सहयज्ञ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020   
Total Views |
Corona_1  H x W
 
 
 
आज देशाला सर्वाधिक गरज या ‘सहयज्ञा’ची आहे. ‘कलहयज्ञा’ची देशाला गरज नाही. लोकांना त्याचा वीट आलेला आहे. डोळ्यांना न दिसणार्‍या कोरोनाने आपल्याला दृष्टी देण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. आपणच आपल्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून घेतल्या आहेत, त्या काढून घेतल्या पाहिजेत आणि समाजशक्ती जागविण्याचा ‘सहयज्ञशक्ती’चा मार्ग आपण धरला पाहिजे.
 
 
साध्या डोळ्याने न दिसणार्‍या कोरोनाच्या जंतूने सर्व जगभर खळबळ माजविली आहे. भारतासहित सर्व देशात रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव दिसत नाही. मृत्युदरही चिंताजनक आहे. रोज यांची आकडेवारी विविध माध्यमांतून सांगितली जाते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युदरही सर्वाधिक आहे.
 
 
कोरोना विषयावरील राजकारण थोडे बाजूला ठेवू. शासन आपल्या परीने जे काही करता येण्यासारखे आहे, ते करीत आहे. जोपर्यंत कोरोनावर परिणामकारक औषध सापडत नाही, तोपर्यंत कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता कमी आहे. रोगाच्या भीतीची अस्वस्थता समाजात प्रचंड प्रमाणात आहे. एकमेकांशी संपर्क करण्याची भीती सर्वांच्या मनात असते. माणसाला माणसापासून दूर नेणारा हा विषाणू आहे. शाळा बंद आहेत, मुले घरी आहेत. हे वर्ष असेच जाईल. एक वर्ष मुले घरी राहिल्यामुळे या पिढीवर जे अनिष्ट परिणाम होतील, ते आणखीन काही वर्षांनी दिसायला लागतील. खेळणे, बागडणे, फिरणे, सर्व काही बंद आहे. असे आढळून येईल की, घरात बसूनच राहिल्यामुळे मुलांचे वजन दिसण्याइतके वाढू लागले आहे. लहान मुलांत चरबी वाढणे आरोग्याला चांगले नाही.
 
 
मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने पालकवर्ग अस्वस्थ आहे. रोगराईवर उपाय नाही, त्यामुळेही तो अस्वस्थ आहे. नोकरी-व्यवसायाची शाश्वती नाही हीदेखील एक मोठी अस्वस्थता आहे. याचे अनुभव पदोपदी जाणवत राहतात. कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्थेची गती अतिशय मंदावली आहे. नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे किंवा अन्य वाहने उपलब्ध नाहीत. उत्पादन थांबले आहे. उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. व्यापार थंडावलेला आहे. दुकानदार दुकाने उघडून बसत आहेत.
 
ज्या दुकानात महिन्यात हजार-दोन हजार ड्रेसेस विकले जातात, तिथे महिनाभरात विक्रीची आकडेवारी १०० पर्यंत आली आहे. अर्थव्यवस्थेची गती मंद झाली आहे, हे कुणा अर्थशास्त्रज्ञाने सांगण्याची गरज नाही. असे अर्थतज्ज्ञ देशात भरपूर आहेत. आकडेवारी त्यांना पाठ असते. असा अर्थशास्त्री अनेकवेळा एक भूमिका घेऊन आपले विचार मांडतो. आज जर सरकारविरुद्ध बोललो, तर उद्या जर नवीन सरकार आले तर आपली कुठे ना कुठे वर्णी लागेल, असा विचार करणारे काही जण आहेत आणि काही जण सरकारला अनुकूल बोललो, तर हे सरकार आपली दखल घेईल, असेही त्यांना वाटते. अशांचे विचार या ‘कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून द्यायचे’ किंवा ‘डोळ्यांनी वाचायचे आणि डोळे पुसून द्यायचे.’
 
 
आर्थिक अनिश्चितता देशातील प्रत्येक जण अनुभवतो आहे, त्यात कुणी नवीन सांगण्यासारखे नाही. ही अनिश्चितता उद्योग, व्यापार, सेवा उद्योग, या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने निर्माण झाली आहे. घरांची बांधकामे जवळजवळ बंद आहेत. म्हणून बांधकाम व्यवसायातील रोजगार संपले आहेत. आर्थिक क्षेत्रातील ही अनिश्चितता कोरोनाचे संकट आल्यामुळे निर्माण झाली आहे. असे संकट यापूर्वी अर्थव्यवस्थेने हाताळलेले नाही. त्यामुळे या संकटाशी यशस्वीपणे कसे लढता येईल, याचे ‘रेडिमेड’ उपाय हातात नाहीत. उद्या हे उपाय शोधले जातील. अर्थव्यवस्था समाजाची प्राणशक्ती असते. तिला गतिमान ठेवल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. शासन आपल्या परीने प्रयत्न करील. त्याला जनतेचा सहयोग आणि सहभाग लागेल.
आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, या विषयांच्या बरोबर या काळात चाललेले पक्षीय राजकारण हासुद्धा जनतेच्या चिंतेचा विषय झालेला आहे. असंख्य लोकांना खायला मिळत नाही. आजारी पडला तर त्यासाठी पैसा कुठून आणायचा, मुलांचे शिक्षण झाले नाही, तर त्यांचे भवितव्य काय, असे जीवघेणे प्रश्न असताना राजकारणी लोकांना राजकारण करण्यातच आनंद वाटतो आहे.
 
 
मराठा आरक्षण, कंगना प्रकरण, निवृत्त सैनिक अधिकार्‍याला मारहाण, हे झाले महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रश्न. उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक असे प्रत्येक राज्याचे त्यांचे त्यांचे राजकीय प्रश्न आहेत. जनतेला आता ‘राजकारण नको’ आहे. जनतेला खर्‍या अर्थाने ‘देशकारण हवे’ आहे, ‘राष्ट्रकारण हवे’ आहे. संकट इतके मोठे आहे की, या संकटाशी मुकाबला राजकीय भांडणे करून करता येणार नाही. रोजगारांची निर्मिती, उद्योगधंद्याची चांगल्या प्रकारे सुरुवात, समृद्ध व्यापार, मुलांच्या शाळा आणि महाविद्यालये, असे सगळे विषय सर्वांनी मिळून, एकत्र बसून उपाययोजना करून सोडविण्याच्या आहेत. मात्र, दुर्दैवाने या सर्व विषयांवर राजकारणच चाललेले दिसते.
 
 
एक असाहाय्यतेची भावना समाजात घर करू लागलेली आहे. आपल्याला कुणी वाली राहिलेला नाही. आधारासाठी ज्याच्याकडे बघावे, असे मायबाप सरकार फार कमी अनुभवायला येते. ही परिस्थिती चांगली नाही. समाज जगतो तो विश्वासाच्या वातावरणावर. कोरोनाने तर माणसामाणसांत अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. ज्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था आहेत, त्यांच्याविषयी लोकविश्वासाला तडे जाऊ लागले आहेत. राज्य करणार्‍या सर्वांनी मग ते केंद्रातील राज्य असो की, राज्यातील प्रशासन असो, या सर्वांनी याचा विचार केला पाहिजे.
 
विचाराची एक दिशा आपण आपल्या जीवनदर्शनात शोधली पाहिजे. आपले दर्शन समाजशक्तीच्या आधारे आपण आपले रक्षण करण्याची शिकवण देते. राज्यसत्तेवर विसंबून राहणे किंवा तिच्या पूर्णपणे अधीन होऊन राहणे, असे आपले दर्शन नाही. मनुष्याने समाज म्हणून जगताना कसा व्यवहार केला पाहिजे, याचे अतिशय सुंदर मार्गदर्शन ‘भगवद्गीते’च्या तिसर्‍या अध्यायात केले आहे. या अध्यायाचे ‘गीताई’तील चार श्लोक असे आहेत - (पूज्य विनोबांच्या १२५ व्या जयंतीचे हे वर्ष आहे. यानिमित्ताने तेवढेच त्यांचे अल्पस्मरण होईल.)
 
१०. पूर्वीं प्रजेसवें ब्रह्मा यज्ञ निर्मूनि बोलिला
पावा उत्कर्ष यज्ञानें हा तुम्हां काम-धेनु चि
११. रक्षा देवांस यज्ञानें तुम्हां रक्षोत देव ते
एकमेकांस रक्षूनि पावा कल्याण सर्व हि
१२. यज्ञ-तुष्ट तुम्हां देव भोग देतील वांछित
त्यांचें त्यांस न देतां जो खाय तो एक चोर चि।
१३. यज्ञांत उरलें खाती संत ते दोष जाळिती
रांधिती आपुल्यासाठीं पापी ते पाप भक्षिती॥
 
या श्लोकांवर आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात अतिशय उत्कृष्ट भाष्य Bhagavad Gita Modern Reading and Scientific Study - C. Radhakrishnan यांनी या पुस्तकात केले आहे. लेखक म्हणतो की, या विश्वाचा निर्माता कुणी हुकूमशाह नाही. या निर्मात्याने पर्वत, प्राणी, वनस्पती, मानव, हे सर्व निर्माण केलेले आहे आणि या सर्वांना एकमेकांना पूरक बनविलेले आहे. एकावर दुसर्‍याचे जीवन अवलंबून आहे. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, पर्वतांनी ढग अडविले जातात, पाऊस पडतो आणि सर्व जीवनचक्र सुरू राहते. या सृष्टिचक्रातील प्रत्येकाची कृती दुसर्‍याचे जीवन रक्षण करणारीच असते. याला आजच्या भाषेत ‘बायोस्पीयर’ म्हणतात. ‘भगवद्गीते’तील याचा शब्द आहे, ‘सहयज्ञ’ म्हणजे सर्वांनी मिळून करण्याचा यज्ञ. या ‘सहयज्ञा’चा विस्तार वर दिलेल्या श्लोकांमध्ये आहे. यावरील संपूर्ण भाष्य वृत्तपत्रीय लेखाच्या मर्यादेत न बसणारे आहे. असे एकमेकांना पूरक बनून जे कर्म करायचे त्यांना ‘सहयज्ञ’ म्हटले जाते- सर्वांनी मिळून करण्याचे काम.
 
तेराव्या श्लोकात सांगितले आहे की, असा यज्ञ करून जे प्राप्त होईल, त्याचेच भक्षण करावे. येथे भक्षण म्हणजे केवळ ‘खाणे’ असा अर्थ नाही, तर जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढेच ग्रहण करावे आणि पुढे असे म्हटले की, जो केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवितो, तो पापाचे भक्षण करीत असतो. येथे ‘अन्न’ याचा अर्थ ‘खाण्याचे पदार्थ’ एवढ्यापुरता सीमित नाही. समाजगाडा चालविण्यासाठी उद्योग, व्यवसाय, व्यापार, आरोग्यसेवा आणि वेगवेगळ्या सेवा, ही सगळी जी कर्मे आहेत, ती केवळ स्वार्थ भावनेने करायची नाहीत, तर आपण सर्वजण पूरक असणार्‍या रचनेत राहत आहोत, हे लक्षात घेऊन कर्मे केली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा न्यायोचित वाटा मिळाला पाहिजे, याला ‘सहयज्ञ’ म्हटले गेले. आज समाजाला लुटून खाणारे स्वतःचे पापच खातात.
 
आज देशाला सर्वाधिक गरज या ‘सहयज्ञा’ची आहे. ‘कलहयज्ञा’ची देशाला गरज नाही. लोकांना त्याचा वीट आलेला आहे. डोळ्यांना न दिसणार्‍या कोरोनाने आपल्याला दृष्टी देण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. आपणच आपल्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून घेतल्या आहेत, त्या काढून घेतल्या पाहिजेत आणि समाजशक्ती जागविण्याचा ‘सहयज्ञशक्ती’चा मार्ग आपण धरला पाहिजे. कोरोनाच्या संकटातून कुठलीही दैवी शक्ती आपल्याला वाचविणार नाही. शासनव्यवस्था कितीही शक्तिमान असली तरी ती कोरोनाला हरवू शकत नाही. त्याचा मुकाबला ‘समाज’ म्हणून आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व एक आहोत, एकात्म आहोत, परस्परपूरक आहोत, हा भाव जागवावा लागेल.
 
अभय बंग यांनी विनोबा भावे यांच्यावर ‘सुळी दिलेला संत’ हा लेख लिहिलेला आहे. त्यातील काही वाक्ये अशी आहेत - ‘समता म्हणजे इक्वालिटी आणि साम्य म्हणजे युनिटी, एकरूपता.’ विनोबा त्यांच्या साम्यसूत्रात पहिलंच सूत्र सांगतात, ‘अभिधेयम्ं परम् साम्यम्.’ सर्वोच्च ध्येय काय आहे, तर परम साम्य. पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू समान नाही, तर एकच आहोत. समता तर हवीच. पण, ते अपुरं ध्येय. म्हणून विनोबा म्हणतात, “राजकीय, सामाजिक, आर्थिक समता हवीच आहे. पण, या तिन्ही समता जगात तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात, स्थिर होऊ शकतात, जेव्हा हृदयामध्ये मानसिक समता असेल आणि त्याचा आधार आध्यात्मिक साम्य हाच असू शकतो.” ही समता आपल्याला जगावी लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@