साहित्याशी नाळ जुळलेला डॉक्टर

    29-Jan-2021
Total Views | 290

dr rajendra mane_1 &

कादंबरी, कथा, कविता अशा साहित्यप्रकारातून माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारेज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्याविषयी...


आई-वडील पेशाने शिक्षक. शिक्षकाचं घर म्हटले की, साहित्याची आवड, वाचन हे सारं आलेच. ज्या गावामध्ये आपण वाढतो, लहानाचे मोेठे होतो, त्या गावाचा संस्कार किंवा ज्या वास्तूमध्ये आपली जडण-घडण होते, त्या वास्तूचा संस्कार आपल्यावर नकळतपणे होत असतो. सभोवतालचे वातावरण जसे आपल्या आरोग्यावर परिणाम करते, तसेच सभोवतालची माणसंसुद्धा माणसांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलतात. ती माणसं जगणं शिकवितातच; परंतु ती माणसं व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मदत करीत असतात. सभोवतालच्या वातावरणाने आणि उपलब्ध होणार्‍या पुस्तकांनी ज्यांना लिहितं केलं, घरमालकाला पुस्तकांची असलेली आवड, ती पुस्तके वाचून वाचनाची गोडी लागली आणि ज्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली, असे पेशाने डॉक्टर असलेले साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्याविषयी...

 डॉ. राजेंद्र माने यांचा जन्म सातारा येथे दि. ८ नोव्हेंबर, १९६२ रोजी झाला. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यामधील आष्टा या गावी गेले.आष्टा येथे त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण झाले. वाडा संस्कृती असलेल्या आष्टा या गावाने त्यांना साहित्याचा, निसर्गाचा अनुभव दिला. आष्ट्यासारख्या ग्रामीण भागात त्यांचा शेती, तेथील ग्रामीण जीवनाशी संबंध आला. शेतीमध्ये काम करणारी माणसं, ग्रामीण वाडासंस्कृतीतील भावविश्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दीर्घ परिणाम झाला. जडणघडणीच्या वयामध्ये त्यांनी अनुभवलेला गाव त्यांच्या साहित्यातून कायम समोर येतो. गावामधील त्यांनी पाहिलेली माणसं त्यांच्या व्यक्तिचित्रणातून पुढे येतात. डॉ. राजेंद्र माने यांनी लिहिलेली माणसं, त्यांनी जगलेल्या काळामुळे जीवंत वाटतात. सांगली जिल्ह्यातील सामाजिक आणि तेथील सांस्कृतिक वातावरणाचा त्यांनी निरीक्षणात्मक अभ्यास करून तो आपल्या लेखनाचा विषय बनविला. कोल्हापूर-वारणानगर येथील वारणानगर महाविद्यालयामध्ये अकरावी-बारावीत शिकत असताना त्यांचा साहित्याशी संबंध आला. या काळामध्ये बाबा कदम, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा महाविद्यालयामध्ये असतानाच त्यांच्यावर प्रभाव पडला.



बारावीनंतर त्यांनी मेडिकल क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेऊन आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे प्रवेश घेतला. डॉ. राजेंद्र माने यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भेटलेल्या, पाहिलेल्या माणसांवर व्यक्तिचित्रणे लिहिली व त्यांना अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्रणपर लेखन पुढे ‘वळणावरची माणसं’ या पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. त्यांच्यावर वाडासंस्कृतीचा प्रभाव पडल्याने त्यांनी ‘वहिनीसाहेब’ कादंबरी लिहिली. त्या कादंबरीला वसंत सबनिसांनी प्रस्तावना लिहिली. त्यांनी विविध विषयांवर संशोधन करून कांदबर्‍या लिहिल्या. यातील मराठी साहित्यतील पत्ररूपी कांदबरी म्हणून त्यांच्या ‘प्रिय’चा उल्लेख केला जातो. मराठी राहित्यविश्वामध्ये पत्ररूपी पाच कादंबर्‍यांमध्ये त्यांनी साहित्याचा वेगळा प्रकार हाताळला. डॉ. राजेंद्र माने यांनी ‘धाकटा वाडा’, ‘वहिनीसाहेब’, ‘पळणारी क्षितिजे’, ‘चिरेबंदी’, ‘मन तुझं माझं’, ‘प्रवाहातील नौका’, ‘रत्ना आणि प्रतारणा’, ‘अंधाराच्या सावल्या’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत’ अशा विविध कांदबर्‍या लिहिल्या. त्यांनी निवडलेले विषय हे समाजाच्या विशिष्ट भागावर प्रभाव टाकणारे असून, त्यांच्या एकूण २४ पुस्तकांमध्ये  १२ पुस्तकांस  पुरस्कार मिळाले.


कांदबरी लेखनासोबतच त्यांनी विपूल प्रमाणामध्ये कथालेखन केले. त्यांनी लिहिलेल्या कथा विविध मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी लिहिलेल्या कथासंग्रहापैकी ‘सांजसावल्या’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून, त्यांनी वृद्धाश्रमाच्या सकारात्मक भावविश्वाबद्दल या कथासंग्रहामध्ये लेखन केले आहे. त्याप्रमाणेच त्यांनी मानसिक आरोग्याबाबत संशोधन करून ‘जिगोलो आणि इतर कथा’ यामधून नव्या विषयावर लेखन केले.कादंबरी, कथा यासोबतच त्यांनी लेखांमधूनही अनेक विषयांवर लेखन केले. ‘लोकसंस्कृतीचा गाभारा’ हा त्यांचा लेखसंग्रह त्याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. राजेंद्र माने हे पेशाने डॉक्टर असले, तरी त्यांनी त्यांच्या साहित्यामधून समाजाच्या विविध विषयांची नस पकडलेली दिसून येते. त्यांना त्यांच्या साहित्यिक प्रवासामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘शि. म. परांजपे’ व इतर अनेक पुरस्कारांचा उल्लेख करावा लागेल. २०१७ मध्ये झालेल्या ‘शिवार साहित्य संमेलना’चे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.

“साहित्यक्षेत्रामुळे मला अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांशी ऋणानुबंध जोडता आले.साहित्यक्षेत्रातील नामवंताचा सहवास मला माझ्या जडणघडणीमध्ये प्रगल्भ आणि समृद्ध करीत गेला. लहानपणीच्या काळामध्ये भेटलेली माणसे आणि जगलेले आयुष्य, हीच माझ्या लेखनाची मुख्य प्रेरणा आहे,” असे डॉ. राजेंद्र माने आवर्जून सांगतात. त्यांच्या साहित्याचे माध्यमांतर होऊन काही एकांकिका, लघुपट त्यातून सादर करण्यात आले. ‘मी गुलाबबाई’ या एकांकिकेचे ‘विश्वनाट्य संमेलन, न्यू जर्सी’ येथे सादरीकरण करण्यात आले. ‘माणसांच्या आणि पुस्तकांमध्ये रमणारे साहित्यिक’ म्हणून ओळख निर्माण केलेले डॉ. माने वाचनसंस्कृती टिकावी, असा आग्रह असणार्‍या संस्थांसोबत ते साहित्याची सेवा करताना दिसतात. साहित्याची आणि माणसांची नाळ जोडलेल्या डॉ. राजेंद्र माने यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!!

- स्वप्निल करळे 
अग्रलेख
जरुर वाचा
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121