१९१२ साली २३ वर्षांच्या इगोरने बनवलेल्या विमानाला मॉस्कोच्या औद्योगिक प्रदर्शनात पहिलं बक्षीस मिळालं. १९१३ सेंट पीटर्सबर्गच्या लष्करी प्रदर्शनात त्याने बनवलेल्या विमानाचा नमुना रशियन सेनापतींनी पास केला आणि १९१४ साली तो रशियन लष्करासाठी बॉम्बफेकी विमानं बनवू लागला.
इसवी सनाच्या १७व्या शतकात मुघल साम्राज्य हे भारतातलं सर्वात मोठं राज्य होतं. त्याची राजकीय राजधानी दिल्ली-आग्रा असली, तरी आर्थिक राजधानी होती सुरत. मुघल बादशाहीच्या खजिन्यातला महसुलाचा मोठा हिस्सा, सुरतेच्या बंदरातून चालणार्या देशी-विदेशी व्यापारातून निर्माण होत होता. पश्चिम किनारपट्टीवर मुघलांच्या खालोखाल मोठं राज्य होतं ते आदिलशहाचं. त्याचीही राजकीय राजधानी होती शहर विजापूर. पण, आर्थिक राजधानी होती कोकण किनार्यावरचं दाभोळ. सन १६५९ साली, अफजलखानाला ठार केल्याबरोबर तातडीने शिवरायांनी दाभोळ जिंकलं, ते उगीच नव्हे. सन १६६४ आणि १६७० अशी दोन वेळा शिवरायांनी बलाढ्य मुघल सत्तेची आर्थिक राजधानी सुरत साफ लुटली. याचा चटका इतर कुणाला किती जाणवला असेल, नसेल. पण, इंग्रजांना फारच जाणवला. सन १६६२ साली ‘मुंबई बेट’ इंग्रजी राजाच्या ताब्यात आलं. सन १६६८ साली राजाने ते ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला भाडेपट्टीने दिलं, सन १६६९ साली जेराल्ड आँजियर हा अत्यंत हुशार आणि दूरदर्शी इसम मुंबईचा गव्हर्नर झाला. शिवाय त्याच्याकडे सुरतेच्या मुख्य वखारीचं अध्यक्षपदही होतंच. तेवढ्यात म्हणजे, १६७० साली शिवरायांनी सुरत दुसर्यांदा लुटली. तेव्हा आँजियरने मनाशी पक्की खूणगाठ बांधली की, आता आपला मुख्य व्यापार सुरतेहून मुंबईला हलवायचा. कशी होती या वेळी मुंबईची स्थिती? मुंबईच्या उत्तरेला वांद्रे-कुर्ला ते वसई-ठाणे या भागात पोर्तुगिजांची प्रबळ आरमारी सत्ता होती. मुंबईच्या दक्षिणेला जंजिरेकर सिद्दीची प्रबळ आरमारी सत्ता होती. मुंबईच्या पश्चिमेला अफाट समुद्र होता. मुंबईच्या पूर्वेला उल्हास नदीच्या खाडीने बनलेला; पण अतिशय सुरक्षित खोल समुद्र होता नि त्या समुद्रापलीकडे पनवेलपासून थेट मालवणपर्यंत शिवरायांचं राज्य होतं.
पोर्तुगीज आणि सिद्दी हे आरमारीदृष्ट्या जसे प्रबळ होते, तसेच ते कमालीचे धर्मांध होते, हिंदूंची गावं लुटणे, जाळणे, कत्लेआम करणे आणि मनसोक्त बाटवाबाटवी करणे, हे त्यांचे अत्यंत आवडते छंद होते. त्यामुळे मुंबईच्या भोवतालची कोकणपट्टी सततच्या लढायांनी नुसती गांजून गेली होती. सुरतेला मुघली अधिकारी हे भयंकर भ्रष्ट होते. लाच खाल्ल्याशिवाय ते कोणतंही काम करीत नसत. जेराल्ड आँजियर हा मुळात एका प्रोटेस्टंट पाद्य्राचा मुलगा होता. पण, त्याच्या व्यापारी इंग्लिश रक्ताने त्याला अचूक संधी दाखवली. त्याने मुंबईचा गव्हर्नर या नात्याने एक जाहीरनामा काढला आणि तो पोर्तुगीज, सिद्दी, मराठे, मुघल, आदिलशहा अशा सर्व शेजारी सत्तांच्या मुलखातल्या व्यापार्यांपर्यंत पोहोचेल, असं पाहिलं. या जाहीरनाम्याचा आशय असा होता की, ‘आता मुंबईवर आमचं राज्य आहे, आम्ही व्यापारी लोक आहोत. तुम्ही धर्माने कुणीही असा, आमच्या राज्यात या आणि सुखाने व्यापार करा. आम्ही तुमच्या धार्मिक बाबतीत अजिबात ढवळाढवळ करणार नाही. आम्ही तुमच्या व्यापाराला संपूर्ण संरक्षण आणि उत्तेजन देऊ. मुंबईत या, शांतपणे व्यापार करा, तुम्ही मोठे व्हा नि आम्हालाही मोठं करा.’ मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याची ही सुरुवात होती. व्यापार-उदीम वाढूनच राज्याचा खजिना समृद्ध होत असतो आणि तो वाढण्यासाठी व्यापारी वर्गाला हवी असते शांतता आणि सुरक्षिततेची हमी! हे आँजियरला कळलं. शिवरायांना, शंभूराजांना, चिमाजी आप्पांना आणि माधवरावांनाही हे कळत होतं. पण, नियतीने बिचार्यांना आयुष्यचं इतकं कमी दिलं की, राज्याची आर्थिक बाजू मजबूत करायला त्यांना वेळच मिळाला नाही.
व्यापारवाढीसाठी शांतता आणि सुरक्षितता किती महत्त्वाची असते, याचं एकच ठळक उदाहरण पाहूया. ठाण्याजवळ घोडबंदर नावाचं गाव आहे. ते अर्थातच पोर्तुगीज मुलखात होतं. धार्मिक छळाला गावकरी अगदी कंटाळून गेले होते. अशा स्थितीत मुरकुटे आडनावाच्या एका इसमाने इंग्रजी हद्दीत म्हणजेच मुंबईला स्थलांतर केलं. जीवित, वित्त आणि धर्म यांच्याबाबतीत सुरक्षितता मिळाल्यावर मुरकुटे मंडळींनी अनेक प्रकारचा व्यापार सुरू करून अफाट संपत्ती मिळवली. गणबाशेट मुरकुटे यांच्या मुंबईच्या फोर्टमधल्या पेढीवर कायम १७ लाख रुपये रोख ठेवलेले असत. कोणात्याही क्षणी गरज लागल्यास वापरता यावेत म्हणून! लक्षात घ्या, १८व्या शतकातले रोख १७ लाख चांदीचे रुपये, कागदी नोटा नव्हे! गणबाशेठ मुरकुटे यांचे पणतू म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना, ज्यांनी भारतात रेल्वे सुरू केली आणि अक्षरश: युगप्रवर्तन केलं. आता आपण भारताच्या सुदूर वायव्येला नजर टाकूया. तो पाहा काळा समुद्र. आशिया खंड आणि युरोप खंड यांना विभागणारा काळा समुद्र हे खरं म्हणजे एक प्रचंड सरोवरच आहे आणि तो पाहा, त्याच्या उत्तर काठावरचा युक्रेन नामक देश. युक्रेन देश हे अख्ख्या युरोप खंडाचं गव्हाचं कोठार मानलं जातं. खरं तर युक्रेन हा वेगळा देश होता. पण, रशियन झार राजांनी तो हळूहळू करत पूर्णपणे गिळला. पण, तसा युक्रेनियन लोकांना कोणताही जाच नव्हता. रशियन लोकांप्रमाणेच ते स्लाव्ह वंशाचे, गोर्या कातडीचे नि ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी होते, फक्त त्यांची भाषा वेगळी होती. पण, रशियन झार लोकाचं आपल्या साम्राज्यातल्या सगळ्याच लोकांना उत्तेजन असे की, त्यांनी पश्चिम युरोपातल्या पुढारलेल्या देशांत जावं. ऑस्ट्रिया, प्रशिया (नंतर जर्मनी) फ्रान्स, इटली इत्यादी देशांमधून भाषा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान शिकावं आणि स्वत:बरोबरच साम्राज्यालाही मोठं करावं, म्हणजेच विद्या, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते स्वातंत्र्य, मुक्त वातावरण झार राजांनी आपल्या राजेशाही व्यवस्थेतही आपल्या सगळ्याच नागरिकांना दिलं होतं. तर, अशा त्या रशियन साम्राज्यातल्या युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह या शहरात १८८९ साली इगोर सिकोर्स्की हा मुलगा जन्मला. त्याचा बाप इव्हान सिकोर्स्की हा सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता आणि त्या निमित्ताने तो वरचेवर पश्चिम युरोपातल्या नामवंत विद्यापीठांत जात असे. रशियाचे ऑस्ट्रिया आणि फ्रान्सशी जरा जास्त जवळकीचे संबंध होते, त्यामुळे इव्हान अनेकदा पॅरिसला जात असे. अनेकदा त्याच्यासोबत स्वत: डॉक्टर असलेली बायको मारिया आणि पाच मुलंदेखील असत.
ही मारिया लिओनार्दो-द-विंचीची अभ्यासक होती. लिओनार्दोची चित्रकला आणि त्यापेक्षाही त्याच्या कागदपत्रांमधील अनेक यंत्रांची रेखाटनं याबद्दल ती मुलांशी खूप संवाद करीत असे. त्यातल्या डोक्यावर पंखा लावून उडणार्या विमानाच्या चित्राने (ज्याला आपण आज हॅलिकॉप्टर म्हणतो) छोटा इगोर एकदम भारावून गेला. याच काळात ज्यूल्स व्हर्न या फ्रेंच लेखकाच्या विज्ञान कादंबर्यांनी लोकांना वेड लावलं होतं. ज्यूल्स व्हर्नच्या साहित्यातील अनेक चित्रविचित्र यंत्र प्रत्यक्षात शोधून काढण्यासाठी, युरोप-अमेरिकेतले अनेक वैज्ञानिक जीव तोडून प्रयत्न करीत होते. मोटर कार हे स्वयंचलित वाहन निर्माण करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत लागलेली स्पर्धा अमेरिकेने जिंकली होती. आता स्पर्धा सुरू झाली विमान बनवण्यासाठी. यातही फ्रेंच आणि जर्मन संशोधक खूप पुढे होते. सन १८७८ साली फ्रेंच संशोधन आल्फोन्स पेनॉँ याने एक खेळण्यातलं उडणारं हॅलिकॉप्टर बनवलं. ते मुलांमध्ये अणि मोठ्यांमध्येही खूप लोकप्रिय झालं. अमेरिकेतला एक बिशप मिल्टन राईट याने ते खेळणं आपल्या विल्बर आणि ऑर्विल या मुलांना दिलं. खेळता खेळता ते मोडलं. ११ वर्षांच्या विल्बरच्या मनात ठिणगी पडली. त्याने ते खेळणे उघडून दुरुस्त तर केलंच; पण स्वत: तसंच नवीन खेळणं बनवलं आणि अखेर याच विल्बर-ऑर्विल राईट बंधूंनी १९०३ साली पहिलं विमान बनवलं. पाठोपाठ १९०५-०६ साली जर्मन संशोधक काऊंट झेपेलिन यानेही विमान बनवलं. गंमत म्हणजे, लिओनार्दो आणि ज्यूल्स व्हर्न यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या इगोर सिकोर्स्कीने १९०१ साली वयाच्या १२ व्या वर्षी स्वतःच्या प्रयत्नांनी खेळण्यातलं हॅलिकॉप्टर बनवलं होतं. १९०८ साली इगोरला कळलं की, अमेरिकेत राईट बंधूंनी आणि जर्मनीत फर्डिनांड झेपेलिन यांनी विमानाचा शोध तर लावलाच आहे. पण, विमानांचं व्यापारी तत्त्वावर उत्पादन करणार्या स्वतःच्या कंपन्या काढल्या आहेत. १९ वर्षांचा इगोर सिकोर्स्की झपाट्याने कामाला लागला. १९१२ साली २३ वर्षांच्या इगोरने बनवलेल्या विमानाला मॉस्कोच्या औद्योगिक प्रदर्शनात पहिलं बक्षीस मिळालं. १९१३ सेंट पीटर्सबर्गच्या लष्करी प्रदर्शनात त्याने बनवलेल्या विमानाचा नमुना रशियन सेनापतींनी पास केला आणि १९१४ साली तो रशियन लष्करासाठी बॉम्बफेकी विमानं बनवू लागला. त्याच साली महायुद्ध सुरू झालं. आपल्या साम्राज्यातल्या एक तरुण इंजिनिअरच्या या कर्तबगारीवर खुद्द सम्राट झार निकोलस दुसरा हा बेहद खूश होता.
पण..... १९१७ साली रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली. नव्या साम्यवादी नेत्यांना स्वतंत्र बुद्धिमत्तेचे संशोधक नको होते. आपल्याला गोळी घालण्याचा लेखी आदेश निघाला आहे, हे समजताच इगोर कीव्हमधून पळाला आणि प्रथम पॅरिसला नि १९१९ साली न्यूयॉर्कला आला. १९२३ साली त्याने न्यूयॉर्क राज्यात रुझवेल्ट या ठिकाणी पहिली विमानोड्डाण कंपनी काढली. तेव्हापासून १९७२ साली वयाच्या ८३व्या वर्षी मरेपर्यंत अनेक नवनवीन विमानं बनवणं, विमानोड्डाण शास्त्रावर व्याख्यानं देणं आणि नवनवीन कंपन्या काढून यशस्वी व्यवसाय करणं, यात तो पूर्णपणे बुडालेला होता. त्याची सर्वात संस्मरणीय उपलब्धी म्हणजे, त्याने जगातलं पहिलं हॅलिकॉप्टर बनवलं आणि १४ सप्टेंबर, १९३९ या दिवशी ते उडवून दाखवलं. लिओनार्दोच्या चित्रातलं हॅलिकॉप्टर अशा रीतीने प्रत्यक्षात उतरलं. यावेळी दुसरं महायुद्ध सुरू झालेलंच होतं. साहजिकच या नव्या विमानाचा अमेरिकन सैन्याला फार उपयोग झाला. अमेरिका विमानोड्डाण क्षेत्राचा पाया घालणारे संशोधक, म्हणून राईट बंधूंना जितका सन्मान देते, तितकाच जन्माने रशियन-युक्रेनियन असलेल्या इगोर सिकोर्स्कीलाही देते. स्वतःच्या वैज्ञानिक यशाबद्दल सिकोर्स्की म्हणतो, “मुक्त, स्वतंत्र जगात, मुक्त माणूस काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणजे मी आहे.”