नवी दिल्ली : पालघरच्या गडचिंचले गावात कट रचून जमावाने दोन साधूंची हत्या केली या प्रकरणाचा तपास पालघर पोलीसांकडून सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी आखाडा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या हत्येचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर आता पालघरमध्ये सांधूंच्या हत्येचा तपासही ज्या गतीने सुरू आहे, त्यावर आखाडा परिषदेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, 'पोलीसांनी सुशांतच्या प्रकरणात पुरावे समोर असूनही कारवाई केली नाही म्हणून हा तपास सीबीआयकडे गेला.'
पालघर प्रकरणातही अशाच प्रकारचा हलगर्जीपणा केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. साधूंच्या हत्येनंतर आखाडा परिषदेचा ठाकरे सरकारवरचा विश्वास उडाला होता. सुशांत सिंह प्रकरणात जे काही झाले त्यावरून तर आता पालघर हत्या प्रकरणा जास्त काळ ठाकरे सरकारच्या अंतर्गत ठेवण्याची आमची तयारी नाही, असेही महंत म्हणाले. या संदर्भात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पत्राद्वारे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणी तपास लवकर सीबीआयकडे जावा यासाठी पाच सदस्यांची समिती पंतप्रधानांची भेट घेणार आहे.
तरीही ठाकरे सरकारने या प्रकरणी सीबीआयकडे तपास वर्ग केला नाही तर आमची सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात ठाकरे सरकारने ज्या प्रमाणे हलगर्जीपणा दाखवण्यात आला त्याच प्रमाणे पालघर हत्याकांडातील दोषींना सजा ठोठावण्याचे काम करण्यास ठाकरे सरकार असमर्थ आहे, अशी टीकाही आखाडा परिषदेने केली आहे.