हडसन स्टक आणि ‘माऊंट डिनाली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
USA  _1  H x W:
 
 
 
 
गिर्यारोहण, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी ट्रेकर्स, भटके या लोकांच्या दृष्टीने हडसन स्टक या माणसाचा १००वा स्मृतिदिन त्याची आठवण काढावी, असा नक्कीच होता. कोण होता हा इसम?
 
 
 
दि. ११ ऑक्टोबर, १९२०चा दिवस. अलास्का प्रांतातल्या ‘फोर्ट युकॉन’मधून एक तार राजधानी वॉशिंग्टनमध्ये येऊन थडकली- ‘ ‘तो’ लांबच्या प्रवासाला निघून गेला आहे.’ संबंधित मंडळींना ती बातमी कळल्यावर अर्थातच वाईट वाटलं. आश्चर्यही वाटलं. कारण, तारेत उल्लेख असलेला ‘तो’ फार वयस्कर नव्हता, तसा फक्त ५६ वर्षांचाच होता.
 
 
 
एक जातिवंत भटक्या एक उत्तम संघटक एक तळमळीचा निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी हडसन स्टक याचं दि. १० ऑक्टोबर, १९२० या दिवशी अमेरिकेच्या अलास्का प्रांतातील ‘फोर्ट युकॉन’ या ठिकाणी न्युमोनियाने निधन झालं. म्हणजेच २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात त्याच्या मृत्यूला १०० वर्षं झाली.
 
 
 
सन २०२० या सरलेल्या वर्षात कोरोनामुळे जगभरातील अनेक महत्त्वाचे दिनविशेष, एकतर लोकांच्या आठवणीतच राहिले नाहीत किंवा आवश्यक त्या दणकेबाज पद्धतीने साजरे होऊ शकले नाहीत. आपल्याकडचा असा महत्त्वपूर्ण दिनविशेष म्हणजे लोकमान्य टिळकांचा १००वा स्मृतिदिन. १ ऑगस्ट, २०२० या दिवशी लोकमान्यांच्या मृत्यूला १०० वर्षं झाली. अगदी तितका महत्त्वाचा नव्हे, पण गिर्यारोहण, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी ट्रेकर्स, भटके या लोकांच्या दृष्टीने हडसन स्टक या माणसाचा १००वा स्मृतिदिन त्याची आठवण काढावी, असा नक्कीच होता. कोण होता हा इसम?
 
 
 
 
हडसन स्टक हा मूळचा लंडनचा. १८८५ साली वयाच्या २२व्या वर्षी तो लंडनच्या प्रसिद्ध ‘किंग्ज कॉलेज’मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला. तत्कालीन इंग्लिश होतकरु तरुणांसमोर उपजीविकेचे अनेक पर्याय होते. कारण, ब्रिटिश साम्राज्य तर जगभर पसरलेलं होतं, पण स्टक आणि त्याचा एक दोस्त यांनी ठरवलं की, आपण ब्रिटनमध्ये राहायचं नाही. आशिया नको, आफ्रिका नको, मग आता दोन पर्याय - ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका. त्यांनी चक्क ‘टॉस’ म्हणजे नाणेफेक केली आणि नशिबाने अमेरिकेचा ‘कॉल’ दिला. अशा रीतीने १८८५ साली हडसन स्टक अमेरिकेत टेक्सास प्रांतांत डलास किंवा डलस शहरात येऊन पोहोचला.
 
 
 
 
पहिली दहा-बारा वर्षं त्याने मुख्यत: दोन प्रकारचे उद्योग केले, एक म्हणजे शिक्षकाची नोकरी किंवा मग ‘काडबॉय’ म्हणजे गुराख्याची नोकरी. प्रांतात शेकडो मैल पसरलेल्या विस्तीर्ण ‘रँच’वर म्हणजे गवताळ कुरणावर शेकडो गाई-बैलांची खिल्लारं चरत असायची. त्यांची राखण करण्यासाठी घोड्यावर बसून कमरेला पिस्तुल लटकवून फिरणारा गुराखी म्हणजे ‘काडबॉय.’
अमेरिकेच्या पूर्व भागातून म्हणजे न्यूयॉर्क, पेनिसिल्वेविया, व्हर्जिनिया या संपन्न प्रांतांमधून तडीपार गुंड, गुन्हेगार किंवा तत्सम ओवाळून टाकलेले लोक हमखास टेक्सास प्रांतात आश्रयाला यायचे. त्यामुळे दरोडे, खून, दंगे हे तिथे कामयच असायचे. ‘काडबॉय’ चित्रपटांचा उगम यातूनच झालेला आहे.
 
 
 
 
पण म्हणजे सगळेच ‘काडबॉय’ असे नव्हते. हडसन स्टकचंच उदाहरण घ्या. या उघड्या आकाशाखालच्या स्वच्छंद जीवनामुळे वाह्यात न बनता, उलट स्टक निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक बनला. लहानपणी लंडनमध्ये त्याने त्याच्या मामाच्या कपाटातली, नवनवीन प्रवेश शोधून काढणार्‍या संशोधकांची चरित्रं वाचली होती. त्या प्रेरणातून तो स्वत:च अमेरिकेच्या रॉकी पर्वतीय प्रदेशात ग्रँड कॅन्यन भागात आणि यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानात मनसोक्त फिरला. ही सगळी भटकंती घोड्यावरून किंवा पायी केलेली होती. रॉकी पर्वत, ग्रँड कॅन्यन आणि यलोस्टोन नॅशनल पार्क ही अमेरिकेतली निसर्गाची अद्भुत आश्चर्ये आहेत. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनच्या आधुनिक कृत्रिमतेचा तिथे लवलेशही नाही. निसर्गाने आपल्या सगळ्या ऐश्वर्याची मुक्त उधळण केलेल्या त्या प्रदेशांमध्ये हडसन स्टक शेकडो मैल पायी फिरत होता.
 
 
 
अशी माणसं सर्वसाधारण नागरी जीवनात येऊ इच्छित नाहीत. पण, १९०२ साली हडसन स्टकला काय वाटलं कोण जाणे! तो चक्क टेनेसी प्रांतातल्या एक धार्मिक कॉलेजमध्ये दाखल झाला. ख्रिश्चन उपासना पंथाचे दोन प्रमुख संप्रदाय म्हणजे ‘कॅथलिक’ आणि ‘प्रोटेस्टंट.’ यापैकी प्रोटेस्टंट चर्चचे पुन्हा अनेक उपपंथ आहेत. त्यातलाच एक म्हणजे ‘एपिस्कोपेलियन.’ तर हडसन स्टक या ‘एपिस्कोपेलियन’ पंथाचा प्रशिक्षित पाद्री बनून पुन्हा डॅलसला आला. निसर्गात रमणारा हा माणूस आता समाजात रमायला लागला आणि नुसती धार्मिक प्रवचनं ठोकण्यावर तो थांबून राहिला नाही. टेक्सास प्रांतातल्या बालकामगार, वेठबिगारी विरुद्ध त्याने चक्क जनआंदोलन उभारलं आणि ते यशस्वी केलं. टेक्सास प्रांताच्या कायदे मंडळाने बालकामगार विरोधी कायदा आणला.
 
 
म्हणजे आता टेक्सास प्रांतात स्टकचं धार्मिक आणि सामाजिक नेतृत्व प्रस्थापित झालं. एकदा केव्हातरी स्वातंत्र्य आंदोलनात वगैरे थोडासा तुरुंगवास भोगायचा आणि मग तेवढ्याच भांडवलावर देशभक्त पुढारी म्हणून प्रस्थापित होऊन आयुष्यभर सत्तेचा उपभोग घेत दोंद वाढवीत बसायचं, असं करायला स्टक हा काही सफेद टोपीछाप पुढारी नव्हता. त्याला नवं आव्हान साद घालत होतं, अलास्काचं!
 
 
 
अलास्का हा अमेरिका खंडाच्या वायव्य दिशेचा एक अद्भुत असा हिममय प्रदेश आहे. शून्याखाली ५५ अंश तापमान वगैरे तिथे ‘नॉर्मल’ समजलं जातं. या गारठोण प्रदेशात कोणत्याही क्षणी बर्फाची अत्यंत भीषण अशी वादळं होऊ शकतात. इथे रस्ते नाहीत. बर्फातल्या खुणांवरून कुत्र्यांनी ओढलेल्या ढकलगाडीतून, तिला ‘स्लेड’ असं म्हणतात. तिच्यातून प्रवास करायचा. बर्फातल्या खुणा हरवल्या किंवा कुत्रे आणि निष्णात वाटाडेसुद्धा जर रस्ता चुकले, तर बर्फात गोठून मृत्यू ठरलेला.
 
 
 
पण, त्याचबरोबर तेथील महाकाय पांढरी अस्वलं, हरणांचे कळप, नद्या आणि समुद्रातले नाना जातीचे अत्यंत रुचकर मासे हे मोठं वैभवही होतं. अलास्का प्रदेशाचं डोकं आर्क्टिक वर्तुळाला म्हणजे जवळपास उत्तर ध्रुवाला मिळतं, तर त्याच्या वायव्य टोकाला अमेरिका खंड संपतो. मध्ये एक छोटीशी सामुद्रधुनी आणि पलीकडे आशिया खंड सुरू होतो. आशिया खंड आणि अमेरिका खंड यांना विभागणारी ही सामुद्रधुनी आधुनिक ज्ञात इतिहासात सर्वप्रथम ‘व्हायटस बेरिंग’ या डॅनिश म्हणजे डेन्मार्क देशाच्या दर्यावर्दीने सन १७४७ साली शोधून काढली. म्हणून तिला म्हणतात, ‘बेरिंग सामुद्रधुनी.’ आधुनिक शास्त्रज्ञांचं असं मत आहे की, अमेरिका खंडात मानवप्राणी आशिया खंडातूनच ही सामुद्रधुनी ओलांडून सर्वप्रथम गेला असावा. ही घटना काही हजार वर्षांपूर्वी घडली असावी.
 
 
 
आता पुढचा गमतीचा भाग असा की, ज्या व्हायटस बेरिंगने अलास्का भूभागाला सर्वप्रथम भेट दिली, तो स्वतः डॅनिश असला तरी रशियन सम्राट झारचा सेवक होता. त्यामुळे अलास्का प्रांत हा रशियाचा भाग मानला गेला. रशियन साम्राज्याच्या अधिकृत नकाशात अलास्काला ‘रशियन अमेरिका’ असं नाव होतं. परंतु, १७ लाख, १७ हजार चौ. किमी क्षेत्रफळाच्या या अवाढव्य भूप्रदेशातून रशियन सम्राटाला महसूल मात्र अगदीच नगण्य मिळत होता. त्यामुळे सन १८६७ साली रशियन झार सम्राट अलेक्झांडर दुसरा याने २७ लाख डॉलर्स किंमतीला संपूर्ण अलास्का प्रांत अमेरिकेला विकून टाकला.
 
 
 
 
१९०४ साली टेक्सास प्रांतात बस्तान बसलेल्या हडसन स्टकने आपल्या एपिस्कोपेल चर्च प्रमुखांकडून नवीन आव्हान स्वीकारलं. सुदूर वायव्येतील बर्फाळ अलास्का प्रांतात जाऊन ‘एपिस्कोपेल’ चर्चचं कार्य वाढवायचं. म्हणजे चर्चेस, शाळा आणि रुग्णालयं काढायची. कल्पना करा, १७ लाख, १७ हजार चौ. किमी पसरलेल्या भूभागाची सन २०१२ची अधिकृत लोकसंख्या फक्त ७ लाख, ४१ हजार आहे, तर १९०४ मध्ये ११५ वर्षांपूर्वी ही किती असावी? ती खरेतर किती असती, कुणालाच माहीत नव्हतं. रशियन, अमेरिकन किंवा तेथील २० गटांमध्ये विखुरलेल्या मूळ स्थानिक जमाती यांपैकी कुणालाच माहीत नव्हतं.
 
 
 
 
अशा स्थितीत हडसन स्टक तिथे पोहोचला आणि कुत्र्यांच्या ढकलगाडीतून किंवा पायी स्थानिक वाटाड्यांबरोबर किंवा एकटा असा हजारो किमी भटकला. अल्पावधीतच त्याने फेअरबँक्स या सोन्याच्या खाणींमुळे प्रसिद्धीस आलेल्या शहरात एक चर्च, एक रुग्णालय आणि एक ग्रंथालय सुरू केलं. याचवेळी त्याला नवं आव्हान दिसलं. अलास्कन पर्वतराजीतलं उत्तुंग शिखर ‘माऊंट मॅकिनली.’ हे नाव त्याला अमेरिकन सोन्याच्या खाण कामगारांनी दिलं होतं. मूळ स्थानिक ‘इंडियन जमाती’ त्याला म्हणायच्या, ‘डिनाली.’ ‘डिनाली’ म्हणजेच उत्तुंग! उंची २०,३१० फूट किंवा ६,१९० मीटर्स. जगातल्या सर्वोच्च शिखरांमध्ये तिसरं आणि खुद्द उत्तर अमेरिकतलं पहिलं शिखर ‘माऊंट डिनाली.’
 
 
 
 
हडसन स्टकने हेन्री कर्सटन्स, वॉल्टर हार्पर आणि रॉबर्ट टेटम हे जोडीदार सोबत घेतले. ७ जून, १९१३ या दिवशी त्यांनी ‘डिनाली’वर पाय ठेवला. हडसन स्टकचं वेगळेपण असं की, अमेरिकेने अधिकृतपणे या शिखराला ‘माऊंट डिनाली’ हे नाव द्यावं. कारण, तेच मूळ नाव आहे, असं तो आग्रहाने प्रतिपादन करीत राहिला. पण, ते प्रत्यक्षात घडून यायला १०० वर्षे उलटावी लागली. २०१५ साली बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकन संसदेने ‘माऊंट मॅकिनली’ला अधिकृतपणे ‘माऊंट डिनाली’ म्हणून घोषित केलं आणि स्थानिक परंपरेला मान्यता दिली.








@@AUTHORINFO_V1@@