घरांचे डॉक्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020   
Total Views |

 


Prop_1  H x W:

 

 



नितीन आणि निलेश हे दोघेही ‘होम इन्स्पेक्शन असोशिएशन ऑफ इंडिया’ संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. नितीन शिंगोटे या संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आहेत. तसेच ते ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’चेसुद्धा सदस्य आहेत. ‘इनोव्हेटी मॅगझिन’ने २०२० मधील २५ ‘इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप’मध्ये ‘प्रॉपचेकअप’चा समावेश केला होता. २०२५ पर्यंत संपूर्ण भारतात २५ शहरात ‘प्रॉपचेकअप’ची कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचे दोन्ही भावांचे स्वप्न आहे.

 

 


‘दीवार’... अमिताभ बच्चनला खर्‍या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ ही ‘इमेज’ मिळवून देणारा चित्रपट. या चित्रपटात अमिताभ बच्चन एक संपूर्ण इमारत अव्वाच्या सव्वा भावाने विकत घेतो. जो विकणारा मालक असतो तो त्याला म्हणतो की, “तुला व्यवसाय करता येत नाही. कारण, तू बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन ही इमारत विकत घेतलीस.” 
 
 
त्यावर अमिताभ म्हणतो, “व्यवहार तर तुम्हाला करता आला नाही. तुम्ही या इमारतीची किंमत दहापट जरी सांगितली असती तरी त्या किमतीला मी ही इमारत विकत घेतली असती.” तो मालक विचारतो की, “या इमारतीचं असं काय वैशिष्ट्य आहे?” “माझ्या आईने या इमारत बांधकामावेळी मजुरी केलेली आहे,” अमिताभ उत्तर देतो.
 
त्या मुलानेसुद्धा लहानपणी आपल्या बाबांना असंच एका बांधकाम व्यावसायिकाकडे शिपायाचं काम करताना पाहिलं. त्याने जिद्द बाळगली की, आपणसुद्धा याच क्षेत्रात उतरायचं. यासाठी मुद्दाम त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले. आपल्या लहान भावाला सोबत घेऊन ‘प्रॉपचेकअप’ नावाची कंपनी सुरु केली. गृहतपासणी अर्थात ‘होम इन्स्पेक्शन’ या श्रेणीत कार्यरत असणारे भारतातील पहिले स्टार्ट-अप म्हणून ‘प्रॉपचेकअप’ची आज भारतात वेगळी ओळख आहे. ही गोष्ट आहे ‘प्रॉपचेकअप’च्या नितीन प्रभाकर शिंगोटे यांची. 
 
शिंगोटे कुटुंब मूळचं पुण्यातील खेड-राजगुरुनगरचं. थोर क्रांतिकारी भगतसिंगांसह फासावर गेलेले त्यांचे दुसरे सहकारी म्हणजे शिवराम राजगुरु. त्यांचं हे जन्मस्थान. या तालुक्यात अनावळे नावाचे एक गाव आहे. या गावातून १९९० साली प्रभाकर आणि शांता हे शिंगोटे दाम्पत्य दोन वर्षांच्या चिमुरड्या नितीनसह मुंबईस आले. अंधेरीला हे कुटुंब स्थिरावलं. प्रभाकर हाताला मिळेल ते काम करु लागले. प्लम्बिंगचं काम असो रिक्षा चालवण्याचं किंवा अगदी शिंप्याचं काम, ते थेट एका दवाखान्यात अगदी वॉर्डबॉयचं पण काम त्यांनी केलं. नितीनसह निलेशची त्याच्या लहान भावाचीसुद्धा जबाबदारी वाढली होती. कालांतराने त्यांना एका बांधकाम व्यावसायिकाकडे शिपायाची नोकरी मिळाली. काहीसं स्थैर्य आता आयुष्याला आलं.
 
नितीन चौथीपर्यंत आजीकडे गावी राहिला. त्यामुळे चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पाचवी ते आठवी वर्सोवा वेल्फेअर असोशिएशन हायस्कूलमध्ये झालं. नितीनच्या आईची तब्येत खालावल्याने नितीन, निलेश आईसह गावी आले. त्यामुळे नितीनची नववी आणि दहावी मोहोळ माध्यमिक प्रशालेत पूर्ण झाली. दहावीला तो संपूर्ण शाळेत तिसरा आला होता. अंधेरीच्या एका महाविद्यालयात बारावी झाली. पुढे ‘हॉटेल मॅनेजमेंट’ करण्याचा नितीनचा विचार होता. पण, आपले बाबा ज्या बिल्डरकडे कामाला आहेत, तसं काहीसं करायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगशिवाय पर्याय नाही, हेसुद्धा त्याला उमजलं. अभिनव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात मग नितीनने पदवी प्राप्त केली.
 
घरच्या जबाबदारीमुळे नितीनला लवकर लग्न करावं लागलं. कविता या सुविद्य तरुणीसोबत त्याचा विवाह झाला. कविता शिंगोटे या एका आस्थापनेत अकाऊंटंट आहेत. लग्न झालं तरी शिकणं नितीन यांनी सुरुच ठेवलं. ‘इंडियन मॅनेजमेंट स्कूल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या संस्थेतून त्यांनी ‘एमबीए’ ही ‘प्रकल्प व्यवस्थापन’ या विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. २००८ पासून ते ‘साईड इंजिनिअर’ म्हणून विविध विकासकांसाठी काम करत आहेत. २०१२ साली त्यांनी सिव्हिल क्षेत्रात एक आगळी-वेगळी कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा लहान भाऊ निलेश हा त्यांच्या मदतीला होताच. निलेशने मुंबई विद्यापीठातून ‘बीएमएस’ पूर्ण केले. त्यानंतर ‘कोहिनूर कॉलेज ऑफ मॅनेजमेंट’ मधून ‘फायनान्स’ विषयातून ‘एमबीए’ पूर्ण केले. ‘मूडीज’ या जगप्रसिद्ध क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये ‘अ‍ॅनालिटीक’ विभागात तो कार्यरत होता. व्यवस्थापन क्षेत्रातल्या अनेकांचं या संस्थेमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं.
 
या दोन्ही बंधूंनी मिळून ‘मेजरमेंट डॉट कॉम’ नावाची कंपनी सुरु केली. चटई क्षेत्र मूल्यांकन, प्लम्बिंग, वायरिंग बरोबर आहे की नाही याची पडताळणी करणे, आपण आपल्या स्वप्नातलं घर विकत घेतोय ते बांधकाम नियमानुसार आहे की नाही, याची तपासणी ही कंपनी करु लागली. ‘होम इन्स्पेशन’ अर्थात गृहतपासणी असं एक वेगळं क्षेत्र आहे. खरंतर हे क्षेत्र भारतासाठी नवीन म्हणावं असं आहे. कारण अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, दुबई या ठिकाणच्या बांधकाम नियमानुसार ‘होम इन्स्पेक्शन’ प्रमाणपत्र असल्याशिवाय घर विकता वा खरेदी करता येत नाही किंवा भाड्यानेसुद्धा देता येत नाही. ९० टक्के व्यवहार या नियमांनुसार होतातच. भारतात जर प्रशासनाने हा नियम लागू केला तर सर्वसामान्यांची घरे घेताना होणारी फसगत १०० टक्के टळेल. मालमत्तेच्या तपासणीचं काम करत असल्यामुळे या बंधूनी ‘प्रॉपचेकअप’ हे नवीन नाव परिधान केले.
 
“ ‘प्रॉपचेकअप’ने दोन वर्षांत ५०० पेक्षा अधिक ग्राहकांच्या घरांची तपासणी करुन त्यासंबंधी प्रमाणपत्र दिले आहे. घर बांधल्यापासून पाच वर्षांपर्यंत बांधकाम व्यावसायिक संबंधित घराच्या डागडुजीला जबाबदार असतो. ‘प्रॉपचेकअप’मुळे आपल्या घरात जर काही दोष असेल तर तो आपण संबंधित बिल्डरला सांगून तत्काळ दुरुस्त करुन घेऊ शकतो, तेसुद्धा विनामूल्य. त्यामुळे ‘प्रॉपचेकअप’ ही भारतातील आगळीवेगळी सेवा देणारे स्टार्ट-अप ठरले आहे. भारतातील जवळपास सर्वच नामांकित बांधकाम संस्थेसोबत ‘प्रॉपचेकअप’ने काम केलेले आहे. या क्षेत्रात आपण नवीन होतो. स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक होऊन मार्ग काढत गेलो. मात्र जर कोणी या क्षेत्रात करिअर करु इच्छित असेल तर आम्ही त्यांना नक्की मदत करु,”असे नितीन शिंगोटे म्हणतात. 
 
नितीन आणि निलेश हे दोघेही ‘होम इन्स्पेक्शन असोशिएशन ऑफ इंडिया’ संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. नितीन शिंगोटे या संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आहेत. तसेच ते ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’चेसुद्धा सदस्य आहेत. ‘इनोव्हेटी मॅगझिन’ने २०२० मधील २५ ‘इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप’मध्ये ‘प्रॉपचेकअप’चा समावेश केला होता. २०२५ पर्यंत संपूर्ण भारतात २५ शहरात ‘प्रॉपचेकअप’ची कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचे दोन्ही भावांचे स्वप्न आहे.
 
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात मराठी माणसांचं प्राबल्य तसं नगण्यच म्हणता येईल. मात्र राम-लक्ष्मणासारखी ही शिंगोटे बंधूंची जोडी हे क्षेत्र मोठ्या वेगाने पादाक्रांत करत आहेत. ‘स्टार्ट-अप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत भारतातील पहिले होम इन्स्पेक्शन स्टार्ट-अप म्हणून ओळख मिळवली. खर्‍या अर्थाने हे दोन्ही बंधू या क्षेत्रातले अमिताभ ठरोत.
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@