‘स्पेस-एक्स’च्या या ‘क्रू-ड्रॅगन’ मोहिमेमुळे खासगी कंपनीच्या मदतीने अवकाश संशोधनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. भविष्यात अवकाश पर्यटन सुरू करण्याच्या दृष्टीनेही या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. त्याचा या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...
‘स्पेस-एक्स’ या अमेरिकी कंपनीने राबविलेल्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेअंतर्गत ‘नासा’चे दोघे अवकाशवीर रॉबर्ट लुईस बेंकन व डग्लस गेलार्ड हर्ले यांनी दि. ३१ मे २०२० च्या रात्री १२ वाजून ५२ मिनिटांनी केनेडी अवकाश केंद्रावरून ‘फाल्कन-९’चे यशस्वी उड्डाण केले. रॉकेटपासून विलग झाल्यावर १९ तासांच्या प्रवासानंतर ‘क्रू-ड्रॅगन’ ही अवकाशकुपी या दोन्ही अवकाशवीरांसह इंटरनॅशनल स्पेस स्टेशनजवळ पोहोचली. भारतीय वेळेनुसार त्यावेळी रविवारी रात्रीचे ८ वाजले होते. सुमारे तासाभरानंतर दोघेही अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये यशस्वीपणे दाखल झाले.‘नासा’चे स्पेस शटल प्रोग्राम २०११मध्ये अमेरिकन अध्यक्षांनी बंद केल्यावर गेली नऊ वर्षे अमेरिकेच्या जमिनीवरून मानवी अवकाश मोहिमेचे उड्डाण झाले नव्हते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०२० मधील होणारी ‘नासा’ची चांद्रमोहीमही रद्द केली होती. कारण, या मोहिमांचा खर्च फार होत होता. ‘स्पेस-एक्स’च्या या ‘क्रू-ड्रॅगन’ मोहिमेमुळे खासगी कंपनीच्या मदतीने अवकाश संशोधनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. भविष्यात अवकाश पर्यटन सुरू करण्याच्या दृष्टीनेही या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
रॉकेट ‘फाल्कन-९’ व ‘ड्रॅगन-२’ची अवकाशकुपी
‘स्पेस-एक्स’च्या रॉकेट ‘फाल्कन-९’ची अनेक विविध रुपे आहेत, पण त्यापैकी ‘ब्लॉक-५’ हे सध्याचे सर्वाधिक क्षमतेचे रूप आहे. त्याची जमिनीलगतच्या कक्षेत १५,६००किग्रॅ वजन वाहून नेण्याची क्षमता असून भूस्थिर कक्षेकडे ५,५०० किग्रॅ वजनाचा उपग्रह ते पाठवू शकते. या रॉकेटची आतापर्यंत २८ यशस्वी उड्डाणे झाली आहेत. ‘स्पेस एक्स’ने विकसित केलेली ‘ड्रॅगन-२’ ही अवकाशकुपी पुनर्वापर करण्याजोगी आहे. या कुपीची एका वेळेस सात जणांना अंतराळात वाहून नेण्याची क्षमता आहे. या कुपीचा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अवकाशवीरांची ने-आण करण्यासाठी वापर केला जाणार आहे. रॉकेटपासून विलग झाल्यावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडले जाणे, तसेच स्पेस स्टेशनपासून विलग होऊन जमिनीवर परतण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. काही आणीबाणीच्या प्रसंगी अवकाशवीर ही कुपी मॅन्युअल पद्धतीने पण चालवू शकणार आहेत.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन
अवकाश संशोधनाचा उपयोग विज्ञान व तंत्रज्ञान विकासाच्या आधारे मानवी उत्कर्षाकरिता करण्यासाठी अवकाश स्थानकांची उभारणी करणे, ही कामे क्षमता असलेल्या अमेरिका, रशिया, जपान, युरोपियन युनियन, कॅनडा या देशांनी मिळून केलेली आहेत. या स्थानकासाठी पहिले उड्डाण २१ वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर, १९९८ साली झाले होते. या स्थानकावर गुरुत्वाकर्षणरहित (जवळ जवळ शून्य गुरुत्व स्थितीत) अनेक शास्त्रीय प्रयोग करण्यात आले. त्यांचे निष्कर्ष तपासून बघितले जात आहेत. मग ते भौतिकशास्त्र, धातूशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र इत्यादीशी निगडित आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध औषधांचा विकास करणे, अंतराळात वनस्पती उगवतात का त्यासंबंधी प्रयोग करणे इत्यादी अनेकविध अभ्यास यातून करता येतील. सध्या विश्वात हे एकच इंटरनॅशनल अवकाश स्थानक पृथ्वीभोवती फिरते आहे व ते जमिनीपासून ४०० किमी अंतरावर आहे. चांद्रमोहीम वा मंगळ मोहिमेकरिता वा दुसर्या कुठल्याही ग्रहाच्या मोहिमेकरिता या इंटरनॅशनल स्पेस स्थानकाचा उपयोग होऊ शकेल. या स्थानकावरून गेल्या २० वर्षांत २००मोहिमा करण्यात आल्या. काही मोहिमांमध्ये नवीन प्रयोग करण्यात आले, तर काही मोहिमा या स्थानकाच्या डागडुजीकरिता होत्या. काही मानवरहित मोहिमाही पार पडल्या. १९८१ ते २०११पर्यंतच्या ३० वर्षांत स्पेस शटल प्रोग्राम करताना पाच स्पेसशिपच्या मदतीने ‘नासा’ने १३५ अवकाशयात्रेकरिता व अंतराळ स्पेस स्थानकाकरिता मोहिमा केल्या. या पाच स्पेसशिपपैकी दोन स्पेसशिप चॅलेंजर व कोलंबिया १९८६ व २००३मध्ये अपघातात जळून गेल्या व त्यात सात अवकाशवीरांचा अंत झाला. (भारतातील कल्पना चावला यांना २००३मध्ये तेव्हाच वीरमरण आले.)
जरी २०११पासून ‘नासा’ने अंतराळातील कार्यक्रमांना बंदी घातली होती, तरी त्यांचा प्रवास रशियाच्या मदतीने सुरूच होता. अंतराळ स्थानकावर रसद पाठविणे वा तेथे अवकाशवीर पाठविणे इत्यादी कामे सुरूच होती. पण, नजीकच्या काळात ही कामे खूप खर्चिक होऊ लागली. रशियाने या प्रवासाची किंमत वाढविली. ‘नासा’ रशियाला प्रत्येक फेरीला कोटी-कोटी डॉलर मोजत होते. परंतु, या आधीपासूनच अमेरिकेत अंतराळ मोहिमा व संशोधनाचा खासगी संस्थांकडून दुसरा अध्याय सुरू होता. ‘बोईंग’, ‘रियनस्पेस’, ‘युनायटेड लाँच अलायेन्स’, ‘इंटरनॅशनल लाँच सर्व्हिस’ आणि ‘स्पेस-एक्स’ अशा काही खासगी कंपन्यानी अंतराळ संशोधनाच्या कामाला सुरूवात केली होती. ‘नासा’ने या कंपन्यांबरोबर हातमिळवणी सुरू केली. एका अंतराळवीराला अवकाशात पाठविण्याचा नासाचा खर्च असा आहे - बोईंग स्टारलायनेर - ९ कोटी डॉलर, रशियाच्या सोयुझ यानासाठी - ८.६ कोटी डॉलर, ‘स्पेस-एक्स’च्या क्रू-ड्रॅगनचा खर्च ५.५ कोटी डॉलर. हा ‘स्पेस-एक्स’चा खर्च ‘बोईंग’च्या खर्चाच्या फक्त ६०टक्के आहे. दोन्ही कंपन्यांच्या बनावटीतही फरक आहे. स्टारलायनरची बनावट ‘अपोलो’ अंतराळयानासारखी आहे, तर ‘स्पेस-एक्स’ची रचना आधुनिक आहे. ‘स्पेस-एक्स’मध्ये जुन्या यानांसारखी खिटी बटणे नसून सर्व यंत्रणांचे नियंत्रण 3 वेगवेगळ्या टच स्क्रीनच्या साहाय्याने करण्याची व्यवस्था आहे. अंतराळवीरांच्या पोषाखाचे डिझाईन पण ‘स्पेस-एक्स’ने तयार केले आहे. हे पोषाख प्रत्येकाच्या मापात केले आहेत. काही वेळेला दालनातील हवेचा दाब एकदम कमी होतो. परंतु, पोषाखाच्या आत केलेली रचना अंतराळवीरांच्या जीवावर बेतणार नाही, अशी असते. या कंपनीचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क हे आहेत. ‘नासा’ने आधुनिक रचना व खर्च कमी यामुळे ‘स्पेस-एक्स’च्या कामाला मंजुरी दिली.
दोन अंतराळवीरांची व ‘स्पेस-एक्स’च्या मालकाची थोडक्यात माहिती पाहूया.
रॉबर्ट बेंकन - ५० वर्ष वय असलेल्या बेंकन यांना एसटीएस १३० व १२३ या दोन स्पेस शटल मोहिमांचा अनुभव आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली पीएच.डी केली आहे. ‘नासा’त दाखल होण्यापूर्वी ते अमेरिकेच्या हवाई दलात कार्यरत होते. अवकाशात एकूण ७०८ तास राहण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे व त्यापैकी 37 तास त्यांनी स्पेसवॉक केला आहे.
डग्लस हर्ले - ५२ वर्षे वय असलेल्या हर्ले यांना एसटीएस १२७ व १३५या दोन स्पेस शटल मोहिमांमध्ये त्यांचा पायलट म्हणून सहभाग केलेला होता. त्यांच्याकडे अवकाशात एकूण ६८३तास राहण्याचा अनुभव आहे. ‘स्पेस-एक्स’चे मालक एलॉन मस्क - खासगी कंपनी ‘स्पेस-एक्स’चे सर्वेसर्वा आहेत अब्जाधीश एलॉन रीब्ज मस्क. त्यांचे वय आहे ४९वर्षे व त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरात २८जून, १९७१ला झाला आहे. त्यानी वयाच्या १२व्या वर्षी एक व्हिडिओ गेम बनविला व तो ५००डॉलरला विकला. त्यांनी त्यांच्या आईच्या केनेडियन नागरिकत्वाखाली अमेरिकेत प्रवेश केला. पुढे अर्थशास्त्रात बीए व भौतिकशास्त्रात बीएस्सी ही पदवी घेतली. १९९५मध्ये त्यांनी पीएच.डीसाठी स्टॅफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, पण तीन दिवसांत त्यांनी तो नाद सोडला. कारण, भावाबरोबर एक ‘झिंपटॉन-२’ कंपनी सुरू केली होती. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक कंपन्यांचे संचालन केले. त्यातली ‘टेसला’ ही एक विजेवर चालणार्या मोटार उत्पादनाची कंपनी आहे. मुंबई-पुणे हा प्रवास काही मिनिटांतच घडवून आणणार्या ‘हायपर लूप’ कंपनी त्यांचीच निर्मिती आहे. ‘स्पेस-एक्स’ कंपनी सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश लोकांना कमीतकमी खर्चात अंतराळाचा प्रवास घडविणे आणि मंगळावर वस्ती करणे हा आहे. ६ मे रोजी त्यांनी ‘स्पेस-एक्स’चा १७वा वर्धापन दिन साजरा केला.
नजीकच्या भविष्यकाळात अंतराळ प्रक्षेपण व उड्डाण यातही खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग असेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे. अंतराळपर्यटनाला त्यामुळे चालना मिळेल. वास्तविक या तंत्रज्ञानाचा व्यापारी वापर करायला ‘इस्रो’ने केव्हाच सुरुवात केली आहे. दूर सर्वेक्षण, रिमोट सेन्सिंगच्या वापरात तर आपण शीर्षस्थ स्थानावर आहोत. त्यासाठी वापरले जाणारे आपले उपग्रह अव्वल दर्जाचे आहेत. जमिनीपासून ३६ हजार किमी उंचीवरून जमिनीवरच्या केवळ पाच मीटर दूर असलेल्या वस्तूंची स्वतंत्र ओळख पटविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या मदतीने मिळणारी मौलिक माहिती आपण व्यापारी तत्त्वावर इतर देशांना देत आहोत. त्यातून देशाला भरघोस उत्पन्न मिळते. याशिवाय मनोरंजन, दळणवळण, दूरसंचार ट्रान्सपॉन्डर्स आपण भाडेतत्त्वावर इतर देशांना उपलब्ध करून देत आहो्त. ‘स्पेस-एक्स’च्या कुपीतील दोन अंतराळवीर बेंकन व हेर्ले हे ३ ऑगस्टच्या बातमीवरून १ ऑगस्टलाच त्यांचे काम आटोपून सुमारे दोन महिन्यानंतर पृथ्वीकडे परत यायला निघाले आहेत. मेक्सिकोच्या आखातात त्या अंतराळ वीरांच्या जोडीने सुखरुपपणे उडी घेतली. यासाठी मेक्सिकोचे आखात निवडले गेले. कारण, फ्लोरिडाजवळच्या सागरात एक उष्णकटिबंधीय वादळ आहे. अंतराळवीरांसाठी परत येऊन महासागरात उडी घेण्याची वेळ ४५ वर्षांनी आली आहे. ‘अपोलो-सोयुझ’ या यानाने १९७५मध्ये महासागरात उडी घेतली होती. तेव्हा, अंतराळ क्षेत्राचे हे खासगीकरण भविष्यातील आधुनिक जगाकडे टाकलेले आणखीन एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल.