ब्रेनड्रेन, ब्रेनगेन आणि व्लादिमीर वेत्रोव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Vladimir_1  H x



केवळ लष्करी तंत्रज्ञानच नव्हे, तर औद्योगिक, उत्पादक, कृषी, वैद्यकीय, अक्षरक्षः जीवनाच्या हर एक क्षेत्रातलं नवीन विकसित होणारं तंत्रज्ञान बिनबोभाट मॉस्कोला पोहोचत होतं. १९५० ते १९८० अशी तब्बल तीस वर्षं! जवळजवळ फुकट!



अंबरनाथचे प्रदीप ताम्हाणे आणि त्यांची विनकोट्स कलर्स अ‍ॅण्ड कोटिंग कंपनी याची स्तंभलेखक प्रमोद सावंत यांनी लिहिलेली यशोगाथा सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. अमेरिकन बॉसबरोबर पंगा घेऊन, ताम्हाणे बड्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतले. खूप परिश्रमांनी त्यांनी औषधी गोळ्यांना ‘कलर कोटिंग’ करण्याची रेडिमिक्स पावडर अमेरिकन कंपनीपेक्षा १० टक्के कमी खर्चात बनवली. खूप प्रेरक अशी ही यशोगाथा आहे.


अर्थात, असे विषय नवीन नाहीत. राष्ट्रीय पातळीवर गेल्या काही दशकांत भारतीय वैज्ञानिकांनी अक्षरश: चमत्कार वाटावेत, असे पराक्रम केले आहेत. पाश्चिमात्य देशांनी आम्हाला सुपर कॉम्प्युटरचं तंत्रज्ञान नाकारलं. पुण्याच्या ‘सेंटर फॉर डेव्हलमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ उर्फ ‘सी-डॅक’ या संस्थेने भारतीय सुपर कॉम्प्युटर बनवला. पाश्चिमात्य देशांनी आम्हाला क्रायोजेनिक इंजिनाचं तंत्रज्ञान नाकारलं. बंगळुरूच्या ‘इंडयिन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ उर्फ ‘इस्रो’ने ‘सीई २०’ नावाचं क्रायोजेनिक इंजिन तर बनवलंच, पण ते वापरुन ‘जीएसएलव्ही-एम. के ३’ हा उपग्रह उडवलासुद्धा. या तर अगदी ताज्या म्हणजे संगणक युगातल्या घटना आहेत.


पण, ५० वर्षांपूर्वी जेव्हा संगणक युगाचा पत्ताही नव्हता, तेव्हाही भारतीयांनी आपल्या विलक्षण बुद्धिमतेचा असाच आविष्कार दाखवला होता. १९६५ साली पंजाबच्या रणभूमीवर पाकिस्तानकडे ‘पॅटन’ या नावाचे अत्याधुनिक अमेरिकन रणगाडे होते, तर भारताकडे होते ‘सेंच्युरिअन’ नावाचे ब्रिटिश आणि ‘शेरमन’ नावाचे अमेरिकन रणगाडे. १९४५ साली दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश आणि अमेरिकन सेनादलांनी त्यांच्याकडचे भंगार म्हणून काढून टाकलेले ‘सेंच्युरिअन’ आणि ‘शेरमन’ रणगाडे भारतीय सैन्याने विकत घेतले. म्हणजे १९६५च्या अत्याधुनिक ‘पॅटन’ समोर भारत २० वर्षे जुने रणगाडे घेऊन उभा राहिला होता. कागदावर पाहिलं, तर कोण जिंकणार नि कोण हरणार, हे स्पष्ट होतं. पण, कमाल भारतीय रणगाडा दल सेनापतींची नि कमाल भारतीय यंत्रअभियंत्यांची! त्या भंगार, रद्दी रणगाड्यांमध्ये त्यांनी इतके बदल केले की, फक्त चॅसी जेमतेम जुनी आणि आतली सगळी यांत्रिक रचना जवळपास नवी, हा चमत्कार त्यांनी कमीत कमी साधसामुग्रीत घडवून आणला आणि मग सेनापतींनी कुशल व्यूहरचना करून १९४५ मधल्या रणगाड्यांकडून १९६५च्या अत्याधुनिक रणगाड्यांची भीषण कत्तल घडवून आणली. पंजाबच्या केमकरण भागात, ‘असल उत्तरची लढाई’ या नावाने अतिप्रख्यात असलेल्या या रणगाड्यांच्या लढाईत ९८ ‘पॅटन’ रणगाडे उद्ध्वस्त झाले.


पण, हे सगळे झाले मानवी बुद्धीचे आविष्कार. एकमानव समुदाय प्रयत्नपूर्वक दुसर्‍या मानव समाजाइतकीच तांत्रिक प्रगती करु शकतो किंवा तितकी उच्च तांत्रिक प्रगती केलेली नसूनसुद्धा, अक्कलहुशारी नीट वापरुन, युद्धात विजय मिळवू शकतो. पण, कम्युनिस्ट हा आधुनिक जगातला एक वेगळाच मानवी नमुना आहे. त्याचं असं म्हणणं की, “उच्च तंत्रमान हवंय, पण त्यासाठी परिश्रम वगैरे करायला लागतात, हे कुणी सांगितलं तुम्हाला? परिश्रम वगैरे करायला पश्चिमी लोकशाहीवादी देश आहेतच, आपण फक्त ते तंत्रज्ञान वापरायचं नि सुखात राहायचं,” हाय काय नि नाय काय!


म्हणजे आत्ता नीट क्रमाने बघा हं! १९७० साली रशियात क्रांती झाली आणि सोव्हिएत राज्यपद्धती नावाची एक महान राज्यव्यवस्था सुरु झाली. या सरकारने सामुदायिक शेती, मोठमोठे कारखाने, धरणे वगैरे उपक्रम हाती घेतले. जर्मनीत फोफावलेल्या नाझी सरकारशी मैत्री करुन सोव्हिएत सरकारने आपली सैनिक दलेही सुसज्ज केली. नव्या बंदुका, नवे रणगाडे, नव्या चिलखती गाड्या, नवी विमानं आणि त्याचं तंत्रज्ञान शिकवायला जर्मन लष्करातले तज्ज्ञ हाय काय नि नाय काय!


१९४१च्या जूनमध्ये हिटलरने मैत्री करार मोडून रशियावर जबरदस्त आक्रमण केलं. कालपर्यंत ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका एकीकडे नि जर्मनी-रशिया दुसरीकडे अशी स्थिती होती. आज जर्मनीने आपल्या मित्रावरच आक्रमण केलं. अरेरे! आता कसं व्हायचं या शोषित-वंचित-पीडितांच्या सरकारचं? पण, कालपर्यंत शत्रू असलेले आता मित्र झाले ना! अमेरिका आपल्या विशाल साधनसाम्रगी भंडारासह रशियासाठी उभी राहिली. सध्या मालवाहू ट्रकपासून रणगाडे-तोफा-विमानांसह सगळ्या वस्तू विपुल प्रमाणात अमेरिकेने रशियाला दिल्या. त्याचं तंत्रज्ञानही दिलं. अरे, हाय काय नि नाय काय !


महायुद्धोत्तर काळात रशियाचे साम्राज्यवादी मनसुबे उघड झाले नि त्यातून शीतयुद्ध सुरु झालं. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ उर्फ ‘नाटो’ या अमेरिकन नेतृत्वाखालील संघटनेत लोकशाहीवादी पाश्चिमात्य देश एकत्र आले आणि त्यांनी रशियाचा साम्राज्यवाद रोखण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कमाल वापर करीत प्रचंड शस्त्रसंभार उभा केला. हे देश लोकशाही व्यवस्थेचे असल्यामुळे तिथे ठराविक काळात निवडणुका होत होत्या. नवी सरकारं येत होती. नवी आर्थिक धोरणं येत होती. हळूहळू का होईना, आर्थिक सुबत्ता येत होती. सगळा कारभार खुलेपणाने चालू होता.


यांपैकी काहीही सोव्हिएत व्यवस्थेत होत नव्हतं. ‘कष्टकर्‍यांची राजवट’ या गोंडस नावाखाली एक अत्यंत क्रूर, उन्मत्त आणि भ्रष्ट राजवट सुरु होती. पश्चिमेतल्या अर्थतज्ज्ञांना कळत नव्हतं की, आता पश्चिमी देशांकडून विज्ञान-तंत्रज्ञान मिळत नसतानाही सोव्हिएत रशिया प्रत्येक क्षेत्रात पुढे कसा? आधुनिक जीवनोपयोगी वस्तू, मोटारी, रेल्वे, आगबोटी, विमानं, तोफा, बंदुका, रणगाडे, पाणबुड्या, अणुबॉम्ब सर्वच बाबतीच रशियाने ‘नाटो’ राष्ट्रांच्या तोडीस तोड साधनं बनवली आहेत. किंबहुना, ‘स्पुटनिक’ हा उपग्रह प्रथम अंतराळात सोडून रशियाने अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिकेवर मात केली आहे. सरणार्‍या प्रत्येक वर्षागणिक सोव्हिएत अर्थव्यवस्था खालावत असताना, विज्ञान-तंत्रज्ञान इतकं अद्ययावत राहणं त्यांना कसं काय साध्य होतं?


जानेवारी १९८१ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमधल्या फ्रेंच गुप्तहेर खात्याचा प्रमुख ब्येस बॉनेट यांच्या टेबलावर एक फाईल आली. वाचून थक्क झालेल्या बॉनेटने प्रकरणात ताबडतोब मंजुरी देऊन सगळी माहिती त्वरित राष्ट्रध्यक्ष फ्रान्स्वा मित्राँ यांच्यासमोर ठेवली. मित्राँदेखील चकित झाले. त्यांनी ती फाईल जुलै १९८१ मध्ये ‘नाटो’ गटाचे नेते म्हणजेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांना दिली आणि रिगन यांच्याकडून ती सीआयए प्रमुख विल्यम केसी यांच्या टेबलावर येऊन पडली.


घडलं होतं ते असं की, सोव्हिएत गुप्तचर खातं ‘केजीबी’ने एक अत्यंत जबरदस्त डाव रचला होता. स्वत: रशियासह रशियाच्या पूर्व युरोपीय देशांच्या गटातला, ‘नाटो’ राष्ट्रांच्या वकिलातीमध्ये काम करणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग, तसंच विद्यार्थी म्हणून जाणारे लोक यांनी यापुढे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तांत्रिक संशोधनातला मिळेल तो दुवा, मिळेल तो कागद हस्तगत करायचा होता.


‘केजीबी’ने यासाठी खास ‘डायरेक्टरेट टी’ म्हणजे तांत्रिक संचालनालय असा विभाग उघडला. साधी टाचणी असो वा अवाढव्य क्रेन असो, जे जे मिळेल ते तंत्रज्ञान पळवा आणि मॉस्कोला पाठवा. ‘केजीबी’च्या या प्रकल्पाला अतोनात यश मिळालं. केवळ लष्करी तंत्रज्ञानच नव्हे, तर औद्योगिक, उत्पादक, कृषी, वैद्यकीय, अक्षरक्षः जीवनाच्या हर एक क्षेत्रातलं नवीन विकसित होणारं तंत्रज्ञान बिनबोभाट मॉस्कोला पोहोचत होतं. १९५० ते १९८० अशी तब्बल तीस वर्षं! जवळजवळ फुकट!


मॉस्कोच्या सुप्रसिद्ध ‘अ‍ॅकेडमी ऑफ सायन्स’मधल्या वैज्ञानिकांना मूलभूत संशोधन करायला वेळच नव्हता आणि जरुरीही नव्हती. पाश्चिमात्त्य देशांमधल्या शेकडो हस्तकांकडून देणारे तांत्रिक फॉर्म्युले जुळवायचे, तपासायचे आणि वस्तू बनवायच्या. ग्राहकोपयोगी असतील तर ते फॉर्म्युले कारखानदारांना द्यायचे. शस्त्रास्त्रांचे असतील तर संबंधित खात्यांकडे द्यायचे. हे काम करणारा एक वैज्ञानिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर कर्नल व्लादिमीर वेत्रोव्ह याला एक दिवस या उलट्या ‘ब्रेनड्रेन’चा प्रचंड कंटाळा आला. त्याने मॉस्कोतला त्याचा एक फ्रेंच मित्र झाक प्रीव्होस्ट याच्यामार्फत फ्रेंच गुप्तचर खात्याशी संपर्क साधला. फ्रेंच गुप्तचर प्रमुख ते सीआयए प्रमुख असा त्या माहितीचा प्रवास कसा झाला, ते आपण पाहिलंच. पुढच्या वर्षा-दीड वर्षांत वेत्रोकडून आणखी चार हजार गुप्त दस्तऐवज मिळाले.


मग अमेरिकेसह सगळ्याच ‘नाटो’ देशांनी जाम बंदोबस्त सुरु केला. अगदी टाचणी बनवण्याचं तंत्रज्ञानही चोरून देशाबाहेर जाणार नाही, अशी त्यांनी व्यवस्था केली. पण, ती करताना त्यांना फार प्रयास पडले. इतकं त्यांचं विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र सोव्हिएत हेरांनी पोखरून सोडलं होतं.


यानंतर २३ मार्च, १९८३ या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रीगन यांनी ‘स्टार वॉर’ची घोषणा केली. म्हणजे अमेरिका आता अंतराळातल्या उपग्रहांवरुन आण्विक क्षेपणास्त्रं सोडण्यास सक्षम झाली होती. इथेच सोव्हिएत रशिया संपला. कारण, हे तंत्रज्ञान चोरून मॉस्कोला नेण्याची त्याची यंत्रणा अगोदरच संपली होती.




@@AUTHORINFO_V1@@