काँग्रेस अर्थहीन होणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2020   
Total Views |
Rahul Gandhi_1  




एकेकाळी देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष, राज्यकर्ता पक्ष म्हणून अर्थहीन होणार का? माझा हा प्रश्न वाचून निष्ठावान काँग्रेसी प्रतिप्रश्न करतील की, काँग्रेसची चिंता करण्याचे तुम्हाला काय कारण आहे? नसत्या उठाठेवी करायला तुम्हाला कुणी सांगितले? तुम्ही तुमच्या संघटनेची काळजी करा.कोणताही स्वाभिमानी पक्षकार्यकर्ता असेच उत्तर देईल, निदान त्याने द्यायला पाहिजे. परंतु, जेव्हा पक्षपातळीच्या वर उठून देशाचा विचार करायला लागतो, तेव्हा ‘काँग्रेसचे काय होणार’ या प्रश्नाचा विचार करावाच लागतो.



असा प्रश्न निर्माण होण्याचे कारणही तसेच आहे. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या. २०१९च्या निवडणुकीत त्यात काही फरक पडला नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मते गोळा करण्याची ताकद संपली. १९८४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४८ टक्के मते पडली होती. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १९.५ टक्के मते पडली. ४८ टक्क्यांवरून १९.५ टक्के काँग्रेस खाली आली. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत कमी कमी होत गेली आहे. घसरगुंडीसारखी ही घसरण आहे. ती केवळ एका पक्षाची घसरण असती, तर तिची गंभीरपणे दखल घेण्याचे काही कारण नव्हते. राजकीय पक्षांचे चढउतार होतच असतात. आज सत्तेत असलेल्या भाजपला १९८४ साली लोकसभेत फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. म्हणून अशा चढउतारांची कमालीची चिंता करण्याचे कारण नसते. मात्र, काँग्रेसच्या बाबतीत तेवढाच विषय नाही.



काँग्रेसचा विचार करता पुढील काही गोष्टींची दखल घ्यावी लागते.

- भारताच्या खेडोपाडी पोहोचलेला, अखिल भारतीय स्वरूप असलेला काँग्रेस हा पक्ष आहे.
- भाजप सोडून अन्य सगळे पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत.
- देशाची सत्ता चालवायची असेल, तर पक्ष देशव्यापी हवा. प्रादेशिक पक्षाचे हे काम नव्हे.
- आपल्या देशात एकाच वेळी केंद्रानुगामी शक्ती आहेत. त्याचप्रमाणे केंद्रापासून दूर जाणार्‍या शक्ती आहेत. प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक वाद, तसेच प्रादेशिक अस्मिता केंद्र दुर्बल करणार्‍या आहेत.
- काँग्रेस दुर्बल होणे म्हणजे प्रादेशिक शक्ती सबल होणे होय.
देशाच्या राजकीय स्थैर्याचा विचार करता ही गोष्ट आपल्याला हितकारक नाही. यासाठी काँग्रेसची चिंता करावी लागते.

पण, मग काँग्रेसला याची चिंता आहे का? ज्योतिरादित्य सिंधिया यांचे बंड, सचिन पायलट यांचे बंड, कर्नाटकचे सत्तानाट्य यातून ही गोष्ट स्पष्ट होते की, काँग्रेसचे नेतृत्व याबाबतीत गंभीर नाही. एकदा आलेली सत्ता पाच वर्षे टिकून ठेवावी लागते. सत्तेच्या राजकारणात अनेक प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. ’संकटमोचक’ म्हणून पक्षात वरिष्ठ मंडळी असावी लागतात. मुलायमसिंहांच्या पक्षात अमरसिंग एकेकाळी हे काम करीत. काँग्रेस पक्षातही कधी काळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे काम केले आहे. यावेळी काँग्रेसला कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आता राजस्थान या तिन्ही ठिकाणी कुणीही ‘संकटमोचक’ सापडलेला नाही. सगळे काँग्रेस नेते हतबल झाल्यासारखे दिसतात.


एक पक्ष म्हणून काँग्रेसचा विचार करता ही अवस्था काँग्रेस पक्षाने आपणहून स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. याला आपल्या हाताने आपल्यावर जखम करणे असे म्हणतात. इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस पक्ष एका घराण्याची मालमत्ता झाला. आज काँग्रेस पक्षाचे स्वरूप ‘गांधी परिवाराचा पक्ष’ असे झाले आहे. इंदिरा गांधी कर्तृत्ववान होत्या. मते आणण्याची त्यांची क्षमता अफाट होती. १९७७च्या निवडणुकीत त्या पडल्या. त्यांच्या पक्षाला १५४ जागा मिळाल्या. १९८० साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ३५३ जागा मिळाल्या, इंदिरा गांधींचा हा प्रभाव होता. १९८४च्या निवडणुकीत हयात इंदिरा गांधींपेक्षा मृत इंदिरा गांधी अधिक प्रभावी झाल्या आणि पक्षाला ४१५ जागा मिळाल्या.


जगभरच्या घराणेशाहीचा गुणधर्म असा आहे की, जोपर्यंत त्या घराण्यात कर्तृत्ववान व्यक्तीची निपज होते, तोपर्यंत घराण्याची भरभराट होते. फ्रान्सचे लुई घराणे चौदाव्या लुईपर्यंत क्रमाने शक्तिशाली होत गेले. पंधराव्या आणि नंतर सोळाव्या लुईने आपल्या कर्तृत्वाने हे घराणे संपवून टाकले. ऑटोमन साम्राज्याचे घराणे पाचशे वर्षे टिकले. पहिल्या महायुद्धानंतर शेवटचा ‘खलिफा’ संपला. मुघल घराणे औरंगजेबापर्यंत शक्तिशाली राहिले. १७४८ साली अहमदशहा हा मुघल बादशाह झाला. तो त्यावेळेचा राहुल गांधी होता. त्याला मुघल साम्राज्य टिकून ठेवता आले नाही. त्याचे तुकडे पडत गेले.


काँग्रेस पक्षाच्या वाटचालीचे काही टप्पे आहेत. पहिला टप्पा जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी असा आहे. नेहरुंना स्वातंत्र्य चळवळीचा वारसा मिळाला. त्या पिढीने नेहरुंना ‘राष्ट्रनेता’ मानले. १९६४ साली नेहरू गेले. १९६७ पासून इंदिरा गांधींचे युग सुरू झाले. स्वातंत्र्याचा हा वारसा पुरेसा नाही. आपल्याला आपले कर्तृत्व दाखवायला पाहिजे, हे इंदिरा गांधींच्या लक्षात आले. त्यांनी गरिबांशी स्वतःला जोडून घेतले. ’गरिबी हटाव’ ही घोषणा दिली. वीसकलमी कार्यक्रम दिला. इंदिरा गांधी या ‘नेहरू पुण्याई’वर जगल्या नाहीत. नंतरचा काँग्रेस कालखंड १९८५ ते १९९१ आहे. राजीव गांधींना इंदिरा गांधींची पुण्याई एका निवडणुकीपुरती कामाला आली. नंतर सोनिया गांधींच्या काळात विधवा, देशाची सून, सत्तेपासून दूर असणारी, या सर्व प्रतिमांचा मर्यादित उपयोग झाला. १९९१ नंतर स्वबळावर सत्तेवर येण्याची काँग्रेसची शक्ती संपली. पं. नेहरू किंवा इंदिरा गांधींप्रमाणे राहुल गांधींना कसल्याही पुण्याईचा वारसा नाही. काँग्रेसची नौका बुडविणारे ते कप्तान झालेले आहेत.


या कप्तानाला ही नौका बुडवू द्यायची की वाचवायची, याचा विचार काँग्रेसमधील नेत्यांनीच करायचा आहे. आज काँग्रेसमध्ये दरारा असलेला कुणीही नेता दिसत नाही. जे नेते आहेत, ते सोनिया गांधी दरबारातील हुजरे झालेले आहेत. चिदंबरमसारखा नेता तुरुंगाची वारी करून आलेला आहे. पुढील काही वर्षांत अनेकांचे नंबर लागले तर आश्चर्य वाटायला नको. त्यातील जे नेते आहेत, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश इत्यादींनी पक्षामध्ये लोकशाही आणून नवीन नेत्याची निवड करायला पाहिजे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांना पक्षातून का जाऊ दिले? कारण, ते राहुल गांधींना प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता होती. घराणेशाहीत सर्वोच्च स्थानी कुणी असावे, हे घराणे ठरविते, तिथे प्रतिस्पर्धी चालत नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता माधवराव सिंधिया आणि राजेश पायलट यांच्यात होती. माधवराव विमान अपघातात गेले आणि राजेश पायलट जीप अपघातात गेले. सोनिया गांधींना आव्हान देणारा पक्षात कुणी राहिला नाही. आता आई आणि मुलाच्या नेतृत्वाखाली पक्ष रसातळाला न्यायचा की, वर आणायचा हे काँग्रेस हायकमांडने ठरवायचे आहे.


हा विषय एका घराण्यापुरता मर्यादित नाही. विषय देशाच्या राजकीय स्थैर्याचा आहे. देशव्यापी पक्ष उभा करणे, हे खायचे काम नाही. भाजप देशव्यापी आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशव्यापी आहे. १९२५ सालापासून संघाचे काम चालते. हे काम देशव्यापी करायचे आहे, हा प्रारंभापासूनचा विचार आहे. १९५२ सालापर्यंत संघ देशव्यापी झाला होता. १९५२ साली जनसंघाची स्थापना झाली आणि जनसंघ एका रात्रीत देशव्यापी झाला. असे सामर्थ्य कुठल्याही पक्षात अथवा संघटनेत नाही. काँग्रेस स्वातंत्र्य चळवळ करणारी संस्था होती, ती राष्ट्रीय होती, म्हणून ती देशव्यापी झाली. टिळक, गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल यांच्यासारखे नेतृत्व तिला लाभले. ज्याला देशासाठी काही करायचे आहे, तो काँग्रेसवासी झाला. काँग्रेसवर कितीही टीका केली, तरी काँग्रेसने देशाला राजकीय स्थैर्य दिले, हे नाकारता येणार नाही.

आपण लोकशाही राज्यव्यवस्थेत जगतो आहोत. स्थैर्याचा एकखांबी राजकीय तंबू असता कामा नये. त्याला पर्याय असला पाहिजे. लोकशाहीच्या स्थिरतेसाठी ते फार आवश्यक आहे. एकपक्षीय राजकीय सत्तेचे दुष्परिणाम काय असतात, हे काँग्रेस शासनाने आपल्याला दाखवून दिलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची ग्वाही कोण देईल?

लोकशाहीतील सत्तासंतुलन, त्यात राजकीय पक्षांची भूमिका, याविषयी सैद्धांतिक खूप लिहिण्यासारखे आहे. येथे एवढेच लक्षात ठेवायला पाहिजे की, लोकशाही राजवट ही एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था संस्थाजीवनावर चालते. हे संस्थाजीवन निरोगी आणि बलवान असावे लागते. घराणेशाहीने काँग्रेसला इतकी वर्षे जीवंत ठेवले, आता त्याची उपयुक्तता संपली आहे. ज्याची उपयुक्तता संपते, ते कालप्रवाहात टिकत नाहीत. काँग्रेसला संजीवनी द्यायची की रोगग्रस्त ठेवायचे, याचा निर्णय काँग्रेसवर प्रेम करणार्‍यांनीच करायचा आहे.







@@AUTHORINFO_V1@@