ऐका कहाणी ‘जीसीएचक्यू’ची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

GCHQ_1  H x W:


गेल्या १९ वर्षांत पाश्चिमात्त्य प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिका-ब्रिटनच्या वरील हेरखात्यांबद्दल बरंच काही प्रसिद्ध झालं आहे. ‘एनएसए’ किंवा ‘जीसीएचक्यू’ यांच्याबद्दल मात्र कुणालाच फारशी माहिती नाही.



कोणत्याही देशाचं हेरखातं हे गुप्तच असतं आणि ते तसं असायलाच हवं, नाहीतर शत्रूच्या अंतस्थ बातम्या ते कसं मिळवू शकेल? विविध क्षेत्रांत, विविध नावांनी आणि वेगवेगळ्या मिषाने वावरून गुप्तहेर माहिती जमा करतात. एखाद्या अगदी साळसूद नाव असलेल्या कार्यालयात त्या माहितीचं एकत्रीकरण, पृथक्करण, विश्लेषण केलं जातं. त्यातून निघणारे निष्कर्म योग्य अधिकारी व्यक्तींपर्यंत पोहोचवले जातात. इथे गुप्तहेर खात्याचं काम संपतं. त्या माहितीवरून योग्य तो निर्णय घेणं आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी करवून घेणं, हे काम संबंधित अधिकारारूढ व्यक्तीचं असतं. त्या व्यक्तीनं ते त्वरेने केलं, तर पुढचे अनर्थ टळू शकतात. अमेरिकेतल्या अनेक माहीतगार लोकांचं असं मत आहे की, इस्लामी अतिरेकी अमेरिकेत काहीतरी भीषण उत्पात घडवण्याच्या खटपटीत आहेत, अशा खबरा विविध गुप्त हस्तकांमार्फत प्रशासनाला वेळोवेळी दिल्या जात होत्या. पण, बुश प्रशासनाने त्याबाबत काहीही निर्णय वेळेवर घेतला नाही नि त्यातून ११ सप्टेंबर, २००१चा आगडोंब उसळला. हे माहीतगार लोक आजदेखील वरील मत जाहीरपणे मांडत असतात.



असो. गुप्तहेर आणि गुप्तहेर खात्यांना आत्यंतिक गुप्ततेची गरज असली तरी प्रशासनाला त्यांच्या कामाला थोडीशी प्रसिद्धी द्यावीच लागते. याची दोन कारणं असतात. एक म्हणजे स्वदेशातील नागरिकांचं मनोधैर्य उंचावणे आणि दुसरं म्हणजे परराष्ट्राच्या मनात भीती, धाक निर्माण करणे. या उद्देशाने देशोदेशींची सरकारं स्वतःहून आपल्या हेरखात्याच्या काही कामगिर्‍यांना प्रसिद्धी देत असतात. गुप्तहेरांच्या कामाला रहस्याचं, गूढतेचं जे एक अद्भुतरम्य वलय असतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल असतं. अशा स्थितीत त्यांचा काही विशेष पराक्रम समजला की, स्वदेशातली जनता खूश होते, उत्साहाने सळसळते. उलट त्याच बातमीमुळे परदेशातले नेते, जनता यांच्या मनोधैर्यावर निश्चितच परिणाम होतो. सन १७८९ साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. राजेराजवाडे, सरदार-दरकदार यांच्याविरुद्ध आग पेटली. राजा सोळावा लुई, राणी मारी अँटोनिट यांच्यासह अनेक सरदारांना ठार मारण्यात आलं. त्यावेळी ब्रिटिश गुप्तहेर खात्याने राजघराण्यातील, सरदार घराण्यातील अनेक व्यक्तींना फ्रान्समधून सुखरूपपणे निसटून जायला मदत केली. या घटनाक्रमातील काही निवडक कथा ब्रिटिश शासनाने मुद्दाम प्रसिद्ध केल्या. परिणाम काय झाला? ब्रिटिश जनता आपल्या गुप्तहेर खात्यावर बेहद्द खूश झाली, तर फ्रेंच जनता आणि क्रांती पक्षाचे नेते नाउमेद झाले.



सन १९१४ साली युरोपात महायुद्ध पेटलं. ब्रिटन, फ्रान्स, रशिया विरुद्ध जर्मनी व ऑस्ट्रो-हंगेरी असा संग्राम सुरू झाला. जर्मनीला पश्चिमेकडे फ्रान्स आणि पूर्वेकडे रशिया अशा दोन आघाड्यांवर लढायचं होतं. रशियात सम्राट झारविरुद्ध क्रांतीचे प्रयत्न कित्येक वर्षे चालू होते. जर्मन हेरखात्याने या प्रयत्नांना संपूर्ण मदत देऊ केली. परिणामी, १९१७ साली रशियात यशस्वी क्रांती झाली. झारची राजवट संपली. क्रांतिकारी पक्षाने जर्मनीशी तह केला नि रशिया महायुद्धातून बाहेर पडला. जर्मनीला पूर्व आघाडी पूर्णपणे मोकळी झाली. आपल्या हेरखात्याच्या पराक्रमाच्या या बातम्यांनी जर्मन जनता आनंदित झाली, तर फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. अशा प्रसिद्धीमुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या व इतर राष्ट्रांच्या गुप्तहेर खात्यांबद्दल थोडीथोडी माहिती होते. अमेरिकन गुप्तहेर खातं ‘सीआयए’, सोव्हिएत रशियन गुप्तहेर खातं ‘केजीबी’, ब्रिटिश गुप्तहेर खातं ‘एमआय ६’ यांच्याबद्दल लोकांना जरा जास्त माहिती कळली, ती त्या खात्यांमधून निवृत्त झाल्यावर स्वतःच्या आठवणींची पुस्तकं लिहिणार्‍या माजी गुप्तहेरांमुळे. आपणा भारतीयांना आपलं गुप्तहेर खातं ‘रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस विंग’ उर्फ ‘रॉ’ची थोडीफार माहिती कळली की, ती बांगलादेश युद्धातील त्याच्या कामगिरीच्या कथांमुळे आणि आपलं शत्रुराष्ट्र पाकिस्तान याच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ उर्फ ‘आयएसआय’ या गुप्तहेर खात्याची माहिती कळली, ती त्याच्या घातक कारवायांना आपल्याकडच्या परधार्जिण्या मनोवृत्तीच्या माध्यमांनी दिलेल्या अवास्तव प्रसिद्धीमुळे!



परंतु, आपल्याला तर सोडाच, खुद्द ब्रिटन आणि अमेरिकेतल्या लोकांनादेखील माहीत नाहीत, अशी दोन अति अतिगुप्त हेरखाती तिथे आहेत. त्यापैकी अमेरिकेच्या हेरखात्याचं नाव आहे - ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ उर्फ ‘एनएसए’ व ब्रिटनच्या हेरखात्याचं नाव आहे - ‘गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स’ उर्फ ‘जीसीएचक्यू.’ आपल्याला कदाचित अमेरिकेची ‘एफबीआय’ व ‘सीआयए’ आणि ब्रिटनची ‘एमआय ५’ व ‘एमआय ६’ ही हेरखाती माहीत असतील. कारण, ११ सप्टेंबर, २००१च्या भीषण घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ दहशतवादाविरुद्ध जागतिक एल्गार सुरू केला. त्याला ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी पाठिंबा दिला. मग अमेरिका, ब्रिटन आणि इतर मित्रराष्ट्रांच्या फौजांनी अफगाणिस्तान-इराकवर आक्रमण केलं. तो सगळा घोळ अजून चालूच आहे. त्यानिमित्ताने गेल्या १९ वर्षांत पाश्चिमात्त्य प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिका-ब्रिटनच्या वरील हेरखात्यांबद्दल बरंच काही प्रसिद्ध झालं आहे. ‘एनएसए’ किंवा ‘जीसीएचक्यू’ यांच्याबद्दल मात्र कुणालाच फारशी माहिती नाही.



असं होण्याचं कारण म्हणजे, वरील दोन्ही खात्यांचं काम अत्यंत तांत्रिक आहे. जगभरातले विविध देश, त्यांच्या परदेशातील वकिलाती, त्यांचे जगभर विखुरलेले हस्तक, हे सगळे एकमेकांशी ठराविक गुप्त भाषेत संपर्क साधत असतात. त्यांच्या सांकेतिक लिप्या, सांकेतिक शब्दरचना, साधनं, उपकरणं, रेडिओ फ्रिक्वेन्सीज, इंटरनेट संकेतस्थळं हे सगळं अधिकृतपणे ठरलेलं असतं. पण, आंतरराष्ट्रीय गुंडटोळ्या, मादक पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या माफिया टोळ्या, हवाला रॅकेट्स आणि आता इस्लामी अतिरेकी संघटना हेदेखील याच सगळ्या प्रणालीचा उपयोग करीत असतात. तेव्हा शत्रुराष्ट्रांचे, मित्रराष्ट्रांचे, गुंडांचे, तस्करांचे, अतिरेक्यांचे सांकेतिक संदेश पकडणं नि ती सांकेतिक भाषा उलगडून त्यातून आपल्या देशाला आवश्यक ती माहिती जमा करणं, हे वरील दोन्ही अतिगुप्त हेरखात्यांचं काम आहे. या कार्याला इंग्रजीत ‘सिग्नल इंटेलिजन्स’ असा शब्द आहे. त्यावरून या खात्यांना ‘सिगइंट’ असं म्हटलं जातं. आता निदान ब्रिटनचं ‘जीसीएचक्यु’ हे अति अतिगुप्त राहिलेलं नाही. कारण, रिचर्ड ऑल्ड्रिच या संशोधकाने त्या खात्यावर पुस्तकच लिहिलं आहे. ‘जीसीएचक्यू ः दि अनसेन्सॉर्ड स्टोरी ऑफ ब्रिटन्स मोस्ट सिक्रेट इंटेलिजन्स एजन्सी’ असं या तब्बल ६६६ पृष्ठांच्या ग्रंथाचं नाव आहे. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश केंद्रीय मंत्रालयाच्या गुप्तवार्ता समितीला एका संघटित ‘सांकेतिक संदेश उकल यंत्रणे’ची गरज भासू लागली. यावेळी म्हणजे १९१९ साली गुप्तवार्ता समितीचा अध्यक्ष होता लॉर्ड कर्झन. लक्षात आलं का, लॉर्ड कर्झन म्हणजे कोण? होय, तोच तो १९०५ साली बंगालची हिंदू-मुसलमान तत्त्वावर फाळणी करून, पाकिस्तानचं बीज रोवणारा, भारताचा तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड जॉर्ज नाथानेल कर्झन!



तर कर्झनच्या आदेशानुसार, ब्रिटिश नौदल गुप्तवार्ता खात्याचा तत्कालीन संचालक ह्यू सिंक्लेअर याने ‘गव्हर्नमेंट कोड अ‍ॅण्ड सायफर स्कूल-जीसीसीएस’ या नावाने सांकेतिक संदेश उकल करणार्‍या स्वतंत्र गुप्तहेर खात्याचा पाया घातला. १९४० साली विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. आता ब्रिटन खरंखुरं महायुद्धात उतरलं. त्यावेळी ‘जीसीसीएस’ जगभरच्या २६ देशांच्या १५० सांकेतिक भाषा उकल प्रणालींमध्ये माहीर बनली होती. यात जर्मनी आणि सोव्हिएत रशिया यांच्याप्रमाणेच फ्रान्स आणि अमेरिकासुद्धा होते. म्हणजे ‘जीसीसीएस’मधले सांकेतिक भाषातज्ज्ञ शत्रुराष्ट्रांप्रमाणेच मित्रराष्ट्रांचेही सांकेतिक संदेश उलगडून वाचू शकत होते, वाचत होते नि आपल्या देशाच्या हिताची माहिती वरिष्ठांना देत होते. यात काहीच गैर नाही. कारण, राजनीतीमध्ये शत्रू आणि मित्र ही नाती सतत बदलती असतात. कुणीच कुणाचा कायमचा मित्रही नसतो नि शत्रूही नसतो. ही वस्तुस्थिती ओळखून त्याप्रमाणे न वागणारे लोक राजनीतीमध्ये अयशस्वी ठरतात. हा सणसणीत धडा १९६२ साली चीनने आपल्याला शिकवलाच आहे.




असो. तर दुसर्‍या महायुद्ध काळात जर्मनीची ‘अल्ट्रा’ या नावाची सांकेतिक प्रणाली भेदण्यात तर ‘जीसीसीएस’ने यश मिळवलंच; पण सोव्हिएत रशियाची ‘व्हेरोना’ नावाची कूटभाषा उलगडून त्यांनी फारच घवघवीत यश मिळवलं. पण, साम्यवादी तत्त्वज्ञानाने भारावून सोव्हिएत रशियाला माहिती पुरवणारे घरभेदे इंग्लंड-अमेरिकेत खूप होते. त्यांच्याकडून ‘व्हेरोना’ उलगडली गेलीय, हे रशियाला समजलं. त्यांनी लगेच आपली प्रणाली बदलली. तो दिवस २९ ऑक्टोबर, १९४८ हा होता. १९४६साली ‘जीसीसीएस’चं ‘जीसीएचक्यू’ हे नवीन नामकरण झालं होतं. ‘जीसीएचक्यू’ मधल्या सांकेतिक भाषातज्ज्ञांनी २९ ऑक्टोबर १९४८ हा शुक्रवारचा दिवस ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून साजरा केला. कारण ‘व्हेरोना’ ऐवजी आता सोव्हिएत रशिया अधिक अवघड सांकेतिक भाषा वापरायला सुरुवात करणार हे उघडच होतं. ऑल्ड्रिच यांनी अशा अनेक गंमतीजमती दिल्या आहेत. मात्र, ऑल्ड्रिच यांच्या मते, सध्याचं इंटरनेट युग हे ‘जीसीएचक्यू’ किंवा त्याच्यासारख्या सर्वच गुप्तवार्ता खात्यांची कसोटी पाहणारं युग आहे. कारण, इंटरनेट किंवा एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे माहितीचा महास्फोट झाला आहे. सर्वत्र सर्व प्रकारच्या माहितीच्या नद्या-महापूर आल्यासारख्या भरभरून ओसंडत आहेत. त्यातून शत्रू, मित्र, गुंड, तस्कर, अतिरेकी आणि सामान्य नागरिक यांची माहिती वेगवेगळी करून आवश्यक माहिती वरिष्ठांपर्यंत त्वरेने पोहोचवणं, हे काम मोठं जिकिरीचं बनलं आहे. विध्वंसक कामात हिंमत आवश्यक असते. पण, बाकी ते सोपं असतं. विधायक काम अवघड असतं. कारण, त्यात हिंमतीबरोबरच संयम, चिकाटी नि अखंड सावधानता आवश्यक असते.

@@AUTHORINFO_V1@@