हेरगिरी : सदैव तेजीत चालणारा उद्योग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
spying_1  H x W




जगात केवळ शत्रुराष्ट्रंच एकमेकांवर हेरगिरी करतात, असं नसून मित्रराष्ट्रंही एकमेकांवर हेरगिरी करत असतात, ही वस्तुस्थिती आहे आणि असं करणं हे अपरिहार्य आहे. कारण, राजनीतीमध्ये शत्रू आणि मित्र हे कधीच कायमचे नसतात; ते सतत बदलतच असतात.
 
 
‘दीवार’ या अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील गाजलेले दृष्य : अमिताभच्या प्रतिस्पर्धी टोळीचा बॉस मदन पुरी आणि त्याचे लोक एका आलिशान हॉटेलच्या लिफ्टमध्ये शिरतात. अमिताभ अत्यंत वेगाने त्यांच्या पाठोपाठ जातो आणि लिफ्ट आतून बंद करतो. मग तो त्याचा मनसुबा मदन पुरीसमोर मांडतो. चकित झालेला मदन पुरी विचारतो, “पण हे बोलणं इथे लिफ्टमध्ये का?” यावर अमिताभ उत्तर देतो, “क्यों की लिफ्ट की दिवारों के कान नही होते.”
 
 
मुंबईच्या मिनर्व्हा प्रेक्षागृहात मी हा चित्रपट अनेकदा पाहिला. प्रत्येक वेळी पब्लिक अमिताभच्या या डॉयलॉगला छप्परतोड दाद देत असे. चित्रपटाचे सोडा आणि दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांचंही राहू द्या, पण प्रत्यक्षात हेरगिरीच्या क्षेत्रात ही स्थिती कधीच संपुष्टात आली आहे. याचं कारण म्हणजे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची घोडदौड. सुमारे १९५८ सालची गोष्ट असावी. मॉस्कोतल्या अमेरिकन दूतावासामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार होती. अचानक दूतावासाच्या वीजपुरवठा यंत्रणेत काही बिघाड झाला. तो दुरुस्त करण्यासाठी मॉस्को शहर वीजपुरवठा खात्याचे काही इलेक्ट्रिशियन्स अधिकृतपणे अमेरिकन दूतावासामध्ये आले. प्रत्यक्ष ते सामान्य इलेक्ट्रिशियन्स नसून ‘केजीबी’ या रशियन गुप्तचर खात्याचे अत्यंत हुशार असे इंजिनिअर्स होते आणि त्यांनीच तो बिघाड मुद्दाम घडवून आणलेला होता.
 
 
दुरुस्तीच्या निमित्ताने दूतावासात शिरलेल्या या लोकांनी, तिथल्या मुख्य कॉन्फरन्स सभागृहातल्या दोन खुर्चांच्या कोपर्‍यांमध्ये ढेकणाच्या आकाराचे ‘मायक्रोफोन्स’ बेमालुमपणे बसवून टाकले. तात्पर्य, कोणत्याही भिंतींच्या पलीकडे कानोसा घेणारी माणसं न बसवता, या ‘बम्स’ म्हणजे ढेकणाएवढ्या मायक्रोफोन्सच्या साहाय्याने केजीबी अधिकारी स्वत:च्या कचेरीत आरामात बसून अमेरिकन दूतावासातली ती महत्त्वाची बैठक ‘लाईव्ह’ ऐकू शकले. रशियन हेरखातं आपल्यावर कशी नजर ठेवून आहे, हे जनतेला सांगण्यासाठी अमेरिकन प्रचारयंत्रणेने हा किस्सा अगदी रंगवून सर्व प्रसारमाध्यमांमधून मांडला होता. पण म्हणजे, रशियन बदमाश होते आणि अमेरिकन्स मोठे सोवळे होते, असं अजिबात नाही. जी अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगात सर्वात अग्रेसर आहे, ती हेरगिरीच्या तंत्रात रशियाच्या मागे राहीलच कशी?
 
आता अशा स्थितीत, भारतातल्या एका बड्या वृत्तपत्राने चीन करीत असलेली हेरगिरी उघडकीला आणली आहे किंवा चीनच्या हेरगिरीची माहिती देऊन, आपण काहीतरी मोठाच पराक्रम केल्याचा आव आणला आहे. वास्तविक, भारतीय वायुदलाने अधिकृत परिपत्रक काढून आपल्या कर्मचार्‍यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चिनी बनावटीचे भ्रमणध्वनी वापरू नयेत, असं केव्हाच सांगितले होतं. ही २०१४ सालची गोष्ट आहे. जगातली सर्व सैन्यदलं आपला ‘डेटा’ इतरांनी पळवू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतच असतात. जगात केवळ शत्रुराष्ट्रंच एकमेकांवर हेरगिरी करतात, असं नसून मित्रराष्ट्रंही एकमेकांवर हेरगिरी करत असतात, ही वस्तुस्थिती आहे आणि असं करणं हे अपरिहार्य आहे. कारण, राजनीतीमध्ये शत्रू आणि मित्र हे कधीच कायमचे नसतात; ते सतत बदलतच असतात.
 
याचं फार मोठं उदाहरण भारताच्याच इतिहासात आहे. आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला हाताशी धरून प्रथम धनानंदाचं उन्मत्त राज्य उलथून पाडलं. प्रबळ असं मगध साम्राज्य हातात आल्यावर, त्यांचं मुख्य लक्ष्य होतं ते म्हणजे भारताच्या वायव्येकडे ठाण मांडून बसलेल्या परक्या, विदेशी ग्रीक सत्तेचा पराभव करून त्यांना भारतातून हाकलून देणं, या कार्यासाठी त्यांनी वायव्य भारतातला एक प्रबळ राजा पर्वतक यांच्याशी मैत्री केली, ‘युती’ केली म्हणा, हवं तर.
 
पुढे ग्रीकांचा साफ नि:पात झाला. भारत विदेशी आक्रमणापासून पूर्ण मुक्त झाला. ‘अधर्माचा क्षयो जाहला. आनंदवनभुवन जाहले.’ पण, आता पर्वतकाची महत्त्वाकांक्षा पालवली. तो सत्तेत आणखी वाटा मागू लागला. आचार्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, चाणक्य-चंद्रगुप्तांची राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा त्याला समजेना. त्याला फक्त सत्तेची भाषा कळत होती. आर्य चाणक्य हे राष्ट्रनिर्माते होते; ते भाबडे प्रवचनकार, विचारवंत नव्हते. त्यांंच्या तरबेज गुप्तहेरांकडून त्यांना पर्वतकाचे गुण आणि दोष दोन्ही माहीत झाले होते.
 
अत्यंत बलाढ्य असणारा पर्वतक हा स्त्रियांच्या बाबतीत ढिला आहे, हे त्यांना ठाऊक होतं. पुढचं काम सोपं होतं. पर्वतकाकडे एक विषकन्या पाठवण्यात आली. पर्वतकाचा निकाल लागला. आचार्यांनी त्याच्या राज्यावर त्याच्याच मुलाची स्थापना करून, मैत्री चालू ठेवली; अर्थातच स्वतःच्या म्हणजे मगध साम्राज्याला अनुकूल अशा अटींवर आणि मग इराणपासून पूर्व समुद्रापर्यंत एक महाशक्तिशाली असं मगध साम्राज्य उभं राहिलं; ज्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाही परकीय शक्तीची छाती झाली नाही पुढची कित्येक शतकं! याला म्हणतात राष्ट्रनिर्माण! आणि या राष्ट्रीय स्वार्थासाठी शत्रूंप्रमाणेच मित्रांच्या हालचालीही पाहाव्या लागतात.
 
आर्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथात सर्व राजकारणी लोकांना एक फार महत्त्वाचं पथ्य सांगून ठेवलं आहे - ‘स्त्रियः पानं च वर्जयेत्’ म्हणजे राजकारण्यांनी स्त्रिया आणि मद्यपान वर्ज्य करावे, टाळावे. घ्या! आमच्याकडचे राजकारणी म्हणतील, “अहो, हे जर वर्ज्य करायचं, तर मग राजकारणात पडायचं कशाला?” विनोदाचा भाग बाजूला ठेवू, पण राजकारणातच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रात ज्याला राष्ट्रासाठी, समाजासाठी काहीतरी दणदणीत काम उभं करायचंय, त्या प्रत्येकासाठी वरील सूत्र सार्वकालिक महत्त्वाचं आहे.
 
तर ते असो. अमेरिका आपल्या मित्रदेशांवर हेरगिरी करते हे फार प्रकर्षाने उघडकीला आलं, हे एडवर्ड स्नोडेन प्रकरणामुळे. अमेरिकन हेरखातं ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ किंवा ‘एनएसए’चा एक अधिकारी एडवर्ड स्नोडेन याने उघड केलं की, २०१० पासून आपण जगभरातली अनेक सरकारं आणि राजकीय पक्ष यांचे संदेश ‘टॅप’ करत होतो. अशा एकंदर १९३ जणांचे ९० कोटी ७० लाख संदेश आपल्या धारिकांमध्ये (फाईल्स) साठवून ठेवलेले आहेत. या १९३ मध्ये सर्वाधिक ‘टॅपिंग’ केलेले पाच देश आणि त्यांची संदेशसंख्या अशी- इराण : १० कोटी ४० लाख, पाकिस्तान : १० कोटी ३५ लाख, जॉर्डन : १० कोटी २७ लाख, इजिप्त : ७ कोटी ६० लाख आणि भारत : ६ कोटी ३० लाख.
 
फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्याकडे या मैत्रीपूर्ण हेरगिरीबद्दल कितीही नाराजी व्यक्त केली, तरी फ्रेंच गुप्तहेरांनी अमेरिकेवर नजर ठेवायला १९५८ पासूनच सुरुवात केली होती. चार्ल्स डि गॉल हा अत्यंत समर्थ असा नेता फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष असताना, त्याने फ्रेंच प्रतिगुप्तवार्ता खात्याचा प्रमुख जनरल पॉल ग्रॉसिन याला आदेश दिला की, अमेरिकेच्या तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक धोरणविषयक अद्ययावत बातम्या आपल्याला मिळायला हव्यात.
 
म्हणजे अमेरिका रशियाच्या सैनिकी आणि अवकाश संशोधनविषयक बातम्या मिळवण्यात गर्क असताना, फ्रान्स अमेरिकेच्या तंत्रज्ञानाच्या बातम्या मिळवत होता. १९६४ साली तर फ्रेंचहेरांनी कमालच केली. अमेरिकेचा त्यावेळचा उपपरराष्ट्रमंत्री जॉर्ज बॉल हा फ्रान्सच्या दौर्‍यावर होता. काही महत्त्वाच्या व्यापारी करारासाठी तो आलेला होता. तो हॉटेलच्या सभागृहात सत्कार समारंभात मग्न असताना फ्रेंच हेर त्याच्या खोलीत शिरले आणि त्यांनी त्याच्या एकूण एक कागदपत्रांची छायाचित्रे काढून घेतली. पुढे फ्रेंच हेर अलेक्झांद्र डि मारेंचे आणि पिअरे मारिआँ यांनी आपल्या आठवणींच्या पुस्तकांमध्ये असे आर्थिक, औद्योगिक हेरगिरीचे अनेक किस्से दिले आहेत.
 
तुम्हाला जर आठवत असेल, तर जनता पार्टी सरकारच्या नंतर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी आल्यावर योगेश माणेकलाल आणि कुमार नारायण या नावाच्या व्यक्तींना परकीयांसाठी हेरगिरी करणार्‍या आरोपाखाली अटक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. हे कोण इसम होते, ते कुणासाठी काम करत होते, त्यांचं पुढे काय झालं, हे आपल्याकडे नेहमीच दाबून टाकण्यात येतं.
१९९२ साली मिल्टन सोकोलर नावाच्या इसमाने अमेरिकेच्या आर्थिक आणि औद्योगिक संसदीय उपसमितीसमोर साक्ष देताना सांगितलं की, १९८५ साली अमेरिकन विमान उद्योगाला ‘झुंजी’ विमानांची इंजिनं बनवण्याचं, २० कोटी डॉलर्सचं कंत्राट भारताकडून मिळण्याची शक्यता होती. पण, अखेर ते कंत्राट फ्रान्सला मिळालं. आपण संधी गमावली.
 
आलं का लक्षात? योगेश माणेकलाल आणि कुमार नारायण उर्फ चित्तूर वेंकट नारायण कुणासाठी आणि कसली हेरगिरी करत होते ते? पण, मित्राने मित्रावर हेरगिरी केल्याचं आतापर्यंतचं सर्वात मोठं ज्ञात उदाहरण म्हणजे जोनाथन जे पोलार्डचं. पोलार्ड अमेरिकन संरक्षण खात्यात म्हणजे पेंटेगॉनमध्ये सामान्य ग्रंथपाल होता. पण, पठ्ठ्या इस्रायलच्या मोसादचा तरबेज हस्तक होता. अमेरिकन लष्कराच्या सिग्नल्स यंत्रणेची दहा खंड भरतील एवढी माहिती इस्रायलला पुरवल्यावर तो पकडला गेला.
 
पण, हे तर काहीच नाही. लंडनच्या ‘संडे टाईम्स’चा तेल अविवास्थित वार्ताहर उझी महनाईमी म्हणतो की, मोसादने अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे वैयक्तिक ई-मेल अकाऊंटसुद्धा यशस्वीरीत्या ‘हॅक’ केले होते. इतकंच नव्हे तर, मोसादने १९७४ पासून व्हाईट हाऊसमध्येही शिरकाव करून घेतला होता. जिमी कार्टर, रोनाल्ड रीगन, जॉर्ज बुश थोरले यांच्या कार्यकारी मंडळातले कोणकोणते लोक इस्रायलला अनुकूल किंवा प्रतिकूल आहेत, याचा खडान्खडा पत्ता मोसादला होता.
 
 
या कालखंडात अमेरिकेने सौदी अरेबियन लष्कराला अतिशय महत्त्वाची अशी ‘एअरबोर्न वॉर्निंग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टीम’ ही प्रणाली दिली. या व्यवहाराची संपूर्ण माहिती, इतकच नव्हे तर अमेरिकन तज्ज्ञ ही प्रणाली सौदीमध्ये कुठे कुठे उभी करत आहेत, याची इत्थंभूत माहिती मोसादला ताबडतोब मिळत होती. एकंदरच, प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान व कुशल मेंदू यांच्या जोरावर आता कुणालाही, कसलीही माहिती मिळवणं फारच सोपं झालं आहे. शत्रू आणि मित्र जर आपली माहिती मिळवत असतील, तर आपणही त्यांची मिळवलीच पाहिजे. आणि त्या माहितीवर आधारित खंबीर निर्णय घ्यायला हवेत!
 
@@AUTHORINFO_V1@@