‘ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के, जरा बच के, ये है मुंबई मेरी जाँ...’ आजही मुंबईच्या परिस्थितीला हे फिल्मी गीतातील बोल तंतोतंत लागू पडतात. मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणीय सद्यःस्थितीबद्दल २०१९-२०च्या अहवालातूनही हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अहवालानुसार, २०१९-२० मधील हवेतील प्रदूषणाची पातळी ही सुरक्षित पातळीपेक्षा अधिक आढळली आहे. तसेच समुद्रकिनार्यावरची ई-कोलाची पातळीसुद्धा सुरक्षित पातळीहून अधिक आढळल्याचे अहवालानात नमूद करण्यात आले आहे. या वर्षीच्या पिण्याच्या पाण्यातील संसर्गजन्य प्रदूषकांची (contaminants) पातळी (०.७ टक्के) ही २०१०-११ सालाच्या पातळीपेक्षा (२४.६४ टक्के) सुधारल्याचेही अहवाल अधोरेखित करतो. तसेच शहरातील ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च’ तर्फे (सफर) अनेक भागांत २०१९-२० सालातील अपायकारक गॅस व ‘पार्टिक्युलेट मॅटर’ची (पीएम) वार्षिक सरासरी पातळी सुरक्षित पातळीपेक्षा जास्त आढळली आहे.
पीएम १० व २.५ चे प्रमाण
‘पीएम १०’ची पातळी प्रति घनमीटरला ९३ मायक्रोग्रॅम आढळली आहे. ही सुरक्षित अनुज्ञेय पातळी ६० मायक्रोग्रॅमपेक्षा दीडपटीहून जास्त आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या (१०१) पातळीहून ती थोडी खाली गेलेली आढळली आहे. सर्वात जास्त पातळी वांद्रे-कुर्ला संकुलात ११४ आहे, त्या खालोखाल अंधेरीला ११० मायक्रोग्रॅम इतकी आढळली. ‘पीएम २.५’ची पातळी प्रति घनमीटरला ५४ मायक्रोग्रॅम आढळली आहे. ही सुरक्षित अनुज्ञेय पातळी ४० पेक्षा १.२५ पटीपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त पातळी ६७ मायक्रोग्रॅम ही वांद्रे-कुर्ला संकुलात आहे.
अमोनियाचे प्रमाण
पूर्व उपनगरातील देवनार भागात मुंबईतील सगळ्यात जास्त घनकचरा फेकला जातो. त्यामुळे साहजिकच त्या भागात मोठ्या प्रमाणात अमोनिया गॅसचा प्रादुर्भाव (औद्योगिक कंपन्यांमुळे) झाला आहे व त्यामुळे फुप्फुसावर वाईट परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे.
हा गॅसमधील छोटे पार्टिकल असलेला अमोनिया इतर प्रदूषकांत मिसळतो व श्वासोच्छ्वासाला त्रास देतो.
२०१९-२० या वर्षातील निरीक्षण नोंदी खाली दिल्याप्रमाणे आढळल्या होत्या –
पीएम १० - (८०-१२८) जास्तीची नोंद - वांद्रे-कुर्ला संकुल
पीएम २.५ - (४१-८६) जास्तीची नोंद - वांद्रा-कुर्ला संकुल
ओझोन - (०७-३३) पार्ट प्रति दशलक्ष - जास्तीची नोंद - भांडुप
कार्बन मोनॉक्साईड - (०.६-१.२) पार्ट प्रति दशलक्ष- जास्तीची नोंद - वरळी
नायट्रोजन डायॉक्साईड - (१.५-३.४) पार्ट प्रति कोटी - जास्तीची नोंद – चेंबूर
पाण्याची शुद्धता व जन्म-मृत्यू
पालिकेतर्फे होणार्या पाणीपुरठ्यात २०१९-२० मध्ये ०.७ टक्के इतके कंटॅमिनेशन आढळून आले, तर २०१०-११ साली हे प्रमाण २४.६४ टक्के इतके होते. २०१९ सालात जन्म नोंदणी एक लाख, ४८ हजार, ८९८ झाली असून जन्मदर प्रति हजार लोकसंख्येमागे ११.६१ इतका आहे. पालिका क्षेत्रात मृत्यू नोंदणी ९१ हजार, २२३ होती. मृत्युदर प्रति १००० लोकसंख्येमागे ७.११ होता. बाळांची मृत्यू नोंदणी ३,४३० होती. त्यांचा मृत्युदर एक हजार जीवंत बाळांमागे २३.०४ आहे. गरोदर मातांची मृत्यू नोंदणी २५७ होती आणि त्यांचा मृत्युदर हजारामागे १.७३ होता. २०१९ साली मुंबईत २९.७५ लाख झाडे होती. ‘एन’ वॉर्ड घाटकोपरला सर्वात जास्त म्हणजे २.९२ लाख झाडे होती आणि सर्वात कमी ‘सी’ वॉर्ड चंदनवाडीला ५,७५६ झाडे होती.
मुंबईच्या समुद्रात ई-कोली बॅक्टेरियाचे प्रमाण
मुंबईच्या समुद्रात ई-कोली बॅक्टेरियाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी होत असले तरी ते अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्तच आढळून आले आहे.
मुंबईच्या ‘ईएसआर २०१९-२०’च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, पिण्यायोग्य पाण्यातील ई-कोलीमुळे हगवणीसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या ई-कोलाचे अनुज्ञेय प्रमाण १०० कॉलनी फॉर्मिंग युनिट्स (CFU) प्रति १०० मिलीलीटरला असे आहे. मात्र, वांद्य्राला ते सर्वाधिक म्हणजेच ५०० सीएफयू इतके आढळले आहे. गेल्या वर्षी ते ४०० सीएफयू होते. वरळीला हेच प्रमाण ३४० सीएफयू होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक वाय. बी. सोनटक्के यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबईच्या समुद्रात सांडपाणी हे विनाप्रक्रिया सोडले जाते. त्यामुळे ई-कोली सीएफयू जास्त असण्याचे ते एक महत्त्वाचे कारण असू शकते. तेव्हा, मुंबई पालिकेकडून अजून ‘स्युवेज ट्रिटमेंट’ची कामे पूर्ण झालेली नाहीत, ती कामे लवकर पूर्ण झाल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते.
समुद्री पाण्याची गुणवत्ता
मुंबईतील पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन डी यांच्या म्हणण्याप्रमाणे, ई-कोली बॅक्टेरियाच्या सध्याच्या जास्त प्रमाणामुळे समुद्रातील खाद्य कंटॅमिनेट होऊ शकते व ते खाल्ल्याने माणसे आजारी पडू शकतात. या प्रदूषित पाण्यात पोहल्याने त्वचेचे रोग होण्याचा धोकादेखील बळावतो. पालिकेकडून कुलाबा, वरळी, वांद्रे या ऑऊटफॉलच्या ठिकाणी सांडपाण्यावर फक्त प्राथमिक प्रक्रिया होते. संबंधित खात्याकडून या ऑऊटफॉलच्या ठिकाणापासून एक किमी परिसरातील वर्षभर पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेतले जातात आणि ते प्रमाण ‘एमपीसीबी’च्या अनुज्ञेयाप्रमाणे विविध उपयोगांसाठी तपासले जाते.
‘मरिन ऑऊटफॉल’ म्हणजे पाईपमधून वा बोगद्यातून प्रक्रिया न केलेले अशुद्ध पाणी विनाप्रक्रिया असेच समुद्रात सोडले जाते. हे बहुधा वॉटर डिसलायनेशन प्लांटमधून सोडले जाते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्यामुळे ई-कोली बॅक्टेरिया जास्त प्रमाणात समुद्राच्या पाण्यात मिळत असतात. परिणामी, मानवी व प्राण्यांच्या एक्सक्रिटामध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण असते.
मुंबई महापालिकेने अलीकडेच सांडपाण्यावर प्रकिया करणार्या प्लाटंची संख्या वाढविण्यासाठी आणि त्यांचे नवीन बांधकाम करण्याकरिता निविदा मागविलेल्या आहेत. परंतु, या कामासाठी विलंब झाला. कारण, राष्ट्रीय हरित लवादाने या प्रक्रियेकरिता सुधारित प्रामाण्याच्या अटी घातल्या आहेत. गेल्या वर्षी पालिका जुन्या प्रामाण्यासह ‘एसटीपी’ (स्युव्हेज ट्रिटमेंट प्लांट) प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदारांच्या नेमणुका करण्याच्या स्थितीत होती. पण, आता त्या निविदा बदलाव्या लागत आहेत. नवीन निविदांप्रमाणे, ‘एसटीपी’ प्रक्रिया करण्याकरिता अधिक कठोर निकषांचा वापर करावा लागणार आहे. पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकार्याच्या सांगण्याप्रमाणे प्रक्रिया करण्यासाठी रोजची सांडपाण्याची व्याप्ती २,७०० दशलक्ष लीटर एवढी आहे आणि हे सांडपाण्यावर सात ‘एसटीपी’मधून प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या या सांडपाण्यावर फक्त प्राथमिक प्रक्रिया केली जाते. शहरातील काही भागात सांडपाणी सोडण्याकरिता मलजलांच्या जाळ्या बांधलेल्या नाहीत आणि त्यामुळे ते सांडपाणी प्राथमिक प्रक्रियासुद्धा न करताच समुद्रात सोडले जाते. जसे की मिठी नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी.
मुंबईतील मलजल प्रक्रिया केंद्रे
मुंबईतील सक्षम नसलेली मलजल प्रक्रिया केंद्रे व सर्व ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने मुंबईतील नद्यांचे नाल्यामध्ये रूपांतर होणे हे साहजिकच. परिणामी, ठिकठिकाणी पाणी साचणे, पुरस्थिती निर्माण होणे व पाणीपुरवठा वाहिनीतील पाणी अशुद्ध होण्याचे प्रकारदेखील वारंवार घडताना दिसतात.
त्यामुळे अवाढव्य अशा मुंबइ नगरीत मलजल प्रक्रिया केंद्रे स्थापणे ही एक आव्हानात्मक गोष्ट बनली आहे. १.२४ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत सध्या दिवसाला २,७०० दशलक्ष लीटर मलजल तयार होते व ही सगळी व्याप्ती फक्त प्राथमिक प्रक्रिया केल्यावर वा काही ठिकाणी प्राथमिक प्रक्रियेविना नदीत, समुद्रात वा खाडीत सोडले जाते. ही सध्याची धोकादायक स्थिती आहे. अनेक निवासी संकुलातील मलजल आणि औद्योगिक वा रासायनिक मलजल (effluent) मिठी नदीत प्रक्रियेविना सोडले जातात, ते वेगळे. मुंबईतील सात मलजल प्रक्रिया केंद्रे फार विलंबाने उभारली जाणार आहेत. परंतु, त्यात तीन स्तरावर (primary, secondary and tertiary) प्रक्रिया केल्या जाणार आहेत. यातून बाहेर पडणारे पाणी शुद्ध स्वरूपात असणार आहे व ते मुंबईतील अपेय जलाकरिता कामी येणार आहे. मुंबई महापालिकेची ही मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात फार दुर्लक्ष झाले आहे. परंतु, केंद्रीय स्तरावर यासंबंधीचे केलेले बदलही या प्रक्रियेतील विलंबासाठी एक मोठे कारण ठरले आहे.