पालघर (नवीन पाटील) : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह सहाय्यक फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. याआधीच त्यांना निलंबित करण्यात आले होते.
३० ऑगस्ट २०२० रोजी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी या तिघांच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत. आनंदराव काळे यांनी घटनास्थळावर पोहोचल्यानंतर साधूंना वाचवण्याचे कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. ते पोलीस वाहनामध्ये बसून राहिले. तर रवी साळूंके यांनी स्वतःचा हात सोडवून घेत साधूला जमावाच्या अधीन केले होते. पोलीसांसमोर घडलेल्या साधूंच्या हत्याकांडामुळे देशभर महाराष्ट्र पोलीसांची नाचक्की झाली होती. शिवाय याच प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिक्षक सक्तीच्या रजेवर आहेत. तसेच याप्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.