मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारतीय केंद्र सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये टिक-टॉकसह अनेक महत्त्वाच्या अॅप्सचा समावेश आहे. याबदल्यात भारतीय अॅप्सचा पर्यायही भारतीय उद्योजकांनी शोधून काढला. या ५९ अॅप्समध्ये शेअर इट या चायनीज अॅपचाही समावेश होता. याच शेअर इट अॅपला पर्याय म्हणून महाराष्ट्रातील मराठमोळ्या तरुणाने सेंड इट हा अॅ प तयार केला आहे. मेड इन इंडिया असलेला हा अॅप पूर्णत: सुरक्षित असून डेटा ट्रान्सफर करताना अॅप युजरची कोणतीच माहिती इतरांपर्यंत जाणार नाही, असा दावा या अॅ पचा डेव्हलपर तेजस तायडे याने केला आहे.
१२ जुलैला सेंड इट अॅपचे प्रक्षेपण करण्यात आले. येत्या काही दिवसांत या अॅपचे २.१ आवृत्तीही प्रक्षेपित करण्यात येणार असल्याचे तेजसने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या अॅपचे कोणतेही मार्केटिंग न करता १२ तासांमध्ये १०० पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले. त्यामुळे हे अॅप ‘वोकल फॉर लोकल’चे एक उत्तम उदाहरण ठरू शकते.
याची वैशिष्ट्य म्हणजे डेटा ट्रान्सफर करताना सर्वाधिक धोका असतो तो डेटा चोरीला जाण्याचा. वायफायच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर करताना त्यावर तिसऱ्याची नजरही असू शकते. त्यामुळे सेंड इट अॅपच्या माध्यमातून डेटा शेअर होत असताना तो डेटा इनक्रिप्ट केला जातो जेणेकरून डेटो इतर कोणीही चोरू शकणार नाही. हा डेटा समोरच्या मोबाईलमध्ये पोहोचल्यानंतर तो डिक्रिप्ट होतो. तसेच, या अॅपचा वापर तुम्ही हॉटस्पॉट वापरत असतानाही करू शकता. शिवाय या अॅपच्या २.१ वर्जनमध्येही अनेक नवे फिचर्स पाहायला मिळतील असेही तेजसने सांगितलं.