मागील काही दिवसांत मुंबई महानगराच्या हवेचा स्तर हा गेल्या चार वर्षांतील नीच्चांकी पातळीवर नोंदविला गेला. तेव्हा, यामागील नेमकी कारणे काय आणि वायुप्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते, याविषयी माहिती सांगणारा हा लेख...
मुंबईची हवा केव्हा बिघडेल वा सुधारेल, हे सांगणे तसे कठीणच. हल्ली सर्वच ठिकाणी असा हवामानबदल मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला आहे. त्यामुळे केव्हाही पाऊस, वादळे, रोगप्रादुर्भाव इत्यादी संकटे उद्भवत असतात. हा बदल खरे म्हणजे मानवी कृत्यांमुळे घडतो आहे. शहराची हवा शुद्ध असेल, तर नागरिकांचे आरोग्य सुधारते. हवा अशुद्ध राहिली तर आरोग्य नक्की बिघडते. हवा प्रदूषित होते ती ९० टक्के मानवनिर्मित कारणांमुळेच. त्यामुळे आपले आरोग्य सांभाळण्याकरिता हे प्रदूषण सर्वांनी हातभार लावून कमी केले पाहिजे. हवेच्या दर्जाचे निरीक्षण हल्ली ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च (SAFAR)’ या संस्थेतर्फे पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ करिता व इतर पाच प्रदूषकांचे (पीएम १०, ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड) हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण शोधण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील १५ ठिकाणी होते व त्याची सरासरी काढून निर्देशांक (AQI) काढतात. पीएम २.५ हा प्रदूषक अतिसूक्ष्म कणांचा असल्याने जास्त महत्त्वाचा समजतात व त्याच्या निरीक्षणातील निर्देशांकाच्या मूल्यावरून हवेची दर्जा-श्रेणी ठरविली जाते. या १५ निरीक्षण केंद्रांच्या ठिकाणी १ नोव्हेंबर, २०२० ते ३१ मे, २०२१ या काळात कमी खर्चाची (देखभालीच्या खर्चासकट रु. ५० हजार ते दोन लाख) सेन्सॉर-प्रणाली यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या १५ निरीक्षण केंद्रातील नोंदी सर्वरमधून एमपीसीबी व आयआयटी कानपूरला थेट रिले केल्या जातील, त्यामुळे काही सुधारणांचा विचार करण्यासाठी वेळ वाचेल. श्रेणीचे प्रमाण त्यांच्या मूल्यावरून ठरते. ० ते ५० (चांगली), ५१ ते १०० (समाधानकारक), १०१ ते २०० (मध्यम), २०१ ते ३०० (वाईट), ३०१ ते ४०० (अती वाईट) आणि ४०१ ते ५०० (धोकादायक) असे कोष्टक ठरले आहे. ‘सफर’ची पीएम २.५ करिता एक्यूआय निरीक्षणे खाली (कंसात मूल्य व श्रेणी) दर्शविली आहेत -
मुंबईत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यापेक्षाही हवा शुद्ध राहिल्याचे (फटाक्यांवरील बंधने व पाऊस पडला) स्पष्ट झाले आहे. पुणे (३०२-अती वाईट), मुंबई (१११-मध्यम) व गेल्या दिवाळीत ते (२२१-वाईट) होते, दिल्लीची श्रेणी (४९०-अती धोकादायक) होती. चेंबूरमध्ये श्रेणी (२५७-वाईट) होती. नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबई (१४९-मध्यम), माजगाव (३०५-अती वाईट), चेंबूर (२९७-वाईट), भांडुप (१५२-मध्यम), मालाड (२९०-वाईट) अशी हवेची श्रेणी आढळली. ३१ डिसेंबर, २०२० व १ जानेवारी, २०२१ - वांद्रे-कुर्ला संकुल (३६३-अती वाईट); नवी मुंबई (३४९-अती वाईट); माजगाव (३४२-अती वाईट); मालाड (३२१-अती वाईट); चेंबूर (३१२-अती वाईट) - सरासरी (३०७- अती वाईट). नववर्षाच्या पहिल्या व आदल्या दिवशी मुंबईतील हवेची श्रेणी ‘अती वाईट’ होती. मार्च २०२० मध्ये सरासरी (मूल्य ५० पेक्षा कमी - चांगली) श्रेणी. ३० जूनला (१२-चांगली) श्रेणी. ९ ऑक्टोबरला (११८-मध्यम) श्रेणी.
स्वच्छ हवेसाठी राज्याला ३९६ कोटींची मदत
राष्ट्रीय हरित लवादाने स्वच्छ हवा कृती आराखड्याकरिता हवेतील घातक प्रदूषक कमी करण्यासाठी ३९६ कोटी राज्याच्या मदतीला दिले. त्यापैकी मुंबईला २४४ कोटींची मदत दिली आहे. वाहने, औद्योगिक प्रदूषण, रस्त्यावरील धूळ व वृक्षारोपण असे त्यांनी चार टप्प्यांचे विविध उपाय सुचविले आहेत. विजेवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढविणे व त्याकरिता चार्जिंगच्या सोई वाढविणे, वेगवेगळ्या रस्त्यांवरील वाहतूक सिग्नलशी एकमेकांना जोडणी, विजेवरील दुचाकी, बगिचांचे समृद्धीकरण करणे, रस्ते रुंदीकरण व उड्डाणपूल करणे, हे उपाय पोकळ असल्यामुळे त्याऐवजी मूलभूत उपायांवर भर द्यावा, असे ‘एमपीसीबी’चे सहव्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. मोटघरे यानी नमूद केले आणि मुंबई शहराचा फक्त विचार न करता महानगर परिसराचा विचार होणे जरुरी आहे.
खारघर-पनवेल परिसरात दिवसाकाठी १७ तास असुरक्षित हवा
खारघर-तळोजा-पनवेल या भागातील हवेच्या घटकांचे महिन्याचे पीएम २.५ चे निरीक्षण एका पर्यावरणीय असरकारी संस्थेने (वातावरण फाऊंडेशन) घेतले आहे, त्याचा १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर, २०२० काळातील उपन्यास खाली दिला आहे. ३१ दिवसांची सरासरी व सकाळी ७ वाजताचे निरीक्षण कंसात अनुक्रमे दिले आहे. तिथल्या लोकांना (सुमारे पाच लाख वस्ती असलेल्या) दिवसातील १७ तास धोकादायक अशुद्ध हवा खावी लागते. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना कायम अशुद्ध हवाच मिळते. त्या ठिकाणी सरकारतर्फे हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रणेचा अभाव आहे. खारघर, रोडपाली आणि कामोठे व जवळच्या सोसायटीमधील नागरिकांनी गेल्या सहा महिन्यांपासून धोकादायक हवेच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. ही वस्ती तळोजा एमआयडीसी उद्योग आणि अशा औषधे, खाण्याचे जिन्नस आणि इंजिनिअरिंग उद्योग, अशा हजारो संस्था हवा प्रदूषित करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अनुज्ञेय मानक २५ व राष्ट्रीय अनुज्ञेय मानक ६० आहे. त्यामुळे हवेतील मूल्य कितीतरी पटीने जास्त व धोक्याचे आढळत आहे. या परिसरातील सततच्या प्रदूषित हवेचे निराकरण करण्यासाठी सरकारने प्राधान्य देऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर ताबडतोब नियंत्रण आणायला हवे.
प्रदूषक घटकांचे वातावरणातील वितरणांचे अनुमान वर्तविणारी यंत्रणा राज्यात प्रथमच ही यंत्रणा प्रायोगिक स्तरावर असून, राज्यात प्रथमच त्याचा वापर होणार आहे. ही बसविल्यावर प्रदूषणाचे अनुमान वर्तविण्यासाठी आणखी बळकटी येईल. सध्या प्रायोगिक स्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) शीव येथील कार्यालयात ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. साधारणपणे अशा यंत्रणेचा वाहतूक क्षेत्र, प्रयोगशाळा, औद्योगिक केंद्र यामध्ये वापर होतो. शहरासाठी याचा प्रथमच वापर होत आहे. या यंत्रणेचा खर्च रु. ५० लाख आहे. एका विशिष्ट शंकूच्या माध्यमातून तीन सेकंदाच्या अंतराने काही ध्वनिलहरी संगणकीय प्रणालीद्वारे हवेत सोडल्या जातात. वातावरण-हद्दीच्या पातळीपासून परावर्तित होणाऱ्या ध्वनिलहरींची नोंद ‘सोनिक डिटेन्शन अॅण्ड रेंजिंग (SODAR)’ अॅण्टेनाद्वारे केली जाते. त्यामुळे होणाऱ्या कंपनांची नोंद संगणकीय प्रणालीत २४ तास होत राहते.
हवेतील प्रदूषक घटक वातावरणातील विशिष्ट उंचीवरील थरामध्ये विरतात. ही पातळी वातावरण-हद्दीतील विशिष्ट पातळी म्हणून ओळखली जाते. वेगवेगळ्या ॠतूनुसार त्यामध्ये बदल होत राहतो. या सर्वांच्या सूक्ष्म नोंदी ‘सोडार’ यंत्रणेद्वारा केल्या जातात. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने विकसित केलेली अशी यंत्रणा ‘सीपीसीबी’मध्ये वापरली जात आहे. ‘एमपीसीबी’चे सहसंचालक एम. व्ही. मोटघरे म्हणतात की, “वर्षभरात केलेल्या नोंदींच्या आधारे पुढील वर्षी प्रदूषक घटक वातावरणातील कोणत्या थरात विरून जातात त्याचे अनुमान वर्तविता येईल. पर्यावरण आघात मूल्यांकन, वातावरण अभ्यास, कारखान्यामधील चिमणीमधून सोडलेला धूर आणि प्रदूषण, दऱ्याखोऱ्यातील डोंगरांच्या अभ्यासासाठी ही यंत्रणा मदतकारी ठरेल.” घरातील वायुप्रदूषण घरातील हवेचे प्रदूषण हे बाह्य प्रदूषणापेक्षा कदाचित जास्त घतक असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) विकसनशील देशांतील घरांतील वायुप्रदूषण हे रोग व अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
घरातील अभिसरित हवेचे प्रदूषण, सिगारेटचा धूर, गॅसस्टोव्ह, कार्बनयुक्त इंधनाचे ज्वलन आदींमुळे हवा प्रदूषित करणारे घटक-कण-द्रव्य (particulate matter), मिथेन वायू, कार्बन मोनॉक्साईड, पॉलिसायक्लिक एरोमेट्रिक हायड्रोकार्बन्स (PAH) आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOC) आदींची निर्मिती होते. ग्रामीण भागात शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, चारकोल, लाकूड, केरोसिन इत्यादी कार्बनयुक्त इंधनाचे अपूर्ण ज्वलन वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरते. शहरी भागात पाणी गरम करणे व स्वयंपाक करण्यातून धूर येणे, सिगारेट ओढणे, हवा खेळती नसणे, कृत्रिम व रासायनिक गोष्टींचा वापर, कीटकनाशके, फर्निचरमधील प्लायवूड पॅनेलिंग, फायबर बोर्ड, इन्शुलेसन्स साहित्य, अॅसबेसटॉस, रंग आदींचा वापर आणि माती व खडकातून निर्माण होणारे किरणोत्सर्गी रेडॉन यातून प्रदूषण होते. जैविक प्रदूषकांमध्ये जीवाणू, झुरळे, घरातील धूळ, बुरशी, परागकण व विषाणू याचा समावेश होऊ शकेल. नागरिकांनी आपली जागा स्वच्छ ठेवावी म्हणजे घरातील प्रदूषण कमी होईल. नागरिकांनी वायुप्रदूषणाच्या बाबतीत (बाहेरील व घरातील) सावधगिरीने वागावे व ते कमी करण्यासाठी सरकारला मदत करावी.