आडनावांची चिनी अडचण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2021   
Total Views |

CHINA _1  H x W
 
 
 
‘नावात काय आहे’, असे म्हणून शेक्सपिअर या वचनापुढे स्वतःचे नाव कोरुन गेला. त्याचे हेच वचन पुढे सुप्रसिद्धही झाले. परंतु, कुणीही शेक्सपिअरचे नाव हटवून स्वतःच्या नावावर ते वचन खपवू शकले नाही. हेच तर नावाचे, आपल्या स्वतंत्र ओळखीचे गमक आहे. भारतात आडनाव म्हटले की, मग त्याची कुळ-कथा, गावाचा शोध वगैरे गोष्टींपर्यंत मोठी यादी तयार करता येईल. पण, भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये सध्या आडनावांचा मात्र तुटवडा जाणवत आहे.
 
 
 
इतक्या मोठ्या क्षेत्रफळावर वसलेला आणि लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकचा देश असलेल्या चीनमध्ये सध्या आडनावांचा दुष्काळ पडलेला दिसतो. वांग-ली, झांग, लिउ अशी आडनावे असलेल्या चिनी नागरिकांना नावेच ठेवणे कठीण होऊन बसले आहे. ‘डिजिटलायझेशन’ नंतर डेटा एकत्र आल्यामुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण, साधारणपणे असलेली जी पाच आडनावे आहेत, त्यांचीच लोकसंख्या आहे ३० टक्के म्हणजे जवळपास ४३.३ कोटी. त्यामुळे मग चिन्यांनी स्वतःचे आडनावच बदलण्याची शक्कल लढवली. त्यातही मोठी अडचण अशी की, चिनी मुळाक्षरे कठीण असल्याने कशीही जोडून-तोडून नवी आडनावे आता तयार करता येत नाहीत.
 
 
भारतात महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर गावागावांनुसार ‘पाटील’ आडनाव सोडल्यास बर्‍याच आडनावांची भर पडते. त्यातही प्रत्येक आडनावाला एक वेगळा इतिहास आणि निराळी गोष्ट. मात्र, चिनी या स्पर्धेत भारतीयांच्या मागेच आहेत. चीनमधील २०१०च्या एका आकडेवारीनुसार, ८६ टक्के लोकसंख्या ही केवळ एकाच आडनावाने ओळखली जाते. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, एकेकाळी २३ हजार आडनावे असलेल्या चीनमध्ये आता केवळ सहा हजार आडनावेच शिल्लक राहिली आहेत.
 
 
सांस्कृतिक विविधतेचा अभाव, भाषेची अडचण, डिजिटल युगातील तांत्रिक समस्या ही त्यामागील काही प्रमुख कारणे सांगितली जातात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यावेळी सरकारी माहिती किंवा डेटा एकत्रित करण्याची वेळ येते, त्यावेळेस मोठी अडचण समोर येते. चिनी भाषा म्हणजे अशीही अवघड आणि त्यातही बदल करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी. सरकारी आकडेवारीतील नोंदी ठेवणे आणि त्या ‘डिजिटल’ करताना येत असलेल्या अडचणींमुळे चिन्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आपण डिजिटल युगात मागे पडू, या भीतीमुळे आता चीनमध्ये आता नावांची अदलाबदली जोरात सुरू आहे.
 
 
सरकारी नोंदींमध्ये अनेकदा नामसाधर्म्यामुळे गोंधळात भर पडते. त्यामुळे योजनांचा लाभ घेता येत नसल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. सरकारी कामातील या अडचणींमुळे नावे-आडनावे बदलण्याशिवाय चिनी नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. चिनी भाषेत कित्येक व्यंजने आहेत, तरीही हा बदल अद्याप शक्य नाही. भविष्यात होईल, अशीही काही शक्यता नाही. गमतीचा भाग म्हणजे, डिजिटल युगात उतरण्यासाठी चीनला आपल्या संपूर्ण भाषेच्या साम्राज्यासह उतरावे लागेल. २०१७ मध्ये चीनकडे एकूण ३२ हजार व्यंजने, मुळाक्षरे आणि विरामचिन्हांची सामग्री होती.
 
 
मात्र, डिजिटल अवतार घेताना कित्येक अक्षरेच किंवा चिन्हे त्यात तांत्रिक कारणांअभावी समाविष्ट होऊ शकली नाहीत. परिणामी, नावच डिजिटल रूपात अवतरण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या. उदा. एखाद्या व्यक्तीचे आडनाव ‘अबक’ असेल, तर चीनच्या व्यंजनात डिजिटल अडचणीमुळे ‘ब’ हे अक्षरच उपलब्ध नसल्याने, त्या नावाच्या व्यक्तीला सरकारी कागदावर येताच येत नाही. त्यामुळे सरकारी नोंदींमध्ये आपला समावेश व्हावा म्हणून काही चिनी नागरिकांनी आपले नावच बदलण्याची ही युक्ती शोधून काढली. पण, हे करताना मात्र मूळ ओळख हरविण्याची एक भीती निर्माण झाली. चीनमध्ये ‘मंदारीन’ ही प्रमुख भाषा.
 
 
पण, या भाषेच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेत अद्यापही काही त्रुटी असल्याने नावांचा, आडनावांचा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बर्‍याचशा चिनी नागरिकांना स्वतःचे नाव-आडनाव बदलण्याविना काहीच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सध्याची पिढी आता आपले नाव बदलेल आणि त्याच्या पुढील पिढ्या त्यांचा इतिहासच विसरून जातील की काय, अशी चिंता आता चिन्यांना सतावते आहे. कोरोनाकाळात जगात क्रमांक एकची महासत्ता बनण्याची सुप्त इच्छा बाळगणारा चीन त्यांच्याच भाषेतील अडचणींमुळे आता इतिहास व संस्कृती गमावून बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



@@AUTHORINFO_V1@@