‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या एका वृत्त अहवालानुसार, पेरुमधील कामगार संघटना आणि अनेक बिगर सरकारी संघटना इथल्या खाणींचा तीव्र विरोध करत आहेत. चिनी कंपन्यांनी कोरोनाबाधितांची संख्या लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, अन्य परकीय कंपन्यादेखील पेरुमध्ये काम करतात आणि त्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे.
डिसेंबरपासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला तरी चीन अजूनही कोरोनाच्या प्रसारात सहभागी असल्याचे आढळून येते. आता चीन ज्या देशांमध्ये चिनी कंपन्या आपल्या फायद्यासाठी काम करतात, तिथे कोरोनाचा फैलाव करत आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये चिनी खनन कंपन्यांनी कोरोनाबाबत दाखवलेली बेपर्वाई आणि संक्रमण पसरवण्यातील हातभारानंतर आता पेरुमधूनही असेच वृत्त समोर आले आहे. पेरु दक्षिण अमेरिका खंडातील खनिजसंपन्न देश असून इथे तांबे, जस्त, सोने आणि अन्य खनिजांच्या खाणी चीनद्वारे संचालित होतात. मात्र, तिथेच कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, हे पाहून स्थानिकांनी या खाणी व चिन्यांना विरोध सुरु केल्याचे चित्रही दिसते. पेरुतील अनेक खाणींची मालकी दिग्गज चिनी कंपनी चीनॅल्कोकडे असून तिने जुलै आणि ऑगस्टमध्ये आपल्या खाणींमध्ये काम करणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा खुलासा केलेला नाही. अशाचप्रकारे अनेक चिनी कंपन्यांनी काम सुरुच ठेवले असून खाणींत काम करणार्या कर्मचार्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी साधने पुरवलेली नाहीत. वस्तुतः या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित मजूर सापडत आहेत. तरीही चिनी कंपन्या त्यांची अस्सल आकडेवारी सांगत नाहीत वा खाणींचे कामकाजही थांबवत नाहीत, ही गंभीर बाब ठरते.
पेरुमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सध्याच्या घडीला वेगाने वाढत असून जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक बाधित या देशात आहेत. सध्या पेरुमध्ये ६ लाख, ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले असून २९ हजारांपेक्षा अधिकांचा बळीही गेला. दरम्यान, देशातील तांबे, जस्त, सोने आणि अन्य खनिजांच्या उत्खननातून पेरुच्या २२७ अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत नऊ टक्क्यांपेक्षा अधिकचे योगदान दिले जाते, तर मूल्याच्या हिशोबाने पाहू गेल्यास त्यांचा निर्यातीतील वाटा जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यावरुनच पेरुची अर्थव्यवस्था खनिज खाणींवर किती अवलंबून आहे, हे समजते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, जनतेच्या जीवाशी खेळ केला जावा. इथल्या चिनी मालकीच्या खाणींमधून पसरणारे कोरोना संक्रमण आणि सुरक्षेबाबतच्या कमतरतेविषयी सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यातल्या बहुतांश तक्रारी मजूर आणि बिगर सरकारी संघटनांनी केल्या आहेत. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या एका वृत्त अहवालानुसार, पेरुमधील कामगार संघटना आणि अनेक बिगर सरकारी संघटना इथल्या खाणींचा तीव्र विरोध करत आहेत. चिनी कंपन्यांनी कोरोनाबाधितांची संख्या लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, अन्य परकीय कंपन्यादेखील पेरुमध्ये काम करतात आणि त्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, चिनी कंपन्या अन्य देशांच्या कंपन्यांच्या तुलनेत पारदर्शक नाहीत, तर चिनी कंपन्या एखाद्या ‘ब्लॅक बॉक्स’प्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या दडवून ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आता तर पेरुमधील सर्वसामान्य नागरिकही या खाणींच्या विरोधात पुढे आले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी खाणीपर्यंत जाणारे रस्ते अडवून ठेवले आहेत. दक्षिण पेरुच्या लास बाम्बोस कॉपर माईनजवळ अशी घटना पाहायला मिळाली आणि गावकर्यांनी खाणीत काम करणार्या मजूर-कर्मचार्यांच्या भीतीने रस्ताच बंद केला. ही खाण चिनी सरकारी कंपनी ‘चायना मिनमेटल्स कॉर्पोरेशन’च्या सर्वाधिक शेअर असलेल्या कंनीच्या मालकीची आहे. तसेच ‘शौगँग’ ग्रुपसारख्या चिनी कंपन्यांनी मजुरांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षाविषयक साधनांची पूर्तता केली नाही व त्यामुळे कोरोना संक्रमण वाढले, अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीच्या अधिकार्यांकडे फोन वा ईमेलने या तक्रारी पोहोचवल्या गेल्या तेव्हा त्यांनी कसलेही उत्तर दिले नाही. पेरुच्या प्रशासकीय अधिकार्यांनीदेखील कित्येकदा तसा प्रयत्न केला, परंतु, चिनी कंपन्यांनी त्यांनादेखील कोणतेही उत्तर दिले नाही. असाच प्रकार चीनने पापुआ न्यू गिनीमध्ये कोरोना संक्रमित मजूर पाठवले, त्यावेळी पाहायला मिळाला. तथापि, पापुआ न्यू गिनी सरकारला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई करत संबंधित चिनी विमानाला देशात प्रवेश करण्यापासून रोखले. दरम्यान, चीनने अन्य देशांच्या खाणक्षेत्रात अशाप्रकारे कोरोना प्रसाराबाबत दुर्लक्ष करणे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे आता पेरुवासीयांनीच चिनी कंपन्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध वा बहिष्काराचा मार्ग अवलंबला पाहिजे, जेणेकरुन त्यांना अद्दल घडेल.