ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपची मोर्चेबांधणी!

    11-Jan-2021   
Total Views |

Mamata _1  H x
 
ज्या डाव्यांच्या साम्राज्यास ममता बॅनर्जी यांनी सत्तेवरून घालवून दिले, त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्षही सध्या हेलकावे खात आहे. अनेक जुने नेते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले आहेत.
 
 
प. बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या निवडणुकीत ममतादीदींच्या हातून सत्ता खेचून घ्यायचीच, या निर्धाराने भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेते कामाला लागले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्यासमवेत कार्य केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत.
 
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प. बंगालमध्ये जे चांगले यश मिळविले, त्यामुळे सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, तर त्याउलट आगामी निवडणुकीत 200हून अधिक जागा मिळवून त्या रॉयटर बिल्डिंगवर भाजपचा झेंडा फडकवायचा, या निर्धाराने भाजप कामाला लागला आहे. भाजपचा बंगालमधील संस्कृतीशी काही संबंध नसल्याचा प्रचार ममता बॅनर्जी यांच्याकडून केला जात आहे. भाजपचे नेते ‘बाहेरचे’ असल्याचा प्रचार करून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून सुरू आहेत.
 
 
मध्यंतरी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील विविध उद्योजकांची एक बैठक घेतली. त्यामध्ये बंगाली नसलेले अनेक उद्योजक होते. पण, त्या सर्वांचा त्यांनी बंगालचे म्हणून गौरव केला. पण, ममता बॅनर्जी यांना भाजप आणि त्या पक्षाचे नेते मात्र ‘बाहेरचे’ वाटतात! ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांचे अनेक सहकारी पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळेही त्यांचा आक्रस्ताळेपणा वाढला आहे.
 
भाजपला मिळत चाललेला वाढता पाठिंबा पाहून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मागील महिन्यात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मिरवणुकीवर हल्ला होण्याची घटना घडली होती. पण, एक महिन्याने पुन्हा प. बंगालच्या दौर्‍यावर जाऊन तृणमूल काँग्रेसच्या असल्या धमक्यांना आणि हल्ल्यांना आपला पक्ष घाबरत नसल्याचे नड्डा यांनी दाखवून दिले आहे.
 
 
आता केंद्रातील मोदी सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने येत्या २३ जानेवारीपासून देशात संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, त्या समितीमध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही समावेश करण्यात आला आहे. पण, केंद्र सरकारने योजलेल्या या कार्यक्रमामुळे भाजप विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे.
 
प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडण्याच्या विरोधकांच्या सवयीमुळे, बंगालमधील निवडणुका लक्षात घेऊन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत राजकीय लाभ मिळविण्यासाठीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मात्र, भाजपने या कार्यक्रमांचे समर्थन केले आहे. एका राष्ट्रपुरुषांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यातच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याची घोषणा केली होती. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख अत्यंत विद्वान, सेनानी आणि द्रष्टे नेते असा केला होता.
 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंती समारंभास निवडणुकीशी जोडले जाऊ नये, असे कितीही सांगितले तरी भाजप विरोधकांना ते पटणार नाही, हे उघडच आहे. त्यातूनच भाजपवर टीका केली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसने डाव्या आघाडीशी युती केली आहे. त्या युतीचा ममता बॅनर्जी यांना कदाचित लाभ होऊ शकतो. पण, या जर-तरच्या गोष्टी झाल्या. कारण, भाजप निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नास लागला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दोन दिवसांपूर्वी बंगालमध्ये जो रोड शो केला, त्यास जनतेने जोरदार प्रतिसाद दिला.
 
 
कोलकाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत नड्डा यांनी, तृणमूल काँग्रेसवर कडाडून टीका केली. या पक्षाने कधीच बंगाली संस्कृतीचे प्रतिनिधित्व केलेले नाही. हा पक्ष सदैव भ्रष्टाचारास पाठीशी घालणारा पक्ष आहे. अराजक आणि भ्रष्टाचार यांचे प्रतीक म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे. “अराजक, भ्रष्टाचार आणि खंडणी म्हणजे तृणमूल काँग्रेस! या पक्षाचे बंगाली संस्कृतीशी काही देणे-घेणे नाही,” असे भाजपाध्यक्षांनी म्हटले आहे. “भाजप आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे खर्‍या अर्थाने बंगाली संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात,” असेही ते म्हणाले.
 
“नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ला प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करण्याच्या हेतूने विरोध करीत आहे. हे सर्व लक्षात घेऊन, आमचा पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करील,” असे जे. पी. नड्डा यांनी ठणकावून सांगितले.
 
 
विविध पक्षांना राजकीय व्यूहरचना आखून देणारे प्रशांत किशोर यांनी, प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन अंकी जागा जरी मिळवता आल्यास आपण आपला व्यवसाय सोडून देऊ, अशी प्रतिज्ञा केली आहे. भाजपचा एकंदरीत प्रचार पाहता प्रशांत किशोर यांना आपले चंबुगबाळ आवरावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. प. बंगालमधील निवडणुका लक्षात घेऊन त्या राज्यातील मुस्लीम मुल्ला, मौलवींनी, मुस्लीम नेते ओवेसी यांचे मुळीच न ऐकण्याचा सल्ला दिला आहे. मुस्लीम मतदारांनी त्यांच्या प्रचारास भुलू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
ओवेसी प्रचारास आले की, त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना होतो, असा बिहारमधील अलीकडील अनुभव लक्षात घेऊन हे आवाहन करण्यात आले आहे, हे स्पष्टच आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांचा पक्ष एकाकी पडल्याचे दिसत आहे. ज्या डाव्यांच्या साम्राज्यास ममता बॅनर्जी यांनी सत्तेवरून घालवून दिले, त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्षही सध्या हेलकावे खात आहे. अनेक जुने नेते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत.
 
तृणमूल काँग्रेसच्या किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले आहेत. आगामी काही महिन्यांत आणखी पडझड होणार हे उघड आहे. भाजपचा झंझावात रोखणे हे ममता बनर्जी यांच्या आवाक्याबाहेर आहे, असे एकंदरीत चित्र दिसत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.