मोपल्यांचे उदात्तीकरण करण्याचा कुटील डाव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020   
Total Views |
Mlbaar_1  H x W




मलबारमधील हिंदूंचे मोठ्या संख्येने हत्याकांड होण्यास कारणीभूत असलेला वारियन कुंनथु कुंजअहमद याच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा या आशिक अबू याने केली आहे. हिंदूविरोधी दंगली दंगलींना कारणीभूत ठरलेल्या त्या मुस्लीम अत्याचारीच्या जीवनावर चित्रपट काढण्याच्या घोषणेने केरळमधील हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘खिलाफत चळवळी’च्या नावाखाली केरळमध्ये मुस्लिमांनी तेथील हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले. हिंदूंचे सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार घडले. विरोध करणार्‍या हजारो हिंदूंची कत्तल करण्यात आली. असंख्य हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले. केरळमधील मलबार भागामध्ये मुस्लिमांनी तेथील हिंदू समाजावर जे अत्याचार केले, तो ‘मुस्लीम जिहाद’च होता. पण, केरळमधील धर्मांध मुस्लीम संघटना आणि डाव्या विचारांच्या मंडळींना ते मान्य नाही. त्यांच्या मते, मलबारमध्ये जे घडले तो ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोपल्यांनी पुकारलेला सशस्त्र संघर्ष होता. केरळ राज्यामधील मलबार परिसरात ऑगस्ट १९२१ मध्ये हिंदू समाजावर जे अत्याचार करण्यात आले, त्याच्या खुणा अजून पुसल्या गेल्या नसतानाच या घटनेस १०० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने केरळमधील हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मुस्लीम संघटना, डावे पक्ष आदींनी चालविला आहे.


मोपल्यांनी मागील शतकात मलबारमधील हिंदू समाजाचा जो भीषण संहार केला, त्या संहारमध्ये ज्याने पुढारीपण केले, त्याच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा चित्रपट दिग्दर्शक आशिक अबू याने केली आहे. मलबारमधील हिंदूंचे मोठ्या संख्येने हत्याकांड होण्यास कारणीभूत असलेला वारियन कुंनथु कुंजअहमद याच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा या आशिक अबू याने केली आहे. ‘खिलाफत चळवळी’च्या काळामध्ये मलबार भागामध्ये ज्या हिंदूविरोधी दंगली झाल्या, त्या दंगलींना कारणीभूत ठरलेल्या त्या मुस्लीम अत्याचारीच्या जीवनावर चित्रपट काढण्याच्या घोषणेने केरळमधील हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. मलबारमधील हिंदू समाजावर झालेले अत्याचार तेथील हिंदू समाज विसरलेला नाही. असे असतानाच हिंदूंचे हत्याकांड करणार्‍या कुंजअहमद यास ‘क्रांतिकारी नेता’ ठरवून त्याच्यावर चित्रपट काढला जात आहे. आशिक अबू दिग्दर्शित या चित्रपटामध्ये प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता पृथ्वीराज हा कुंजअहमदची भूमिका करणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टरही प्रकाशित झाले आहे. या चित्रपटाची पटकथा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित असलेल्या रमीस मोहम्मद याने लिहिली आहे. हे सर्व लक्षात घेता, हा चित्रपट काढण्यामागील हेतू नेमका काय, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘जमात-ए-इस्लामी’ या जहाल संघटना आणि मार्क्सवादी, १९२१ साली जे हिंदूंचे हत्याकांड झाले, त्याची हिंदूंना पुन्हा आठवण करून देऊन त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे, तर अलीकडे ‘सीएए’ विरोधात केरळमधील मल्लपुरममध्ये जे आंदोलन करण्यात आले, त्या आंदोलनादरम्यान जहाल मुस्लिमांनी, ‘१९२१ साली ज्या खंजिराचा वापर केला होता, तो खंजीर आम्ही अजून फेकून दिलेला नाही,’ अशा घोषणा देऊन हिंदू समाजास धमकाविले होते. एवढेच नव्हे, तर १९२१च्या बंडाची शताब्दी ‘साजरी’ करण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘जमात-ए-इस्लामी’ आदी जहाल संघटनांनी विविध ठिकाणी मिरवणुका काढल्या होत्या. मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्यांच्या हातात तलवारी आणि अन्य शस्त्रास्त्रे होती. सहभागी जमावाकडून अत्यंत प्रक्षोभक घोषणा दिल्या जात होत्या.


‘खिलाफत चळवळी’च्या निमित्ताने केरळमध्ये मोपल्यांनी ‘जिहाद’ पुकारुन हिंदूंचे हत्याकांड केले होते. आपला संघर्ष ब्रिटिश सत्तेविरुद्ध असल्याचे या लढ्याद्वारे दाखविण्यात आले. पण, प्रत्यक्षात हिंदूंचे हत्याकांड करण्यासाठी या ‘खिलाफत चळवळी’चा वापर करण्यात आला. ‘जमीनदार विरुद्ध शेतमजूर’ यांच्यातील तो संघर्ष होता, असे चित्र रंगविण्यात आले. मात्र, मोपल्यांनी केलेल्या अत्याचारात असंख्य हिंदू स्त्रिया, पुरुष आणि मुलाबाळांची हत्या करण्यात आली. असंख्य हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले. अनेक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. ‘खिलाफत आंदोलना’च्या दरम्यान या कुंजअहमद याने आपण स्वतंत्र ‘खिलाफत’ स्थापित करीत असल्याची घोषणा केली. ‘अल दौला’ या नावाच्या ‘खिलाफती’चे मलबारमध्ये काही दिवस साम्राज्य होते. पण, कुंजअहमद याने ‘स्वतंत्र राष्ट्र’ स्थापन केले होते, असे दिग्दर्शक आशिक अबू आणि त्याच्या सहकार्‍यांचे म्हणणे आहे.


१९२१ साली केरळमध्ये मोपल्यांनी जे कथित बंड केले होते, त्याचे जे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न मुस्लीम जहालांकडून आणि डाव्यांकडून सुरु आहे, त्याचा सर्व थरांमधून निषेध केला जात आहे. ‘प्रज्ञाप्रवाह’चे राष्ट्रीय निमंत्रक जे. नंदकुमार यांनी, “मोपल्यांनी केरळमध्ये ज्या दंगली घडविल्या, त्याचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता,” असे स्पष्ट केले आहे. के. माधवन नायर यांच्यासारख्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्या काळची वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कुंजअहमदचे उदात्तीकरण करण्याचा डाव्यांचा आणि जहाल मुस्लिमांचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचेही जे. नंदकुमार यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या फुटीर प्रचार मोहिमांमध्ये अभिनेत्यांनी सहभागी होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. कुंजअहमदच्या जीवनावरील एका चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच अन्य एक मार्क्सवादी पी. टी. कुंजू मुहम्मद यांनीही, आपण कुंजहमद यांच्या जीवनावर ‘शहीद वारियान कुन्नान’ या नावाने चित्रपट बनवीत असल्याची घोषणा केली आहे.


‘खिलाफत चळवळी’च्या नावाखाली केरळमधील मलबार भागात मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले. पण, आता तेथील मुस्लीम आणि डाव्या शक्ती त्याच जुलमी मोपल्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याविरुद्ध सर्व हिंदू समाजाने आवाज उठविण्याची गरज आहे. तसेच मोपल्यांनी किती भयानक अत्याचार तेथील हिंदू समाजावर केले होते, तेही नव्या पिढीपुढे येण्याची आवश्यकता आहे. ‘मला काय त्याचे’ असे म्हणून या गतइतिहासाकडे डोळेझाक करून कदापि चालणार नाही!


केरळमधील हिंदू समाजाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न डाव्या आणि मुस्लीम शक्तींनी चालविला आहे. अशा शक्तींचे हे कुटील कारस्थान हाणून पाडायलाच हवे!





@@AUTHORINFO_V1@@