औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षत घेता राज्यातील व देशात लॉकडाऊन करण्यात आला. मात्र अर्थव्यवस्थेतची विस्कटलेली घडी लक्षात घेता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. याअंतर्गत अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप जिम, उद्याने आणि मंदिरे नागरिकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे श्रावण महिना सुरु झाल्याने मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे.
ते पत्रात म्हणाले की, 'हिंदू बांधवांचा श्रावण महिना सुरु झाला आहे असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउनही शिथिल होण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक अंतर राखून बाजारपेठही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात भक्त भाविकांसाठी मंदिरे उघडली जावी. मंदिरे बंद असल्यानं धार्मिक कार्य करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. श्रावण महिन्यात लोक भक्ती भावानं साजरा करतात. मंदिरं उघडल्यास भाविक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून धार्मिक कार्य करतील.' अशी खात्रीही त्यांनी आपल्या पात्रातून दिली.
पुढे ते म्हणतात, 'मंदिरे बंद असल्यानं पूजेसाठी व विधीसाठी जे सामान विक्री होते त्यांच्या व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील मंदिरे सुरक्षित वावरांच्या नियम पाळूनच भक्तांसाठी खुली करण्यात यावी.'अशी मागणी त्यांनी केली. यंदाच्या महत्त्वाच्या सणांवरही करोनाचे सावट पसरले आहे. गणेशोत्सवातील मिरवणूकाही न काढण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्याचबरोबर, विसर्जनसुद्धा घरीच करण्याचे आदेश सरकारने दिला आहे.