कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाने आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा हटविलेला पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन मनगुत्तीच्या गावकर्यांना दिले आहे. पण, या निमित्ताने महाराष्ट्रात जे तिरक्या चालीचे गलिच्छ राजकारण रंगले ते समजून घ्यायला हवे.
राजकारणी लोकांना राजकारण करण्यासाठी कोणता विषय कामाला येईल, हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकत नाही. म्हणून ब्रह्मदेवापेक्षाही ज्याची बुद्धी अधिक तीव्र चालते, त्याला ‘राजकारणी’ म्हणायचे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा पोलिसांनी रातोरात हलविला. पुतळा हटविण्यास जबाबदार कोण? भाजप नेते आशिष शेलार म्हणतात की, “स्थानिक काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी हे पुतळा हटविण्यास जबाबदार आहेत.” त्यांनी पुतळा हटविण्याचे राजकारण का केले असावे? उत्तर सोपे आहे- महाराष्ट्र या प्रश्नावरुन पेटावा आणि भाजप अडचणीत यावा, यासाठी हे कृत्य केले असावे. तिरकस राजकारण कसे चालते, याची थोडीबहुत कल्पना असलेल्यांना हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. तिन्ही भाजपविरोधी पक्ष आहेत. भाजपचे शासन केंद्रात आहे आणि कर्नाटकातही आहे. महाराष्ट्रात भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शासनाविरुद्ध अनेक जोरदार विषय घेऊन आघाडी उघडलेली आहे. कोरोना, शिक्षणाचा विषय, शेतकर्यांचे विषय आणि आत्महत्या, दुधाचा विषय आणि याला जोडूनच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, असे मुद्दे घेऊन भाजप आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी सत्ताधारी पक्षांना कोणता ना कोणता तरी विषय हवा होता. मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सत्ताधार्यांना मिळाला. त्याचा उपयोग केला नाही, तर राजकारणातील अडाणी ठरण्याचा संभव आहे, तसे ते नाहीत. राजकारणातील कसलेले मल्ल आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्यासारखा आदर्श शासक अर्वाचीन काळात भारतात झालेला नाही. मराठी माणसाला तर शिवाजी महाराज देवतास्वरुपच आहेत. त्यांची कुणी जर बदनामी केली किंवा त्यांच्यावर जर कुणी वेडेवाकडे लिहिले, तर मराठी माणूस ते सहन करीत नाही. संघ संस्थापक परमपूज्य डॉ. हेडगेवार म्हणत असत की, “व्यक्ती म्हणून जर कुणाला आदर्श मानायचे असेल तर ते शिवाजी महाराजांना मानावे.” रामदास स्वामी त्यांच्याविषयी लिहितात-
शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी ॥१॥
शिवरायांचे कैसे बोलणे।
शिवरायांचे कैसे चालाणे।
शिवरायांची सलगी देणे। कैसी असे ॥२॥
अशा शिवरायांचा पुतळा हटविण्याचे कुकर्म बेळगावातील पोलिसांनी केले. ते त्यांनी का केले? त्यांचा बोलविता धनी कोण? याची चौकशी कर्नाटक शासनाने केली पाहिजे आणि सन्मानाने पुतळा आहे, त्याठिकाणी बसविला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत, ते राष्ट्राचे आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री संघ स्वयंसेवक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जी पराकोटीची श्रद्धेची भावना सर्व स्वयंसेवकांत असते, तशी ती त्यांच्या मनातही आहे, याविषयी शंका घेण्याचे काहीही कारण नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी आता बसविला जाणार आहे.
आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे येऊया. मनगुत्ती गावातून पुतळा हटविण्याचे पडसाद कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड, मुंबई अशा सर्व ठिकाणी उमटलेले आहेत. मनगुत्ती गावात जाऊन पुतळा बसविण्याची घोषणा अनेक जणांनी केली आहे. सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांनी पत्रके काढलेली आहेत. महाविकास आघाडीतील कोणता नेता काय बोलला, याविषयी येथे लिहिण्याचे काही कारण आहे, असे नाही. पण, राजकारण कसं तिरक्या चालीचं असतं, हे समजण्यासाठी संजय राऊत काय म्हणतात, ते बघूया.
संजय राऊत म्हणतात की, “सर्व पक्षांनी या घटनेविरुद्ध एकत्र आले पाहिजे आणि त्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे.” संजय राऊत असे म्हणत नाहीत की, सर्व पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले पाहिजे. संजय राऊत यांच्या म्हणण्यावर एका वाचकाने खवचट प्रतिक्रिया दिली की, “बहुधा संजय राऊत यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसावा.” संजय राऊत असेही म्हणाले नाहीत की, महाराष्ट्र शासनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावे. “कर्नाटक विरुद्धच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी करावे,” असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
त्यातले राजकारण सर्वांना समजते. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, भाजप सरकार विरुद्ध महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आंदोलन करावे, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. असे होणार नाही हे त्यांना माहीत आहे आणि मग हा मुद्दा घेऊन भाजपला चांगले झोडता येईल, ही त्यांची रणनीती आहे. शिवाजी महाराजांविषयी भाजपवाल्यांना प्रेम नाही, शिवाजी महाराजांचा उपयोग ते केवळ मतांसाठी करतात, मोदीदेखील हेच काम करतात, असा प्रचार भाजपविरुद्ध करता येईल. हे राजकारण आहे. प्रतिपक्षाला घेरायचे, त्याला चक्रव्यूहात अडकावयाचे आणि त्याच्यावर वार करीत राहायचे, ही यांची दुर्योधननीती आहे. असेही संजय राऊत शिवसेनेचे शकुनी मामा आहेत. वाचकांना आठवत असेल की, त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना राष्ट्रपती करावे, असे पिल्लू सोडून दिले होते. संघ आणि भाजप दोघांना कोंडीत पकडण्याची ही रणनीती होती. संघ, संजय राऊत यांचे बारसे जेवलेला असल्यामुळे या बालिश रणनीतीचा मऊभात झाला.
महाविकास आघाडीने जे राजकारण सुरु केले आहे, त्याला प्रतिशह कसा द्यायचा, हे भाजपने ठरवायचे आहे. त्याबाबतीत त्यांना उपदेश करण्याचा मला तरी काही अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या भक्तिभावात त्यांची बरोबरी कोणी करील, असे मला वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा विषय नसून शिवाजी महाराज हा जगण्याचा विषय आहे. राजकारणाचे अत्यंत कठीण डाव आणि राजकारणाचे अत्यंत कठीण पेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने सोडवलेले आहेत. एकच उदाहरण सांगतो. बंगळुरुला शहाजी राजांना अफजल खानामार्फत आदिलशहा अटक करतो. आदिलशहाने ज्याला अटक केली, त्याला तो जीवंत ठेवीत नसे. महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य नुकतेच सुरु झाले होते. त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला. एका बाजूला आईचे सौभाग्य आणि दुसर्या बाजूला स्वराज्य. महाराजांनी सौभाग्यही राखले आणि स्वराज्यही राखले. कसे?
महाराजांनी दिल्लीपतीला पत्र लिहिले, “मी आणि माझे पिताजी तुमचे सरदार होऊ इच्छितो.” या पत्राची बातमी विजापूरच्या दरबारी गेली. दिल्लीपतीच्या सरदाराला कैद करून आपण संकट ओढवून घेत आहोत हे लक्षात आले. त्यांनी शहाजींची मुक्तता केली. नाक दाबले की, तोंड उघडते अशी आपल्याकडे म्हण आहे. महाआघाडीचे नाक कुठे आणि कधी दाबायचे, हे भाजपतील नेत्यांना आपल्यापेक्षा चांगले समजते. म्हणून शकुनीमामा आणि त्यांच्या साथीदारांना पुतळ्याचे राजकारण करु द्या. पुतळ्याचे राजकारण करता करता त्यांना कठपुतली कसे करायचे याचेही राजकारण सुरु ठेवायला पाहिजे आणि शिवनीती कशी आचरणात आणायची याचा पाठ घालून दिला पाहिजे. चाबकाचे फटके बसल्याशिवाय शकुनीमामा सरळ चालत नाही, हे खरे!