अमेरिकन सरकारने या मुलांशी असा गुप्त करार केला आहे की, हिटलरची रक्तरेषा तुमच्याबरोबरच संपली पाहिजे. हे मुलगे मात्र असा कोणताही गुप्त करार असल्याचा ठाम इन्कार करतात.
१९४४ सालची गोष्ट. चित्रपटगृहात प्रत्यक्ष चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या जाहिराती पडद्यावर दिसत होत्या. एकदम एक स्लाईड पडद्यावर चमकली आणि प्रेक्षक आश्चर्याने थक्क झाले. तिच्यावर लिहिलं होतं- ‘हिटलर अमेरिकन नौदलात भरती!’ कुणालाच या ओळीचा अर्थ नीट कळला नाही. प्रेक्षक अचंब्याने याच मुद्द्याची चर्चा करत घरोघर परतले.
दुसर्या दिवशी सकाळी सर्व वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर जाड चौकटीत बातमी आली. तिचा मथळा होता- ‘माझं नाव हेस. अमेरिकन नौदलात मी तुमचं स्वागत करतो, मिस्टर हिटलर.’
वाचकांनी आधाशीपणे ती चौकट वाचली. पुन्हा पुन्हा वाचली आणि मग सगळा उलगडा झाला. जर्मनीचा फ्युरर अॅडॉल्फ हिटलर याचा पुतण्या विल्यम पॅट्रिक हिटलर हा १९३८ सालापासून अमेरिकेत राहत होता. त्याने अमेरिकन नौदलात भरती होण्यासाठी थेट राष्ट्राध्यक्षांकडे अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर होऊन त्याला नौदलाच्या वैद्यकीय पथकात भरती करण्यात आलं होतं. त्याला प्रत्यक्षात भरती करून घेणार्या अमेरिकन नौदल प्रशासकीय अधिकार्याचं नाव होतं हेस. अॅडॉल्फ हिटलरच्याही एका सहकार्याचं नाव होतं रुडॉल्फ हेस. या गंमतीदार योगायोगामुळेच तो बातमीचा विषय ठरला; अन्यथा विल्यम पॅट्रिक हिटलरमध्ये त्याच्या काकासारखा कोणताही गुण नव्हता.
हिटलर हे एक सर्वसामान्य जर्मन कुटुंब होतं. अॅडॉल्फचा मोठा सावत्र भाऊ अॅलॉईस हा पोटापाण्याच्या शोधात १९०९ साली व्हिएन्नातून पॅरिसमार्गे लिव्हरपूलला आला. लिव्हरपूल हे त्याकाळी ब्रिटनचं क्रमांक दोनचं बंदर होतं. तिथे तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागला. पण, तो दिसायचा मोठा रुबाबदार आणि राहायचा मोठा छानछोकीत. अलीकडे आपल्याकडे ज्यांना ‘टपोरी’ किंवा ‘छपरी’ म्हटलं जातं, अशा तरुण पोरांमधले सगळे ‘गुण’ या अॅलॉईसमध्ये होते असं दिसतं. आपण पूर्व युरोपची सांस्कृतिक राजधानी व्हिएन्नामधील एक मोठे हॉटेल उद्योजक आहोत आणि पश्चिम युरोपातील हॉटेल व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी इथे लिव्हरपूलला येऊन राहिलो आहोत, असं तो भासवायचा. या अशाच भूलथापांना बळी पडून ब्रिजित् डाउलिंग नावाची एक आयरिश पोरगी त्याने गटवली. पण, ब्रिजित्चा बाप विल्यम डाउलिंग हा अनुभवी गृहस्थ होता. त्याने खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा अॅलॉईस हॉटेल उद्योजक नसून वेटर असल्याचं उघडकीला आलं. बापाने पोरीला सावध केलं. पण, प्रेमात पडलेल्या पोरी नेहमी जो मूर्खपणा करतात, तोच ब्रिजित्नेही केला. कसलाही मागचा पुढचा विचार न करता तिने अॅलॉईसशी लग्न लावलं आणि दोघंही लंडनला पळून गेले. तिच्या बापाने पोलिसात तक्रार नोंदवली. कारण, ब्रिजित् १७ वर्षांची म्हणजे अल्पवयीन होती. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणं हा गुन्हा होता.
पण, या कशाचाही उपयोग झाला नाही. कारण, पोलिसांनी अॅलॉईस-ब्रिजित् यांना शोधून काढेपर्यंत ती १८ वर्षांची झाली होती. १९११ साली विल्यम डाउलिंगला सगळा मानापमान बाजूला ठेवून नातवाच्या बारशाला हजर राहावं लागलं. तोच हा विल्यम पॅट्रिक हिटलर. अॅलॉईस आणि ब्रिजित् छोट्या विल्यमसह परत लिव्हरपूलला आले. तिथे अॅलॉईसने स्वतःचं रेस्तराँ सुरू केलं.
ब्रिजित्ने आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. दुसर्या महायुद्धाचे अभ्यासक ब्रिजित्च्या या आठवणींना फारशी किंमत देत नाहीत. पण, ती लिहिते की, “माझा धाकटा सावत्र दीर अॅडॉल्फ हा १९१२ ते १९१३ या कालखंडात आमच्याकडे लिव्हरपूलला येऊन राहिला होता. कशासाठी? तर सक्तीची सैन्यभरती टाळण्यासाठी.”
जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामध्ये भारी काळात युद्ध होणार, हे त्यावेळी सगळ्यांनाच दिसत होतं. फ्रान्स आणि ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया हे एकेकाळचे हाडवैरी एकत्र आले होते. त्यांनी एकमेकांशी मैत्रीचे करार केले होते. त्यामुळे युरोपच्या राजकारणात जर्मनी व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्य हे एकटे पडल्यासारखे झाले होते. यामुळे युरोपात युद्ध पेटणार, ही अटळ गोष्ट होती.
जर्मनीने त्याच्या शिस्तशीर स्वभावानुसार हे युद्ध लवकरात लवकर जिंकण्याची जोरदार तयारी चालवलेली होती. त्यासाठीच तरुणांना सैन्यात भरती होणं सक्तीचं करण्यात आलं होतं आणि ते टाळण्यासाठी अॅडॉल्फ हिटलर आपल्या मोठ्या सावत्र भावाकडे ब्रिटनमध्ये वर्षभर राहिला होता. सगळंच मोठं गंमतीदार आहे! ब्रिजित् लिहिते की, “अॅडॉल्फच्या या वास्तव्यात तिनेच त्याला फलज्योतिष पाहण्याचा नाद लावला.” हे कितपत खरं आहे, याबद्दल अभ्यासक शंका व्यक्त करतात. पण, पुढच्या काळात अॅडॉल्फ हिटलरच्या सर्व राजकीय हालचाली, लष्करी मोहिमा या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार होत असतं, हे मात्र खरंच.
१९१३ साली अॅडॉल्फ जर्मनीत परतला आणि त्याला सैन्यात भरती व्हावंच लागलं. १९१४ साली युद्ध सुरू झालं. इतिहासात आज याच युद्धाला ‘पहिलं महायुद्ध’ असं म्हटलं जातं. अॅडॉल्फ जर्मन सैन्यात साधा कॉर्पोरल होता. साधारणपणे १० ते २५ सैनिकांची एक तुकडी असते. या तुकडीच्या प्रमुखाला ‘सार्जंट’ किंवा ‘नाईक’ म्हणतात. या नाईकाचा दुय्यम किंवा उपनाईक म्हणजे ‘कॉर्पोरल.’ पहिल्या महायुद्ध काळात कोणतीही चमकदार लढाई या डोळ्यांत भरण्यासारखे नेतृत्व गुण कॉर्पोरेल अॅडॉल्फ हिटलरच्या नावावर जमा नाहीत.
लिव्हरपूलला अॅलॉईस हिटलरचा धंदा बेताचाच होता. त्याचं रुबाबदार दिसणं आणि छानछोकीत राहणं पोरीबाळींवर छाप टाकण्यापुरतंच मर्यादित होतं. धंदा करणं त्याला जमत नव्हतं. तेव्हा १९१४ सालच्या सुरुवातीला ब्रिजित् आणि विल्यम यांना लिव्हरपूललाच ठेवून तो जर्मनीला परतला. तिथे त्याने नवं रेस्तराँ सुरू केलं. पण, तेवढ्याच महायुद्ध सुरू झालं. जर्मनी आणि ब्रिटन हे परस्परांविरुद्ध उभे ठाकले. अॅलॉईस आणि ब्रिजित् यांचा पत्रव्यवहारही बंद पडला. महायुद्ध लांबत चाललं. तेव्हा अॅलॉईसने सरळ एका जर्मन बाईशी लग्न केलं. त्याला एक मुलगासुद्धा झाला.
जर्मनी हा कॅथलिक ख्रिश्चन देश आहे आणि कॅथलिकांमध्ये एकपत्नीत्वाचा नियम कडक आहे. त्यामुळे महायुद्धानंतर अॅलॉईसने बेकायदेशीरपणे दुसरं लग्न केल्याचं उघडकीला आलं आणि त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. पण, या संकटातून ब्रिजित्नेच त्याची सुटका केली. अॅलॉईसशी आपण कायदेशीर फारकत घेतल्याचं पत्र तिने जर्मन न्यायालयाला पाठवलं आणि त्याची सुटका केली.
दारुड्या, बदफैली नवर्यांना पाठीशी घालणार्या पतिव्रताछाप बाया फक्त हिंदी सिनेमातच असतात असं नाही तर! प्रश्न असा पडतो की, १९०९ ते १९१४ एवढंच वैवाहिक जीवन वाट्याला आलेल्या ब्रिजित्ला यातून काय मिळालं? अॅलॉईस जर्मनीला निघून गेल्यावर तिने विल्यमला आणि स्वतःला जगवण्यासाठी काय केलं? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. १९२० नंतरच्या काळात मात्र अॅलॉईसने ब्रिजित्शी सतत पत्रव्यवहार ठेवलेला दिसतो. तो तिला विल्यमला जर्मनीला पाठवायला सांगत होता. परंतु, ब्रिजित्ने विल्यम १८ वर्षांचा झाल्यावर आणि त्याला रीतसर ब्रिटिश पासपोर्ट मिळाल्यावरच म्हणजे १९२९ साली त्याला जर्मनीला पाठवलं.
अनेकदा असंही घडताना दिसतं की, ब्रिजित्सारख्या दुःखी नि दुर्दैवी स्त्रियांची मुलं चांगली निघतात आणि मोठी होऊन आईला सुखी करतात. पण, हे विल्यम पॅट्रिक चिरंजीव एकूण कर्तबगारीच्या बाबतीत बापाच्याच वळणावर होते. त्याला मेहनत न करता एकदम मोठं व्हायचं होतं. तशी संधी त्याला जर्मनीत दिसेना. कारण, १९२९ साली जर्मनीची स्थिती कठीणच होती. त्यामुळे चिरंजीव लिव्हरपूलला परतले आणि उनाडक्या करण्यात दिवस घालवू लागले.
पण, १९३३ साली मात्र विल्यम एकदम बर्लिनला जायला निघाला. कारण, त्यात वर्षी त्याचा काका अॅडॉल्फ याचा ‘नॅशनल सोशालिस्ट उर्फ नाझी पक्ष’ जर्मनीत सत्ताधारी बनला आणि स्वतः अॅडॉल्फ चक्क जर्मनीचा ‘चॅन्सलर’ म्हणजे पंतप्रधान बनला. पहिल्या महायुद्धात सामान्य ‘कॉर्पोरेल’ असलेल्या अॅडॉल्फची ही झेप थक्क करून टाकणारी होती. आपल्या असामान्य वक्तृत्वाने अॅडॉल्फने संपूर्ण जर्मन राष्ट्र भारून टाकलं होतं. यासाठी १९१८ ते १९३३ या काळात त्याने अफाट परिश्रम केले होते.
विल्यम पॅट्रिकला काकाच्या परिश्रमांशी कर्तव्य नव्हतं. काका चॅन्सलर आहे. एवढंच त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. विल्यम जर्मनीला गेला आणि काकाच्या वशिल्याने राईस क्रेडिट बँकेत कामाला लागला. पण, त्याहीपेक्षा त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे बर्लिनमधल्या लब्धप्रतिष्ठित वर्तुळात तो ‘अॅडॉल्फचा पुतण्या’ म्हणून मिरवू लागला. अनेक भंपक श्रीमंत पुरुष आणि मूर्ख बाया त्याच्याभोवती गोंडा घोळू लागले. अॅडॉल्फ हिटलर हा कठोर शिस्तीचा माणूस होता. त्याला ही थेरं आवडेनात. त्याने विल्यमला बँकेतून ओपेल मोटार कंपनीत आणलं. पण, चिरंजीवांचे छंदफंद आणि मागण्या वाढतच चालल्या. शेवटी त्याने खुद्द काकाला धमकी दिली की, “माझ्या मागण्या मान्य न केल्यास तुमच्या कुटुंबांची रहस्यं उघड करेन.”
ही रहस्यं म्हणजे काय, तर अॅलॉईस आणि ब्रिजित् यांचा रीतसर घटस्फोट झालेला नव्हता, हे एक आणि दुसरं म्हणजे अॅलॉईस आणि अॅडॉल्फ यांची आजी मारिया ही ग्राझ या गावी लिओपोल्ड फ्रँकेनबर्गर नावाच्या ज्यू व्यापार्याकडे दासी म्हणून नोकरी करत असताना त्याच्यापासून तिला मुलगा झाला. तोच अॅलॉईस नि अॅडॉल्फ यांचा बाप.
पण, विल्यमच्या या धमकीचा फारसा परिणाम होईना, तेव्हा तो ब्रिटनला परतला आणि ‘मी माझ्या काकाचा तिरस्कार करतो’, अशा मथळ्याची एक लेखमाला लिहून त्याने हिटलर कुटुंबाबद्दलच्या अनेक खर्याखोट्या हकिकती छापल्या नि बर्यापैकी पैसे मिळवले. मग १९३८ साली हेच सगळं व्याख्यानांद्वारे लोकांना सांगण्यासाठी तो आईसह अमेरिकेला गेला. त्याच्या व्याख्यानांना बर्यापैकी श्रोते जमायचे.
तेवढ्याच १९३९ साली दुसरं महायुद्ध पेटलं आणि विल्यम अमेरिकेत अडकून पडला. काही काळाने त्याने आपल्याला अमेरिकन सैन्यात भरती करून घ्यावं, असा अर्ज थेट राष्ट्राध्यक्ष फ्र्रँकलिन रुझवेल्ट यांच्याकडे पाठवला. त्यावर निर्णय होऊन त्याला भरती करून घ्यायला १९४४ साल उजाडलं. युद्धसमाप्तीनंतर तो अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात लाँग आयलंडला स्थायिक झाला. त्याने एका जर्मन स्त्रीशी लग्न केलं. त्यांना चार मुलं झाली. मात्र, त्याने आपलं ‘हिटलर’ हे आडनाव बदललं आणि ‘स्टुअर्ट-ह्यूस्टन’ असं नवं आडनाव घेतलं. १९८७ साली तो मेला. त्याच्या चौथ्या मुलांपैकी तिघं जीवंत आहेत आणि त्यांनी लग्न केलेलं नाही.
असं बोललं जातं की, अमेरिकन सरकारने या मुलांशी असा गुप्त करार केला आहे की, हिटलरची रक्तरेषा तुमच्याबरोबरच संपली पाहिजे. हे मुलगे मात्र असा कोणताही गुप्त करार असल्याचा ठाम इन्कार करतात.
लाखोंची कत्तल करणार्या क्रूरकर्मा हिटलरचा निर्वंश झाला पाहिजे! पण, मग लाखो ‘रेड इंडियन’ लोकांची कत्तल करून तुमच्या पूर्वजांनी अख्खं अमेरिका खंडच बळकावलंय, त्याचं काय?