स्वदेशी लसीचा जगात डंका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021   
Total Views |

PM MODI _1  H x


 
 
 
 
‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या दोन भारतीय कंपन्यांच्या कोरोनारोधी लसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि एकच गहजब माजवला गेला. भारताच्या यशोगाथेला विरोध करण्यालाच आपले यश मानणार्‍या तथाकथित उदारमतवाद्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा वापर करण्यावर आक्षेप घेतला. समाजवादी पक्ष, काँग्रेस यांसारख्या राजकीय पक्षांनीदेखील स्वदेशात विकसित केलेल्या भारतीय लसीचा विरोध करता करता अकलेचे तारे तोडले. मात्र, भारतीय कोरोनारोधी लस आणि जगातील अन्य देशांची नेमकी भूमिका काय, हे समजल्यास इथे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ व ‘भारत बायोटेक’च्या लसीला विरोध करणारे नेमके कोणासाठी राबत आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.
 
 
 
 
 
‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’च्या तत्काळ वापराला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आणि त्याच्याही आधी भारतीय लसींची जगातील अनेक देशांनी मागणी केली. उल्लेखनीय म्हणजे, भारताच्या स्वदेशी लसनिर्मितीच्या आधीच चीननेदेखील आपणही कोरोनारोधी लस तयार केल्याचे जाहीर केले होते. जगाला कोरोना महामारीचे ‘गिफ्ट’ देणार्‍या चीनने आपणच कोरोनाला रोखणारी लस शोधल्याचे व ती अतिशय सुरक्षित असल्याचे डंका वाजवत सांगितले होते.
 
 
 
 
 
पण, नुकतीच त्याच देशाच्या डॉ. ताओ लिना यांनी चीनच्या दाव्याची पोलखोल केली आणि चिनी लस सुरक्षित नसल्याचे म्हटले. चीनने तयार केलेली कोरोनारोधी लस जगात सर्वाधिक असुरक्षित असून त्याचे मानवी शरीरावर ७३ प्रकारचे दुष्परिणाम होतात, असे डॉ. ताओ लिना यांनी सांगितले. अर्थात, नंतर त्यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले, तेही साहजिकच म्हटले पाहिजे. कारण, जिथे जॅक मा यांच्यासारखा शक्तिशाली उद्योजक गायब होऊ शकतो, कोरोना विषाणूबद्दल जरा अधिक-उणी माहिती सार्वजनिक करणारे डॉक्टर मृत्युमुखी पडू शकतात, तिथे डॉ. ताओ लिना हेदेखील स्वसंरक्षणार्थ माघार घेऊच शकतात. असो.
 
 
 
 
दरम्यान, भारतीय लसींचा देशातल्याच विघ्नसंतोषी लोकांनी केलेला विरोध आणि चीनच्या लसीबद्दल तिथल्याच डॉक्टरने दिलेल्या असुरक्षेच्या खात्रीच्या पार्श्वभूमीवर जग मात्र ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’च्या प्रतीक्षेत आहे. ब्राझील, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेसह भारतीय उपखंड आणि अनेक दक्षिण आशियाई देशांनी भारताकडे कोरोनारोधी लसींची मागणी केली आहे. चिनी लसींवर विश्वास नसल्याने ब्राझीलने ‘भारत बायोटेक’कडून सुमारे ५० लाख लसकुप्यांची मागणी नोंदवली आहे.
 
 
 
‘ब्राझिलियन असोसिएशन ऑफ वॅक्सिन क्लिनिक्स’ने आपल्या संकेतस्थळावर माहिती देत सांगितले की, आम्ही ‘भारत बायोटेक’शी लसकुप्यांच्या खरेदीसाठी ‘एमओयु’वर हस्ताक्षर केले आहे. विशेष म्हणजे, तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलमध्ये ‘सिनोव्हॅक’ या चिनी कंपनीच्या ‘कोरोनाव्हॅक’ लसीच्या क्लिनिकल ट्रायलवर बंदी घालण्यात आली होती. ‘ब्राझील हेल्थ रेग्युलेटरी’ने यावर सदर लसीचे विपरीत आणि गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे कारण दिले होते. ब्राझीलसारखीच परिस्थिती बांगलादेशातही उद्भवली होती व त्यामुळेच तिथे चीनच्या ‘सिनोव्हॅक’ कंपनीच्या ‘कोरोनाव्हॅक’ लसीच्या प्राथमिक ट्रायलनंतर आर्थिक मदतीस नकार दिला होता.
 
 
 
याउलट बांगलादेशने भारताच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’शी ‘कोव्हिशिल्ड’ लस प्राप्त करण्यासाठी करार केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भारत लवकरच आता बांगलादेशाला कोरोनारोधी लसींच्या पुरवठ्याला सुरुवात करेल. बांगलादेशानंतर चीनने हरतर्‍हेचे डावपेच आखून आपल्या हातचे खेळणे करण्यासाठी प्रयत्न केलेल्या नेपाळनेही कोरोनारोधी लसीसाठी भारताकडे मोकळ्या मनाने मदतीची मागणी केली आहे. भारताने दोन्ही कोरोनारोधी लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर नेपाळने अभिनंदनाचा संदेश पाठवत दूरध्वनीवर संवाद साधला.
 
 
 
तद्नंतर नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली म्हणाले की, “आम्ही भारताला आधीच सांगितले आहे की, तुम्ही अन्य देशांना कोरोनारोधी लसीचा पुरवठा सुरु कराल, त्यावेळी त्या यादीत नेपाळला प्राधान्य द्यावे.” दरम्यान, श्रीलंकेनेदेखील भारताकडे कोरोनारोधी लसीची मागणी केली असून भारतानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकूणच कोरोनारोधी लस उपलब्ध करुन देण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला पछाडल्याचे दिसतेच, तसेच जगाचा चीनवरील विश्वासही कमी झाल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत भारतीय स्वदेशी कोरोनारोधी लसीवरुन आरडाओरडा करणारे नेमके कोणाच्या फायद्यासाठी गोंधळ घालत आहेत, हा प्रश्नही निर्माण होतोच.

@@AUTHORINFO_V1@@