नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळानंतर ठप्प झालेला अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येताना दिसतोय. मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा २०२०मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या वेगामुळे जीएसटी कलेक्शन डिसेंबरमध्ये वाढून १ लाख १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, जीएसटी संकलनाने डिसेंबरमध्ये १.१५ लाख कोटी रुपयांची उच्चांकाची पातळी गाठली गेली, ही उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेतील सुधार दर्शवते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. डिसेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून १.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. डिसेंबर २०१९च्या तुलनेत हे उत्पन्न १२टक्क्यांनी जास्त आहे.
डिसेंबरमध्ये मिळालेल्या एकूण १,१५,१७४ कोटीच्या जीएसटीमध्ये २१,३६५ कोटींचा CGST आणि २७,८०४ कोटींचा SGST ५७,४२६ कोटींचा IGST आणि उपकराच्या माध्यमातून मिळालेल्या ८,५७९कोटींचा समावेश आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून एकाच महिन्यात मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सरकारला १,१३,८६६ कोटींचा जीएसटी मिळाला होता.
जीएसटीची विक्रमी कमाई फक्त तीनवेळा
नोव्हेंबर ते३१ डिसेंबर या कालावधीत एकूण ८७ लाख जीएसटीआर -३ बी रिटर्न भरले होते. गेल्या महिन्याच्या तुलनेत आयात केलेल्या वस्तूंच्या उत्पन्नात २७ टक्के वाढ झाली असून देशांतर्गत व्यवहारातून (आयात सेवांसह) महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढला आहे.
देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत फक्त तीनदाच १.१ लाख कोटीपेक्षा अधिक महसूलाचे संकलन झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक जीएसटी संकलन झाले आहे. हे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत असल्याचे संकेत मानले जात आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत जीएसटी संकलनातील सरासरी वृद्धीचा दर ७.३ टक्के इतका होता. त्यापूर्वीच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत हा दर अनुक्रमे (-) ८.२ आणि (-) ४१.० टक्के इतका होता.