरिकेने प्राणापलीकडे जपलेली आहेत. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' त्याचे प्रतीक आहे. ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्याने ती लज्जीत झाली.
 
 
अमेरिकेत इंग्लंड आणि युरोपातील देशातून वसाहती करण्यासाठी गोरे लोक येऊ लागले. सतराव्या शतकापासून त्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत गेली. यात बहुसंख्या ब्रिटिश माणसांची होती. ब्रिटिश लोकांत बहुसंख्य प्रोटेस्टंट पंथाचे होते. प्रोटेस्ंटट पंथातीलही 'प्युरिटन' पंथातील अधिक लोक होते. त्यांचे प्राबल्य अधिक राहिले. वर जी तीन मूल्ये दिली आहेत, ती 'प्युरिटन' मूल्ये आहेत. अमेरिकेने त्याचा अंगीकार केला. ही मूल्ये जगायची असतील, तर अमेरिकेत राजेशाही निर्माण करून किंवा पोपशाही निर्माण करून जगता येणार नाहीत. म्हणून अमेरिकेने पोपशाही नाकारली, पोपला नाकारले, ब्रिटिश राजेशाही नाकारली, राजघराणे नाकारले. वंशपरंपरेने कुणीही शासक होणार नाही, अशी प्रजासत्ताकाची राजवट निर्माण केली. अमेरिकेत कुणालाही तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. लोकशाही मार्गाने गांधी घराण्याची सत्ता अमेरिकेने स्वीकारलेली नाही. वॉशिंग्टनचे घराणे राज्य करीत नाही आणि लिंकनचे घराणेदेखील राज्य करीत नाही. या दोघांचा दर्जा राष्ट्रपित्याचा आहे. ट्रम्प यांच्या डोक्यात भलतीच हवा शिरलेली आहे. त्यांना दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हायचे होते. 'आम्ही अमेरिकेचे लोक' यांनी त्यांना नाकारले. ट्रम्प म्हणू लागले, 'तुम्ही मला नाकारणारे कोण?' त्यांच्या समर्थकांनी 'कॅपिटॉल'वर हल्ला केला. लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर आपण हल्ला करीत आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. लोकशाहीकडून जुलूमशाहीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. अमेरिकन जनता ट्रम्प यांना 'स्टम्प' करून त्यांची दांडी कधी तोडेल, हे सांगता येणार नाही. मूठभर हल्लेखोर म्हणजे अमेरिकन जनता नव्हे, ती प्रगल्भ आहे आणि आत्यंतिक संविधाननिष्ठ आहे. संविधानाशी खेळ खेळणार्याला ते क्षमा करीत नाहीत. संविधानाच्या रक्षणासाठी या १८६० ते १८६४ अमेरिकन जनतेच्या पूर्वजांनी असे गृहयुद्ध केले. सांविधानिक मूल्यांची हानी ती होऊ देणार नाही. ट्रम्पला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.
 
 
 
'लिबर्टी' ही अमेरिकेची ओळख आहे, असे जे वर म्हटले आहे, त्याचा अमेरिकेतील अर्थ होता, आपली राजकीय मते मांडण्याचे सर्वांना मुक्त स्वातंत्र्य. 'लिबर्टी'च्या रक्षणासाठी शस्त्र धारण करण्याचे स्वातंत्र्य आणि या 'लिबर्टी'वर कुणी बेकायदेशीरपणे आक्रमण केले, तर शस्त्रानिशी प्रतिकार करण्याचे स्वातंत्र्य. 'लिबर्टी' या संकल्पनेवर अमेरिकेत फार सुंदर लिहिले गेलेले आहे. तशीच अतिशय सुंदर भाषणे आहेत. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व्हर्जिनियाचे प्रतिनिधी पॅट्रीक हेन्री यांचे, “मला 'लिबर्टी' द्या नाही तर मृत्यू द्या,” असे जबरदस्त भाषण झाले. अमेरिकेतील उत्कृष्ट भाषणांपैकी हे एक भाषण समजले जाते. ट्रम्प यांच्या बेताल वक्तव्याने आणि माथेफिरू समर्थकांनी या 'लिबर्टी'वरच हल्लाबोल केला आहे. काही राजकीय नेते बेताल बडबडीसाठी गाजतात, काही राजकीय नेते हिंसक आंदोलनामुळे गाजतात आणि काही राजकीय नेते मूल्यांवरच आघात करून गाजतात, ट्रम्प यांची गणना त्यात करावी लागेल. यामुळे 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' लज्जीत होऊन म्हणत असेल, 'हेचि फल काय मम् तपाला.'
@@AUTHORINFO_V1@@