तस्करी न करता लांज्यातील तरुणांनी खवले मांजराला दिले जीवदान

    12-Jan-2021
Total Views |

pangolin_1  H x

तरुणांनी समाजासमोर दुर्मीळ प्राण्याच्या रक्षणाचे उदाहरण ठेवले

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यामध्ये तरुणांना सापडलेल्या खवले मांजराला जीवदान मिळाले आहे. या तरुणांनी प्रसंगावधान राखून रस्त्यात सापडलेल्या खवले मांजराची माहिती वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभागाने या प्राण्याला ताब्यात घेऊन त्याची निसर्गात सुखरुप सुटका केली. कोकणात छुप्यामार्गाने सुरू असलेल्या खवले मांजराच्या तस्करीच्या गैर मार्गाला न जाता या तरुणांनी समाजासमोर दुर्मीळ प्राण्याच्या रक्षणाचे उदाहरण ठेवले आहे. 


pangolin_1  H x
 
लाज्यांतील तळवडे-कणगवली या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रशांत शेट्ये, सौरभ कारेकर(कनगवली) आणि प्रशांत तिखे या तरुणांना खवले मांजर आढळून आले. हे खवले मांजर भदलेल्या अवस्थेत होते. क्रिकेट सामने खेळून परतत असताना या तीन तरुणांना रस्त्यावर हे खवले मांजर दिसले. या प्राण्याच्या रस्ते अपघात होऊन त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून तरुणांनी त्यानी खवले मांजराला ताब्यात घेतले. त्यानंतर प्रशांत शेट्ये यांनी सरपंच संजय पाटोळे, पोलीस पाटील बाबू पाटोळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानी तातडीने लांज्याचे वनपाल विठ्ठल आरेकर, वनरक्षक सागर पताडे यांंना घटनेची माहिती कळवली. रात्री तातडीने वन अधिकाऱ्यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका केली.



कोकणात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी सुरू आहे. यासंबंधीची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत. खवले मांजरांची तस्करी करणारे दलाल ग्रामस्थांना पैशांचे आमिष दाखवून या प्राण्याची शिकार करवून घेतात. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात खवले मांजरांना मोठी मागणी आहे. मात्र, भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत खवले मांजरांना संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांची शिकार, व्यापार, तस्करी आणि वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. राज्यात खवले मांजराच्या वाढणाऱ्या तस्करीचे प्रमाण पाहता वन विभागाने खवले मांजर संवर्धन-संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करत आहे. त्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे.