राजस्थान सरकार कसे वाचवायचे, याच्या काळजीत पडलेल्या काँग्रेस पक्षास जो पक्षांतर्गत वाद उफाळून आला, त्यामुळे आणखी काळजीत टाकले आहे. पक्षातील तरुण नेत्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवला.
सध्या काँग्रेस पक्ष आपल्या पक्षातील मतभेद कसे मिटवावेत, अशा विवंचनेत असतानाच दुसरीकडे, आपल्या ताब्यातील राजस्थान सरकार कसे वाचविता येईल, या काळजीतही आहे. गेल्या २५ दिवसांपासून राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंग कायम असून त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यामध्ये आपणास स्वारस्य नसल्याचे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले असतानाही भाजप सरकार पाडण्याच्या हालचाली करीत असल्याचे नेहमीच्या पठडीतील आरोप काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे चिरंजीव सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारवर टांगती तलवार आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये जो पेच निर्माण झाला आहे, तो त्या पक्षातील अंतर्गत वादातून निर्माण झाला असून त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, असे भाजपचे नेते भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे.
राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप काँग्रेसची सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्या दोघांनी केला आहे. मात्र, या आरोपांचे भूपेंद्र यादव यांनी खंडन केले आहे. अशोक गेहलोत यांच्या अकार्यक्षम सरकारने जनतेचा विश्वास गमविला असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षातील नाराज आमदारांना सांभाळता न आल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकविला की, त्यास भाजपला जबाबदार धरायचे, ही काँग्रेची नेहमीचीच खोड आहे.
राजस्थानमधील असंतोषाचे वणव्यात रूपांतर होऊ नये म्हणून गेहलोत यांनी आपल्या पाठीराख्यांना जैसलमेर येथे ठेवले आहे. तेथील हॉटेल्समधून राज्याचे मंत्री कारभार करीत आहेत. राजधानीचे शहर जयपूर असताना आपल्या समर्थकांना दूर ठेवण्यामागील कारण स्पष्ट आहे. गेहलोत यांना आपले सरकार टिकेल की नाही, याची अजून खात्री वाटत नाही. राजस्थान सरकारच्या मंत्र्यांनी जैसलमेरमधील हॉटेलमध्ये जो मुक्काम ठोकला आहे, त्यावर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. सरकारने जैसलमेरमध्ये मुक्काम ठोकल्याचे लक्षात घेऊन भाजपने ‘बाडे में सरकार...’ ही मोहीम सुरू करून सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री महोदय, पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडा, जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करा. आपल्या सरकारने जी खोटी आश्वासने दिली आहेत ती लक्षात घेऊन जनतेने आपणास आधीच अकार्यक्षम ठरविले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे.
पण, इतके होऊनही काँग्रेसला शहाणपण येताना दिसत नाही. आपल्या चुका सुधारण्याऐवजी भाजपवर आरोप करणे त्या पक्षाने सुरू ठेवले आहे. जनतेने सत्याची कास धरावी, भाजपला असा धडा शिकवावा की, भाजप पुन्हा विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. बंडखोरी केली ती सचिन पायलट यांनी. सचिन पायलट आपण भाजपमध्ये जाणार नाहीत, असे म्हणत आहेत. तरीही अशोक गेहलोत जे आरोप करीत आहेत, त्यास ‘चोराच्या उलट्या बोंबा’ नाही तर काय म्हणायचे? राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार मौजमस्तीत, मेजवान्या झोडत, अंतांक्षरी खेळत, चित्रपट पाहत आणि दुसर्यांच्या चुका काढण्यात व्यग्र असल्याचा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे.
दरम्यान, आपले सरकार पूर्णपणे सुरक्षित असून, येत्या १४ ऑगस्ट रोजी आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी सचिन पायलट यांना चुचकारण्याचे गेहलोत यांचे प्रयत्न सुरू आहेत. सचिन पायलट यांनी चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केले आहे. पायलट यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडल्यानंतरच त्यांच्यासमवेत पुढची चर्चा सुरू होऊ शकते, असेही सूरजेवाला यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षातील १९ आमदारांनी बंड केल्याने गेहलोत सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याबद्दल या बंडखोर आमदारांना ‘कारणे दाखवा’ नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. एकंदरच अशोक गेहलोत सरकारवर सध्या टांगती तलवार आहे. आपल्यामागे बहुमत असल्याचा दावा करणारे सरकार त्यामध्ये यशस्वी होते की नाही, हे येत्या १४ ऑगस्ट रोजी दिसून येणार आहे.
राजस्थान सरकार कसे वाचवायचे, याच्या काळजीत पडलेल्या काँग्रेस पक्षास जो पक्षांतर्गत वाद उफाळून आला, त्यामुळे आणखी काळजीत टाकले आहे. पक्षातील तरुण नेत्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवला. ज्यांनी असे आरोप केले ते माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याने या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्यातून मनमोहन सिंग सरकारच्या समर्थनार्थ आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर आणि मिलिंद देवरा हे नेते पुढे आले. त्यातून समर्थक आणि विरोधक यांच्यात ‘ट्विटर युद्ध’ सुरू झाल्याचे जनतेला पाहावयास मिळाले. दरम्यान, हा ‘ट्विटर, ट्विटर’चा खेळ त्वरित थांबविण्यात यावा, असे आवाहन पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी उभय गटांना केले आहे. आपली मते पक्षाच्या व्यासपीठावर मांडली जावीत, समाजमाध्यमांवर त्यांची चर्चा होऊ नये, असेही सूरजेवाला यांनी दोन्ही बाजूंना सांगितले. पक्षातील असंतोष असा चव्हाट्यावर आल्याने त्यावर पांघरूण घालण्यासाठी काँग्रेसला बरीच सारवासारव करावी लागली, हे या निमित्ताने दिसून आले. एकीकडे राजस्थान सरकार वाचविण्यासाठी आणि दुसरीकडे पक्षातील जो वाद चव्हाट्यावर मांडला, त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाला सध्या तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.