चीनचा वाजणार बॅण्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020   
Total Views |


Mike Pompeo_1  




युरोपसह मध्य-पूर्वेतील चीनविरोधी लॉबीची एकजुट करुन चीनला झटका दिल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या आठवड्यात दक्षिण अमेरिकेतील चार देशांचा दौरा केला. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये वाढलेला चिनी प्रभाव कमी करणे, हा त्यांच्या या दौर्‍याचा उद्देश होता. पॉम्पिओ यांच्या चार दिवसीय दौर्‍यावेळी सुरीनाम, गयाना, ब्राझील आणि कोलंबियातील आर्थिक विकासासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत आणि अन्य पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा झाली. तसेच दक्षिण अमेरिकेतील चीनच्या सर्वात जवळच्या सहकार्‍यांपैकी असलेल्या व्हेनेझुएलावरदेखील पॉम्पिओ यांनी दबाव टाकला. ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अराजो यांच्याशी चर्चा केल्यानंतर माईक पॉम्पिओ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मी ब्राझीलच्या भविष्याला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या जाळ्यापासून सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर विषयावर चर्चा केली,” तर परराष्ट्र खात्याने आपल्या निवेदनात म्हटले की, ब्राझीलने व्हेनेझुएलाच्या शरणार्थ्यांना आश्रय दिल्याबद्दल धन्यवाद आणि चीन तथा हुवावेचे नाव न घेता म्हटले की, अमेरिका आणि ब्राझील वाढत्या व्यापारी व डिजिटल सुरक्षेच्या दिशेने काम करतील. अमेरिकेने सातत्याने ब्राझीलला चिनी दूरसंचार कंपनी हुवावेबाबत स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून अन्य जागतिक सहकार्‍यांनादेखील असे करायला प्रोत्साहन दिले.


दुसरीकडे पॉम्पिओ यांच्या दौर्‍यामुळे चीन संतापला असून ब्राझीलमधील चिनी दूतावासाने माईक पॉम्पिओ यांच्यावर, ते दक्षिण अमेरिकेबरोबरचे चिनी संबंध बिघडवण्यासाठी घाणेरडे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर पॉम्पिओ यांच्या दौर्‍याने घाबरलेल्या चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अराजो यांच्याशी लगोलग दुरध्वनीवरुन संवादही साधला. चिनी माध्यमांतही पॉम्पिओ यांच्या दौर्‍याला चीनविरोधी ठरवण्यात आले. चिनी सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने युरोप आणि मध्य-पूर्वेनंतर पॉम्पिओ यांनी दक्षिण अमेरिकेमध्ये चीनविरोधी लॉबी तयार केल्याचे म्हटले. दरम्यान, सुरीनाममध्ये नुकतेच नवे सरकार सत्तेवर आले असून त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. चिनी कंपन्या नि:पक्ष आणि न्यायसंगत आधारावर प्रतिस्पर्धा करत नाहीत, असे त्यात म्हटले आहे. सुरीनामच्या आधीच्या सरकारने चीनबरोबरील संबंध कित्येक पटींनी वाढवले होते आणि त्यात चीनने भरपूर गुंतवणूक केली तसेच कर्जही दिले होते. परंतु, देशातील सत्तापरिवर्तन आणि पॉम्पिओ यांच्या दौर्‍याने चीनचा सुरीनाममध्येही बॅण्ड वाजण्याची शक्यता आहे. चीनलादेखील याची जाणीव झाली असून यामुळेच चिनी दुतावासाने माईक पॉम्पिओ यांच्या सुरीनाम दौर्‍याची निंदा केली. गयानामधील चिनी दुतावासानेदेखील अशाचप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे, तर कोलंबियाचे राष्ट्रपती इव्हान ड्युक यांच्याबरोबरील भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. पॉम्पिओ यांनी दौरा केलेल्या चारपैकी तीन देश व्हेनेझुएलाच्या सीमेला लागून आहेत आणि ते चीनचे निकटचे सहकारी मानले जातात. मात्र, पॉम्पिओ यांच्या दौर्‍याचा मुख्य उद्देश या देशांना त्या क्षेत्रातील चिनी गुंतवणूक आणि प्रकल्पांच्या शिकारी प्रवृत्तीबाबत जागरुक करणे हा होता. ट्रम्प प्रशासन सातत्याने जगभरातील देशांनी चीनच्या गिधाडी नजरेबाबत जागरुक करत असून चिनी कर्जाच्या बोज्याखाली दबून व आर्थिक घसरणीमुळे देश दिवाळखोर होऊ शकतो, हेदेखील ते व्हेनेझुएला आणि इक्वेडोरचे उदाहरण देऊन सांगत आहेत.


तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी झेक प्रजासत्ताक, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया आणि पोलंड या युरोपीय देशांचा दौरा केला होता. परिणामी, आता या सर्व देशांतही चीनविरोधी वातावरण तयार झाले आहे. झेक प्रजासत्ताक तर एक पाऊल पुढे जाऊन तैवानबरोबर संबंध स्थापित करत आहे. ब्रिटन आणि फ्रान्स आधीपासूनच चीनविरोधात असून जर्मनीने नुकतेच परराष्ट्र धोरणात बदल करत चीनऐवजी भारताला प्राधान्य देण्याचे म्हटले होते. पॉम्पिओ यांच्या सातत्याने या देशांबरोबर चर्चा करण्याचा हा परिणाम होता आणि यामुळे युरोप चीनच्या हातातून निसटल्याचे दिसते. आता त्यांनी आपले लक्ष दक्षिण अमेरिकेतील देशांवर केंद्रित केले आहे. त्यांच्या या दौर्‍यानंतर ज्या प्रतिक्रिया आणि परिणाम समोर येत आहेत, त्यावरुन पॉम्पिओ यांचा दौरा यशस्वी झाल्याचे आणि कित्येक देश चीनविरोधात उभे ठाकल्याचे दिसते.

@@AUTHORINFO_V1@@