दार उघड उद्धवा, दार उघड!

    26-Aug-2020
Total Views |
tushar bhosle_1 &nbs


मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी शासनाचे घंटानंदाने कान उघडणार : आचार्य तुषार भोसले


मुंबई : केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी करूनही बंद असलेली महाराष्ट्रातील सर्व मंदिरे सुरू करण्यासाठी विविध धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी घंटानाद करण्यात येणार आहे. राज्य शासनाचे प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांना आर्त साद घालण्यात येणार आहे.


केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, मांस, मदिरा चालु झाले; परंतु देवस्थाने मात्र बंद आहेत. "पुनश्च हरि ओम" च्या नावाखाली सर्व व्यवहार सुरु झाले, पण "हरि"ला मात्र लॉक करुन ठेवले आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे दारु पिणारे आनंदात फिरत आहेत, तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद करण्यात येणार आहे, असे आंदोलन संयोजक आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.


अनेक वेळा मागणी करुनही महाराष्ट्र सरकार देवस्थाने सुरु करण्याची परवानगी देत नाही, यासंबंधी विचार- विनिमय करण्यासाठी मंगळवारी (२५ ऑगस्ट) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि विविध पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांची आभासी बैठक झाली.







डॉ. सुरेश हावरे (अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान, शिर्डी), महेश जाधव (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती), ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर), अतुल भोसले (माजी अध्यक्ष,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर), सुमंत घैसास (विश्वस्त, श्रीसिद्धिविनायक मंदिर, मुंबई), खा. जयसिद्धेश्वर महास्वामीजी (विरशैव लिंगायत संप्रदाय), ह.भ.प.श्री शिवाजी महाराज मोरे (विश्वस्त, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर), ह.भ.प.श्री. प्रकाश महाराज जवंजाळ (विश्वस्त, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर), ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.वारकरी मंडळ), महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (कोषाध्यक्ष, अ.भा. संत समिती), पंडित सतिष शंकर शुक्ल (राष्ट्रीय उपाध्यक्ष,अ.भा. पुरोहित संघ), सुदर्शन महाराज कपाटे (प्रतिनिधी: महानुभाव पंथ), गुरुमुख जगवानी (राष्ट्रीय प्रमुख, सिंधी ग्लोबल ट्रस्ट), गुरुप्रितसिंग सोखी (प्रतिनिधी, हुजूर साहेब गुरुद्वारा, नांदेड), भुषण कासलीवाल (प्रतिनिधी, जैन संघटना) आदी देवस्थानचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.


गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे भाविक समाज मानसिकदृष्या खचलेला आहे. या समाजाला आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात देवस्थाने मात्र बंद आहेत.


"राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, महाराष्ट्रातले मविआ सरकार ती अजूनही मान्य करत नाही. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार"ला इशारा देण्यासाठी २९ ऑगस्ट २०२० रोजी, सकाळी ११ वाजता देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर "दार उघड उद्धवा दार उघड" अशी आर्त हाक देत "घंटानाद आंदोलन" करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची भाविक जनता, विविध धार्मिक-आध्यात्मिक संस्था, संघटना, विविध देवस्थानांचे विश्वस्त, विविध संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या पवित्र घंटानाद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनाचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121