
रियाचे जुने व्हॉट्सअॅप चॅट आले समोर; नार्को चाचणी होण्याची शक्यता!
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची रोज एक नवी बाजू समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती. या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची मदत मागितली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे जुने व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत. यात रियाने ड्रग्जच्या कथित वापराबद्दल बातचीत केल्याचे दिसते आहे. ज्यामध्ये रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया सहा नावाच्या व्यक्तीने रियाला ‘चहा किंवा पाण्यात ४ थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला ३०-४० मिनिटे दे,’ असे मेसेज केले आहेत.
एका कथित चॅटमध्ये रिया ही गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, ‘हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला’, या मेसेजनंतर ‘आपल्याकडे एमडी आहे का?’, अशी विचारणा रियाने केली. ८ मार्च २०१७ रोजी तिने हा मेसेज केला होता.
दुसर्या संभाषणात, रियाच्या फोनमध्ये ‘मिरांडा सुशी’ म्हणून सेव्ह केलेल्या नंबरवरुन रियाला मेसेज आला आहे ‘हाय रिया, स्टफ जवळजवळ संपला आहे.’ त्यानंतर मिरांडा रियाला विचारतो ‘शोविकच्या मित्राकडून आपण ते घ्यायला पाहिजे का? पण त्याच्याकडे नुसतेच हॅश अँड बड आहे.’ या संवादात सुशांतची मॅनेजर श्रुतीच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे. मृत्यू प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो या प्रकरणात चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे.