न्यूट्रिशन्समधला विशाल ‘एक्झॉल्टिक’ ब्रॅण्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020   
Total Views |


Vishal Surve_1  


विशालच्या उत्तम व्यक्तिमत्त्वामुळे त्याला काही उत्पादनांच्या जाहिरातीसाठी विचारणा झाली. काही उत्पादनांसाठी त्याने मॉडेलिंगदेखील केले. आपण इतर ब्रॅण्डसाठी काम करतो, मग आपला ब्रॅण्ड असा कधी निर्माण होणार, याच विचारातून आकारास आला ‘एक्झॉल्टिक न्यूट्रिशन’ हा न्यूट्रिशनमधला ब्रॅण्ड. २०१७ साली त्याने हा ब्रॅण्ड बाजारपेठेत आणला.
 
 
क्रिकेट हा भारतामध्ये धर्मच समजला जातो. भारतातल्या अगदी खेडोपाडी पोहोचलेला असा हा खेळ. मूल जरा पाऊल टाकायला लागलं की त्याच्या हातात पहिलं खेळणं जे दिलं जातं ते क्रिकेट बॉल आणि बॅट. मुंबईमध्ये तर अगदी गल्लीबोळात हा खेळ व्यापलेला आहे. मुंबईमध्ये वडापाव आणि क्रिकेट माहीत नसणारा असा कोणीही मुंबईकर असूच शकत नाही. याविषयी कोणाचंही दूमत असणार नाही. असाच तो पक्का मुंबईकर. लहानपणापासून क्रिकेटची आवड. क्रिकेट खेळायला लागला. अगदी सी. के. नायडू ट्रॉफीपर्यंत पोहोचला. पुढे जायची संधी होती. पण, एका दुखापतीमुळे क्रिकेटच्या करिअरमधून माघार घ्यावी लागली. एक चांगला जलदगती गोलंदाज म्हणून आता कुठे त्याचं नाव होत होतं. मात्र, त्याने हार मानली नाही. क्रिकेटचा ट्रॅक बदलून तो उद्योगाच्या ट्रॅकवर आला. ‘श्रेड्झ न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने त्याने कंपनी सुरु केली. ‘न्यूट्रिशन एक्झॉल्टिक’ नावाचा ब्रॅण्ड त्याने प्रस्थापित केला. हा तरुण म्हणजेच विशाल सुर्वे होय.
 
विशालचं प्राथमिक शालेय शिक्षण विक्रोळीच्या विकास हायस्कूलमध्ये पार पडलं. पुढे माध्यमिक शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालं. याच शाळेतून विशाल क्रिकेटचे धडे गिरवू लागला. जलदगती गोलंदाज म्हणून त्याचा चांगलाच दबदबा होता. मुंबई क्रिकेटमध्ये संधी मिळणार नाही, हे ओळखून तो गोव्यातर्फे खेळू लागला. २५ वर्षे वयोगटाखालील खेळाडूंमध्ये त्याची निवड झाली होती. सी. के. नायडू ट्रॉफीसाठी तो खेळलादेखील. ‘बीसीसीआय’तर्फे २०१२ मध्ये जलदगती गोलंदाजांसाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी गोवा राज्यातर्फे जलदगती गोलंदाज म्हणून विशालची एकमेव निवड करण्यात आली. भारतासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असं वाटत असताना त्याला स्नायूंच्या दुखापतीने ग्रासले. शेवटी त्याने क्रिकेटमधून अल्पविराम घेण्याचा निर्णय घेतला.
 
दरम्यान त्याने परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातून संगणकशास्त्रातून बी.एस्सी ही पदवी प्राप्त केली. २०१४ मध्ये क्रिकेटमध्ये थांबल्यानंतर त्याने एका आयटी कंपनीत नोकरी केली. क्रिकेट खेळत असताना काही कंपन्या न्यूट्रिशन पावडर विकण्यास यायच्या हे विशालने पाहिलं होतं. मात्र, ही पावडर बहुतांश रासायनिक प्रक्रियेपासून तयार केलेली असे. त्यामुळे त्याचे दुष्परिणामसुद्धा असायचे. काही वेळेस ही पावडर एवढी खर्चिक असे की, सामान्य घरातून आलेल्या खेळाडूला ती परवडत नसे. खेळण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते. न्यूट्रिशन पावडर अशा ऊर्जेची आपण जर रसायनविरहीत आणि कोणत्याही सर्वसाधारण घरातील खेळाडूला परवडेल अशी न्यूट्रिशन पावडर दिली तर... त्याने संशोधन करुन न्यूट्रिशन पावडर तयार केली. आपल्या वर्तुळातील खेळाडूंना चाचणीसाठी ती पावडर दिली. अनेकांच्या पसंतीस ती पावडर उतरली. विशालच्या उत्तम व्यक्तिमत्त्वामुळे त्याला काही उत्पादनांच्या जाहिरातीसाठी विचारणा झाली. काही उत्पादनांसाठी त्याने मॉडेलिंगदेखील केले. आपण इतर ब्रॅण्डसाठी काम करतो, मग आपला ब्रॅण्ड असा कधी निर्माण होणार, याच विचारातून आकारास आला ‘एक्झॉल्टिक न्यूट्रिशन’ हा न्यूट्रिशनमधला ब्रॅण्ड.
 


२०१७ साली त्याने हा ब्रॅण्ड बाजारपेठेत आणला. ‘व्हेय’ म्हणजे दुधापासून तयार केलेला प्रोटिन्सचा एक घटक. ‘एक्झॉल्टिक न्यूट्रिशन व्हेय प्रोटिन’, ‘व्हेय प्रोटिन ब्लेन्ड’, ‘व्हेय प्रोटिन आयसोलेट’ असे प्रकार उपलब्ध आहेत. ‘वर्ल्ड एन्टी डोपिंग एजन्सी’ अर्थात ‘वाडा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच ही उत्पादने तयार केली जातात. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी या उत्पादनाचा लाभ घेतला आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू इकबाल अब्दुल्लाह, महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार नौशाद शेख, रणजी क्रिकेटपटू निकित धुमाळ, ‘अंडर १९ वर्ल्डकप’ खेळलेला करण कायला, टेबल टेनिस खेळामध्ये अनेकवेळा राष्ट्रीय विजेती ठरलेली मनोमिता, रेल्वेचा क्रिकेटपटू रोहन भोसले, सात वेळा शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस्टर गोवा’ ठरलेला अभिजित नाईक हे सारे ‘एक्झॉल्टिक’चे चाहते आहेत. भविष्यात बाजारपेठेत ‘प्लान्ट प्रोटिन’ आणण्याचा विशाल सुर्वेंचा मानस आहे. ‘श्रेड्झ न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड’ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष २५ ते ३० लोकांना रोजगार देते. अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या कंपनीची उलाढाल अर्ध्या कोटींहून अधिक आहे. सध्या हे उत्पादन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवरही उपलब्ध आहे.
 

या सगळ्या प्रवासात विशालला त्याचे वडील प्रकाश सुर्वे, आई संध्या सुर्वे आणि बहिणीने मोलाची साथ दिली. क्रिकेट खेळणारे अनेकजण असतात, मात्र या क्रिकेटच्या पार्श्वभूमीचा करिअर म्हणून विचार करणारे फार कमी असतात. त्यातल्या त्यात स्वत:चा उद्योग उभारणारे तर दुर्मीळच! विशाल सुर्वे येथेच उजवा ठरला. भविष्यात ‘एक्झॉल्टिक’ची जाहिरात करताना टॉपचे भारतीय खेळाडू निश्चितच दिसतील. विशाल सुर्वेचा हा ब्रॅण्ड जागतिक स्तरावर विशाल व्हावा, हीच इच्छा.
 
 

@@AUTHORINFO_V1@@