
आधी ज्योतिरादित्य, आता सचिन पायलट; भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
राजस्थान : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. त्यांचे उपमुख्यमंत्रिपद तसेच त्यांच्याकडच्या खात्यांचा कारभार काँग्रेसने काढून घेतला आहे. या कारवाईवर भाजप नेते शाहनवाज हुसेन यांची तिरकस प्रतिक्रिया देत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना स्पर्धक नको म्हणून ही कारवाई झाली असल्याचे ते म्हणाले.
देशात काँग्रेस पक्षामध्ये नवीन नेत्यांना आणि युवांना स्थान मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे राहुल आणि प्रियांकांना त्यांच्यापुढे स्पर्धक नको आहेत. याचे उदाहरण म्हणजे आधी ज्योतिरादित्य शिंदे आणि आतासचिन पायलट. राहुल आणि प्रियांकांना स्पर्धक वाटणाऱ्यांना पक्षातून डच्चू दिला जात असल्याचे भाजप नेते शहनवाज हुसेन म्हणाले.
दुसरीकडे सचिन पायलट यांच्या कारवाईनंतर भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. तसेच सूचक प्रतिक्रिया व्यक्त करताना गेहलोत सरकारकडे आता पुरेसे संख्याबळ नसून गेहलोत सरकार अल्पमतात आल्याचा दावा हुसेन यांनी केला आहे.
दरम्यान, गेले तीन दिवस काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. मात्र पायलट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणे टाळले. काँग्रेसने मग शेवटी चर्चेची दारेच बंद केली. काँग्रेसच्या विधिमंडळ गटाच्या दोन बैठका पार पडल्या. या दोन्ही बैठकांना सचिन पायलट यांनी दांडी मारली. बैठकीला उपस्थित न राहिल्याने बैठकीत पायलट यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.